(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sonu Sood : दोन पक्षांनी दिलेली खासदारकीची ऑफर नाकारली; टॅक्स चोरीच्या आरोपावर सोनू सूदने सोडलं मौन
Sonu Sood Income Tax Survey : आपण कोणत्याही कायद्याचं उल्लंघन केलं नसल्याचं सोनू सूदने स्पष्ट केलं आहे. तसेच आपल्याला दोन पक्षांनी खासदारकीची ऑफरही दिली होती असंही तो म्हणाला.
Sonu Sood Income Tax Survey : बॉलिवूड अभिनेता आणि गरिबांचा मसिहा अशी ओळख असलेल्या सोनू सूदवर (Sonu Sood) आता टॅक्स चोरीचा आरोप झाला आहे. इन्कम टॅक्स विभागाने सोनू सूदवर 20 कोटी रुपयांच्या टॅक्स चोरीचा आरोप लावला असून या प्रकरणावर आता त्याने आपलं मौन सोडलं आहे. आपण कोणत्याही कायद्याचं उल्लंघन केलं नसून दोन पक्षांनी दिलेल्या राज्यसभेच्या खासदारकीची ऑफर नाकारली असल्याचं सोनू सूदने सांगितलं.
एनडीटीव्हीला दिलेल्या एका मुलाखतीत सोनू सूद म्हणाला की, "मी आतापर्यंत कोणत्याही कायद्याचं उल्लंघन केलं नाही. तरीही आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी चार दिवस आपली चौकशी केली. या दरम्यान त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची आपण योग्य उत्तर दिली. त्यांना ज्या कागदपत्रांची आवश्यकता होती ती सर्व पुरवली."
दोन पक्षांची खासदारकी नाकारली
आपल्याला आतापर्यंत दोन राजकीय पक्षांनी राज्यसभेच्या खासदारकीची ऑफर दिली असून ती ऑफर आपण नाकारल्याचं सोनू सूदने सांगितलं. आयकर विभागाने सोनू सूदवर 20 कोटींचा टॅक्स चोरीचा आरोप करत त्याच्या चॅरिटी ट्रस्टद्वारे विदेशी निधी अधिनियम अॅक्ट नियमांचं उल्लंघन केल्याचाही आरोप आहे.
आयकर विभाग काय म्हणतोय?
सोनू सूदने परदेशी देणगीदारांकडून क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्मचा वापर करून 2.1 कोटी रुपये गोळा केले असून परदेशी नियमन कायद्याचे उल्लंघन केले आहे. सोनू सूद आणि त्याच्या सहकाऱ्यांची मालमत्ता असलेल्या परिसरात शोध सुरु असताना, कर चुकवेगिरीचे पुरावे सापडले आहेत, असं आयकर विभागानं सांगितलं.
आयकर विभागानं दिलेल्या माहितीनुसार सोनू सूदनं आपला चॅरिटी ट्रस्ट 2 जुलै 2020 रोजी बनवला होता. या ट्रस्टमध्ये 18 कोटी 94 लाख रुपये आले. यापैकी एक कोटी 90 लाख रुपये विविध धार्मिक कामांसाठी खर्च करण्यात आले आहेत. तर 17 कोटी रुपये अजूनही ट्रस्टच्या खात्यामध्ये आहेत. आयकर विभागाच्या मते या खात्याची चौकशी करताना असं आढळून आलं आहे की, सोनू सूदच्या चॅरिटी ट्रस्टला परदेशातून देखील दोन कोटी एक लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. पुढील तपासात असे उघड झाले आहे की, हा गट बोगस बिलिंगमध्ये सहभागी आहे. आतापर्यंत सापडलेल्या अशा बोगस करारांचे पुरावे, 65 कोटी बेहिशेबी रोख खर्चाचे पुरावे, भंगारची बेहिशेबी विक्री आणि बेहिशेबी रोख व्यवहाराचा पुरावा देणारा डिजिटल डेटा देखील सापडला आहे. आयकर विभागाच्या तपासात असं सांगण्यात आलं आहे की, या इन्फ्रास्ट्रक्चर ग्रुप/कंपनीने संशयास्पद परिपत्रक व्यवहारात जयपूर स्थित इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीसोबत 175 कोटींचा घोटाळाही केला आहे.
संबंधित बातम्या :