कोल्हापुरातील जवानाला भारत-चीन सीमेवर कर्तव्य बजावताना वीरमरण; सहा महिन्याच्या चिमुकल्या लेकराची भेट आयुष्यभरासाठी अधुरीच राहिली
मणिपुरात भूस्खलन झाल्यानंतर रस्ता बनवत असताना सैन्यदलाचे वाहन 800 फूट खोल दरीत कोसळल्याने अपघात होऊन सुनील यांना वीरमरण आले.

Kolhapur : भारत चीन सीमेवर कर्तव्यावर असताना वाहन दरीत कोसळून कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर उर्फ मलकापूर येथील जवान सुनील विठ्ठल गुजर (वय 27) यांना वीरमरण आले. सुनील गुजर यांना अवघा सहा महिन्यांचा चिमुकला असून गेल्या सहा महिन्यांपासून घरी येण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. मात्र, बाप लेकाची भेट होण्यापूर्वीच सुनील गुजर यांना कर्तव्यावर वीरमरण आले. त्यामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सुनील गुजर यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, सहा महिन्यांचा मुलगा व भाऊ असा परिवार आहे. मणिपुरात भूस्खलन झाल्यानंतर रस्ता बनवत असताना सैन्यदलाचे वाहन 800 फूट खोल दरीत कोसळल्याने अपघात होऊन सुनील यांना वीरमरण आले. पुणे येथे बॉम्बे इंजीनियरिंग ग्रुपमध्ये प्रशिक्षण पूर्ण करून मणिपूर येथे 110 बॉम्बे इंजीनियरिंग रेजिमेंटमध्ये सुनील कर्तव्यावर होते.
सुनील यांचा 2022 मध्ये स्वप्नाली पाटील यांच्याशी विवाह झाला. आठ महिन्यापूर्वी काही दिवसाची रजा काढून ते गावी आले होते. पत्नीला जास्तीत जास्त वेळ देता यावा यासाठी ते अधिकच्या सुट्टीत प्रयत्नात होते. पुन्हा लवकरच परत येऊ असे सांगून आई-वडिलांसह पत्नीचा निरोप घेऊन अरुणाचल प्रदेशमध्ये कर्तव्यावर हजर झाले होते.
सुट्टीसाठी प्रतीक्षा अन् बाळाची भेट लांबणीवर
सुट्टी मिळत नसल्याने सुनील यांना बाळाला भेटण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत होती. अखेर प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर त्यांची रजा मंजूर करण्यात आली होती. पत्नी स्वप्नाली सुद्धा आपल्या माहेराहून सासरी सुनीलच्या घरी आल्या आहेत. 11 मार्चला गावी घरी येणारा सुनील सुट्टी पुढे ढकलल्याने येऊ शकले नाहीत. यावेळी त्यांनी आठ दिवसानंतर गावी येतो आणि गावची जत्रा करूनच परत जातो असे सांगितले. चार दिवसापूर्वीच त्याचे पत्नी स्वप्नाली आणि घरच्यांच्या बरोबर बोलणे झाले होते.
बापलेकांची प्रत्यक्ष भेट झालीच नाही
तथापि, गावाकडे येण्यापूर्वीच कर्तव्यावर असताना सुनील यांना वीरमरण आलं आणि आपल्या लेकाला भेटण्याची इच्छा सुनीलच्या मनातच राहिली. प्रत्यक्षात बापलेकांची प्रत्यक्ष भेट झालीच नाही. एकमेकांना मायेचा स्पर्श झालाच नाही. बाबाला आपल्या मुलग्याला कुशीत घेता आलं नाही. त्याला डोळे भरून पाहता आलं नाही.
इतर महत्वाच्या बातम्या
























