ठाकरे गटाच्या दबावासमोर झुकणार नाही! महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांचा हायकमांडसमोर ठाम पवित्रा, दलित-मुस्लिम फॉर्म्युला निर्णायक
Maha Vikas Aghadi Conflict: काँग्रेस आणि ठाकरे गटातील जागावाटपाचा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. विदर्भातील एकही जागा ठाकरेंच्या शिवसेनाला सोडण्यास काँग्रेस तयार नसल्याची माहिती मिळत आहे.
Maha Vikas Aghadi Conflict: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचं (Vidhan Sabha Nivadnuk 2024) बिगुल वाजलं आहे. येत्या 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात राज्यभरात (Maharashtra News) मतदान पार पडणार आहे. तर, 23 नोव्हेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. फार कमी दिवस हातात असल्यामुळे राज्यातील दोन्ही आघाड्यांकडून जागावाटपाचा तिढा सोडवण्याची धडपड सुरू आहे. पण, याच जागावाटपावरुन महाविकास आघाडीत खटके उडाल्याचं पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात काहीतरी कुरबुरी सुरू असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अशातच, शिवसेनेच्या दबावाखाली झुकणार नाही, अशी स्पष्ट भूमिका दिल्लीतील काँग्रेसच्या पक्ष श्रेष्ठींकडून घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस आणि शिवसेनेमुळे महाविकास आघाडीची समीकरणं बिघडणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहेत.
काँग्रेस आणि ठाकरे गटातील जागावाटपाचा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. विदर्भातील एकही जागा ठाकरेंच्या शिवसेनाला सोडण्यास काँग्रेस तयार नसल्याची माहिती मिळत आहे. ठाकरे गटानं दावा केलेल्या 12 जागांपैकी एकंही जागा काँग्रेस सोडायला तयार नाहीत. विदर्भातील काँग्रेस नेते दिल्लीत ठाण मांडून आहेत. महाराष्ट्रातील नेते विदर्भातील जागा सोडू नयेत, अशी मागणी काँग्रेस हायकमांडकडे करणार आहेत, अशी माहिती मिळत आहे.
शिवसेनेच्या दबावाखाली झुकणार नाही; काँग्रेस पक्षश्रेष्टींची भूमिका
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेच्या दबावाखाली झुकणार नाही, अशी भूमिका कांग्रेस दिल्लीतील पक्ष श्रेष्ठींकडून घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. शिवसेना ज्या प्रकारे दबावतंत्राचा वापर करत आहे, त्याला पाहता जागा वाटप लांबणीवर जाणार असल्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत. काँग्रेस पक्ष श्रेंष्ठांनी महाराष्ट्रातील नेत्यांना स्पष्ट केलं की, शिवसेना उद्धव बाळासाहेब अशा जागा मागत आहेत. जिथे मुस्लिम मतदार मोठ्या संख्येत आहेत आणि जिथे काँग्रेसचा
उमेदावार 100 टक्के निवडून येऊ शकतो. या जागा आपण सोडणार नाही आणि या जागांसाठी चर्चा शेवटपर्यंत चालणार, अशी भूमिका काँग्रेसनं घेतल्याची माहिती मिळत आहे. लोकसभेमधील काँग्रेसचं प्रदर्शन पाहता जास्तीत जागा काँग्रेसला मिळाल्या पाहिजेत आणि त्या आपण घेऊनच राहू, अशी भूमिकाही काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली आहे.
महाविकास आघाडीतील जागावाटपाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसचे नेते सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. काँग्रेस पक्षश्रेष्ठींशी भेटून जागावाटपावर विचारविमर्श केला जाणार आहे. यासंदर्भात बोलताना नाना पटोले यांनी सांगितलं की, "काँग्रेसची पहिली यादी उद्या जाहीर होऊ शकते, आकडा उद्याच सांगू. उद्या संयुक्त पत्रकार परिषद घेण्याचा विचार आहे. नसीम खान यांची पवार आणि उद्धव ठाकरेंच्याशी चर्चा सुरू आहे. आम्ही दिल्लीत असल्यामुळे त्यांच्याकडे जबाबदारी सोपावली आहे. 30 ते 40 जागांवर संयुक्तीक वाद आहे. उमेदवार मेरिटच्या आधारावर देण्यासंदर्भात चर्चा झाली आहे."