सोनू सूद 'स्पेशल ऑलिम्पिक भारत'चा ब्रॅन्ड अॅम्बेसिडर, रशियातील विंटर गेम्समध्येही संघासोबत सहभागी होणार
सोनू सूदला 'स्पेशल ऑलिम्पिक भारत'चा ब्रॅन्ड अॅम्बेसिडर नेमण्यात आलं असून तो आता रशियात पुढील वर्षात होणाऱ्या विंटर ऑलिम्पिकमध्येही संघासोबत सहभागी होणार आहे.
मुंबई : कोरोना काळात देशातील अनेक गरजूंसाठी देवदूत बनलेला अभिनेता सोनू सूद आता स्पेशल ऑलिम्पिक भारतचा ब्रॅन्ड अॅम्बेसिडर बनला आहे. तसेच पुढच्या वर्षी रशियात होणाऱ्या स्पेशल विंटर ऑलिम्पिमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या दलाचा हिस्सा बनला आहे. ही गोष्ट आपल्यासाठी अभिमानाची असल्याचं सोनू सूदने म्हटलंय.
सोनू सूदने 30 जुलैला आपला वाढदिवस साजरा केला. त्या दिवशीच आपल्याला ही बातमी मिळाल्याचं सोनू सूदने भारतीय अॅथलिट्स आणि अधिकाऱ्यांसोबत झालेल्या व्हर्च्युअल भेटीस सांगितलं. सोनू सूद म्हणाला की, "आजचा दिवस माझ्यासाठी एक खास दिवस आहे. मला स्पेशल ऑलिम्पिक भारताचा बॅन्ड अॅम्बेसिडर बनवण्यात आलं असून त्यामुळे मला आनंद झाला आहे. या परिवारात सामिल होत असताना मी स्वत:ला भाग्यशाली समजतो आणि या मंचाचा गौरव वाढवण्यासाठी मी सदैव प्रयत्न करेन."
पुढच्या वर्षी म्हणजे 22 जानेवारी ते 28 जानेवारीच्या दरम्यान रशियात स्पेशल विंटर ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात आलं आहे. त्यामध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंच्या सोबत सोनू सूदला सामिल होण्याचं भाग्य मिळालं आहे.
कोरोनाच्या काळात अविरतपणे काम
सोनू सूदने कोरोनाच्या काळात अविरतपणे लोकहिताचं काम केलं आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत स्थलांतरित कामगारांची अवस्था वाईट झाली असताना अनेक कामगार मुंबईहून शेकडो किमीचा पायी प्रवास करत त्यांच्या मूळ गावी जाण्यास निघाले. त्यावेळी सोनू सूदने त्यांच्यासाठी वाहतूकीची साधनं उपलब्ध करुन त्या गरीब कामगारांना त्यांच्या गावी पोहोचवलं. त्याच्या जेवणाची व्यवस्था केली. तर दुसऱ्या लाटेत लोकांना आवश्यक असलेली औषधे उपलब्ध होत नव्हती ती त्यांच्यापर्यंत पोहचवण्याचं काम केल. या व्यतिरिक्त त्याने गरीब मुलांना शाळेचे साहित्य, त्यांना ऑनलाईन अभ्यासासाठी आवश्यक असणारा मोबाईल अशा वस्तुंचेही वाटप केलं.
आजही सोनू सूद केवळ एका ट्वीटवरुन मागितलेल्या मदतीसाठीही धावून जातो. सोनू सूदने आतापर्यंत केलेल्या कामाची पोचपावती म्हणून अनेकांनी आपल्या मुलांचे नाव सोनू असं ठेवलंय तर अनेकांना आपल्या दुकानांचे, व्यवसायाचे नाव सोनू सून असं ठेवलंय. सोनू सूदने आपल्या कामातून कोट्यवधी भारतीयांचे हृदय जिंकलं आहे.
महत्वाच्या बातम्या :