Vidhan Sabha Elections 2024: काँग्रेसकडून मोठी कारवाई, आबा बागुलांसह 7 बंडखोरांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला, 28 नेत्यांना दणका
Maharashtra Assembly Election 2024 : ज्या काँग्रेसच्या उमेदवारांनी बंडखोरी करत निवडणूक लढवली, त्या सर्व उमेदवारांना काँग्रेस पक्षाने 6 वर्षासाठी निलंबित केलं आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी (Maharashtra Assembly Election 2024) पु्न्हा एकदा काँग्रेसनं 7 बंडखोर उमेदवारांवर कारवाई केली आहे. बंडखोरी करत विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची 6 वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. याआधी जाहीर झालेल्या यादीत बंडखोरी करणाऱ्या 21 नेत्यांना निलंबित करण्यात आलं. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत सर्व आलबेल राहावं, यासाठी काँग्रसने बंडखोर उमेदवारांवर कारवाईचा बडगा उचलला आहे.
आतापर्यंत एकूण 28 काँग्रेस बंडखोरांचं निलंबन
काँग्रेसने आतापर्यंत एकूण 28 काँग्रेस बंडखोरांची हकालपट्टी केली आहे. काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या आदेशावरुन महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या सूचनेवरून पक्षानं बंडखोरांना निलंबित करण्याचा आदेश जारी केला आहे. यात रामटेक विधानसभा मतदारसंघातून राजेंद्र मुळक (Rajendra Mulak), काटोलमधून काँग्रेसचे दिवंगत नेते श्रीकांत जिचकार यांचे सुपुत्र याज्ञवल्क्य जिचकार (Yajnavalkya Jichkar), पर्वती विधानसभा मतदारसंघातून आबा बागुल (Aaba Bagul) आणि कसबा विधानसभा मतदारसंघातून कमल व्यवहारे (Kamal Vyavhare) यांना 6 वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे.
जयश्री पाटलांवरही कारवाई
तर सांगली विधानसभेसाठी काँग्रेसने पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर नाराज झालेल्या वसंतदादा गटाने जयश्री पाटील (Jayshree Patil) यांना अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. त्याला आता खासदार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी जाहीर पाठिंबा दिला. आता जयश्री पाटील यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. जयश्री पाटील यांना निलंबित करण्यात आलं आहे.
काय म्हणाले रमेश चेन्निथला?
काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला (Ramesh Chennithala) यांनी म्हटलंय की, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाच गॅरंटी आम्ही काल जाहीर केल्या आहेत. भारताचं भविष्य उज्वल करण्यासाठी या गॅरंटी महत्त्वाच्या आहेत. 13,16 आणि 17 नोव्हेंबरला प्रियंका गांधी महाराष्ट्रात येत आहेत. मल्लिकार्जुन खरगे पाच दिवस महाराष्ट्रात प्रचार करणार आहेत. ज्या कांग्रेसच्या उमेदवारांनी बंडखोरी केली आहे त्यांना 6 वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे.
हेही वाचा: