Nylon Manja : धक्कादायक... नायलॉन मांजामुळे नाशिकमध्ये महिनाभरात 9 गंभीर घटना, दोघांचा दुर्दैवी अंत, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
Nashik News : एकीकडे नायलॉन विक्री आणि वापरकर्त्यांवर शहरात पोलिसांची मोहीम सुरू आहे. तर दुसरीकडे नायलॉन मांजा विक्रीला आळा बसवण्याचे नाशिक पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.
नाशिक : मकर संक्रातीचा (Makar Sankranti 2024) सण जवळ आला असून यानिमित्ताने अनेक ठिकाणी पतंग उडवण्याचा खेळ खेळला जातो. पतंगबाजीला आतापासूनच सुरुवात झाली असून आकाशात विविध रंगाची पतंग उडताना पाहायला मिळत आहे. नाशिक शहरात नायलॉन मांजामुळे (Nylon Manja) होणाऱ्या अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या महिनाभरात नाशिकमध्ये नऊ गंभीर घटना घडल्या आहेत. यामुळे नाशिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. एकीकडे नायलॉन विक्री आणि वापरकर्त्यांवर शहरात पोलिसांची मोहीम सुरू आहे. तर दुसरीकडे नायलॉन मांजा विक्रीला आळा बसवण्याचे नाशिक पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. शहर पोलिसांनी गेल्या महिन्याभरात नायलॉन मांजा प्रकरणात 22 गुन्हे दाखल केले आहेत. तर 25 जणांना अटक करण्यात आली आहे. तर शहरात दुचाकीचालक गाडीला तार लाऊन प्रवास करताना दिसून आले आहेत.
गेल्या महिन्याभरात नायलॉन मांजा विरोधात पोलिसांनी कारवाई केली आहेत. तर सराईतांवर हद्दपारची देखील कारवाई नाशिक पोलीस करत आहेत. आत्तापर्यंत नाशिक शहर पोलिसांनी केलेली कारवाई पुढीलप्रमाणे :
एकूण गुन्हे :- 22
अटक : 25
जप्त केलेले गट्टू :- 844
मुद्देमाल जप्त :- साडे आठ ते नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त
नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या सराईत 74 गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई
गेल्या महिन्याभरातील घटना पुढीलप्रमाणे :
- वडाळा येथे दुचाकीस्वाराचा गळा कापला. जखमेवर 75 टाके.
- ट्रॅक्टर हाऊसजवळ नायलॉन मंजामुळे महिलेच्या डोळ्याजवळचा भाग कापला.
- नाशिक-पुणे रोडवर युवकाची नायलॉन मांजाने करंगळी कापली.
- सिन्नर रस्त्यावर एकाच कुटुंबातील तिघांना गंभीर इजा, एकाला 50 टाके तर दोघांची बोटे कापली.
- लेखा नगरला दुचाकी चालकाच्या गळ्याला गंभीर जखम, 28 टाके.
- वडाळा येथे दुचाकी चालकाचा गळा कापला, 40 टाके.
- वडाळा गाव येथे नऊ वर्ष बालकाचा नायलॉन मांजामुळे पाय कापला, अतिरक्तश्राव झाल्याने मृत्यू
- सिडको भागात एका युवकाचे बोट कापले.
- ओझर उड्डाणपुलावर जळगाव जिल्ह्यातील दुचाकी चालकाचा गळा चिरल्याने मृत्यू, अशा एकूण नऊ गंभीर घटना नाशिकमध्ये घडल्या.
मुलांच्या पालकांना समन्स बजावणार
दरम्यान, नाशिक शहरात पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या कारवाईत आठ ते नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असला तरी देखील येणाऱ्या काळात नायलॉन विक्री करणाऱ्यांसोबत नायलॉन मांजा वापरणाऱ्या मुलांच्या पालकांना समन्स देऊन कारवाई करणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी दिली आहे.
आणखी वाचा