Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मध्यरात्री दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घातला धिंगाणा; उमेदवारांसह समर्थकांवर मोहडीत गुन्हे दाखल
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सदर प्रकरणी भरारी पथकानं वाटप करण्यात येत असलेलं साहित्य जप्त केलं होतं.
Tumsar Assembly Election 2024: तुमसर विधानसभेतील (Tumsar Vidhan Sabha) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार चरण वाघमारे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार राजू कारेमोरे यांचे बंधू विजय कारेमोरे यांच्यासह दोघांच्याही प्रत्येकी 75 समर्थकांवर मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मोहाडी तालुक्यातील मांडेसर येथे अजित पवार पक्षाचे उमेदवार राजू कारेमोरे यांचा समर्थक, हा त्याच्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्त मिठाई, टिफिन बॉक्स आणि अन्य साहित्य वाटप करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता.
सदर प्रकरणी भरारी पथकानं वाटप करण्यात येत असलेलं साहित्य जप्त केलं होतं. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आणि हे प्रकरण मोहाडी पोलीस ठाण्यात पोहोचलं. यावेळी शरद पवार पक्षाचे विधानसभेचे उमेदवार माजी आमदार चरण वाघमारे हे त्यांच्या असंख्य समर्थक कार्यकर्त्यांसह पोलीस ठाण्यात पोहोचले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार राजू कारेमोरे यांचे बंधू विजय कारेमोरे हे सुद्धा त्यांच्या समर्थकांसह ठाण्यात पोहोचले. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी आचारसंहितेचा आणि जमावबंदीचा आदेश झुगारून पोलीस ठाण्यातचं रात्री उशिरापर्यंत ठाण मांडला होता. दरम्यान दोन्ही गटाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या विरोधात मोहाडी ठाणेदार सुरेश बेलखेडे यांच्या तक्रारीवरून 150 हून अधिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कोणावर गुन्हे दाखल झाले?
चरण वाघमारे समर्थक-
१) चरण वाघमारे (शरद पवार पक्षाचे विधानसभा उमेदवार)
२) नंदू रहांगडाले (सभापती पंचायत समिती, तुमसर) यांच्यासह 75 कार्यकर्ते
राजू कारेमोरे यांचे समर्थक
१) विजय कारेमोरे (आमदार राजू कारेमोरे यांचे बंधू)
२) रितेश वासनिक (सभापती पंचायत समिती, मोहाडी) यांच्यासह 75 कार्यकर्ते
नेमकं प्रकरण काय?
अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यानं त्याच्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्त गावात मिठाईचं वाटप केलं. मात्र, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनं ही मिठाई वाटप म्हणजे, मतदारांना प्रलोभन असल्याची तक्रार निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाला दिली. यावरून भरारी पथकानं मिठाईचं सर्व साहित्य जप्त केलं. यामुळं भंडाऱ्याच्या तुमसर विधानसभेतील मांडेसर या गावात काल रात्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाचे कार्यकर्ते आपसात भिडलेत. दोन्ही राष्ट्रवादीच्या समर्थकांनी एकमेकांविरुद्ध मारहाण केल्याची तक्रार मोहाडी पोलीस ठाण्यात दाखल केली. यावरून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांवर परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेत. दरम्यान, शरद पवार गटाचे उमेदवार चरण वाघमारे हे आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह पोलीस ठाण्यात येऊन त्यांनी पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचीही माहिती आहे. रात्री उशिरापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाचे शेकडो कार्यकर्ते मोहाडी पोलीस ठाण्यात पोहोचल्यानं काहीशी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, जिल्हा पोलीस अधीक्षकांसह मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त मोहाडी पोलीस ठाण्यात पाचारण करण्यात आल्यानंतर प्रकरण निवडलं.