Health Insurance : मोठी बातमी! आरोग्य विमा योजनेसाठी 65 वर्षांची मर्यादा हटवली, आजारी व्यक्तींना आणि कोणत्याही वयात घेता येणार विमा
IRDAI New Rules : विमा क्षेत्र नियामक संस्थेकडून एक नोटिफिकेशन जारी करण्यात आलं असून त्यामध्ये आरोग्य विम्यासाठी असणारी 65 वर्षांची वयोमर्यादा रद्द करण्यात आली आहे.
IRDAI New Rules : देशातील नागरिकांसाठी एक मोठी बातमी आहे. विमा क्षेत्र नियामक IRDAI ने आरोग्य विम्याबाबत (Health Insurance) मोठा निर्णय घेतला आहे. आरोग्य विम्यासाठी असणारी 65 वर्षांची वयोमर्यादा हटवण्यात आली असून कोणत्याही वयात आता विमा घेता येणार आहे. तसेच आजारी व्यक्तीलाही आता आरोग्य विम्याचा लाभ मिळणार आहे. या निर्णयामुळे वृद्धावस्थेत लोकांना त्यांच्या उपचारात मोठी मदत मिळेल.
आरोग्य विम्यासाठी 65 वर्षांची वयोमर्यादा हटवली
आरोग्य विम्यासाठी असणारी 65 वर्षांची मर्यादा हटवण्यात आली असून प्रत्येकासाठी आरोग्य सेवा प्रणालीचा लाभ घेण्याचा मार्ग सोपा केला आहे. आता कोणीही आरोग्य विमा योजना सहज खरेदी करू शकणार आहे आणि अचानक येणारा आरोग्यावरील खर्चाचा प्रश्न सुटणार आहे. या आधी हेल्थ इन्शुरन्स फक्त 65 वर्षाच्या आतील नागरिकांना घेता येऊ शकत होती. आता त्यात बदल करण्यात आला असून नवीन नियम 1 एप्रिलपासून लागू झाला आहे.
आजारी असलेल्या व्यक्तीला विम्याचा लाभ मिळणार
या आधी आजारी असलेल्या व्यक्तींना आरोग्य विम्याचा लाभ मिळण्यास अडचणी येत होत्या. आता आजारी असलेल्या लोकांनाही आरोग्य विम्याचा लाभ घेता येणार आहे. IRDA ने आपल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, विमा कंपन्यांना आता अशी आरोग्य विमा उत्पादने बनवावी लागतील जी सर्व वयोगटातील लोकांना लागू होतील. याशिवाय कंपन्यांना ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, मुले आणि मातृत्व लक्षात घेऊन उत्पादने आणावी लागणार आहेत.
आयआरडीएने म्हटले आहे की, कंपन्यांना आधीच कोणत्याही आजाराने त्रस्त असलेल्या लोकांनुसार विमा पॉलिसी आणाव्या लागतील. कॅन्सर, हृदय, किडनीची समस्या आणि एड्स सारख्या आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांना आरोग्य विमा देण्यास कंपन्या नकार देऊ शकणार नाहीत असे IRDA ने स्पष्ट केले आहे. याशिवाय, पॉलिसी घेणाऱ्याला प्रीमियम भरण्यासाठी हप्त्याचा पर्यायही दिला जाऊ शकतो.
आयुष उपचारांच्या कव्हरेजवर कोणतीही मर्यादा नसेल
IRDA च्या नवीन नियमांनुसार, सामान्य आणि आरोग्य विमा प्रदान करणाऱ्या कंपन्या आता ट्रॅव्हल पॉलिसी देखील देऊ शकतील. तसेच आयुष उपचारांच्या कव्हरेजवर कोणतीही मर्यादा असणार नाही. आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथीमध्ये कोणत्याही कॅपशिवाय विम्याच्या रकमेपर्यंत कव्हरेज उपलब्ध असेल. याशिवाय, एकाधिक दाव्यांना देखील परवानगी देण्यात आली आहे.
ही बातमी वाचा:
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )