मोठी बातमी : वाल्मिक कराडच्या सांगण्यावरुन आम्हालाच मारहाण, महादेव गित्तेचा दावा; बीडमधून संभाजीनगरच्या जेलमध्ये रवानगी
Mahadev Gitte : बीड कारागृहाचे सीसीटीव्ही तपासण्यात यावेत, सत्य समोर येईल असा दावा महादेव गित्ते याने केला आहे.

बीड : वाल्मिक कराडला मारहाण केल्याचा आरोप ठेवत महादेव गित्ते आणि त्याच्या चार साथिदारांना बीड कारागृहातून हर्सूल कारागृहात हलवण्यात आलं आहे. वाल्मिक कराडच्या सांगण्यावरुन आम्हालाच मारहाण झाली आहे, आणि आम्हालाच दुसऱ्या कारागृहात हलवलं जात असल्याचा आरोप यावेळी महादेव गित्तेने केला. कारागृहातील सीसीटीव्ही तपासा, यामागची खरी परिस्थिती समोर येईल असंही महादेव गित्ते याने सांगितले.
बीड जिल्हा कारागृहात कराड गँग आणि महादेव गित्ते यांच्यामध्ये हाणामारी झाल्याच्या बातम्या समोर आल्या. महादवे गित्तेने वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर महादेव गित्तेसह इतर चार आरोपींना हर्सूल कारागृहात हलवल्याची आलं. महादेव गित्तेला पोलिस व्हॅनमधून नेत असताना त्याने ही माहिती दिली.
कारागृहातील सीसीटीव्ही चेक करा
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडच्या कारागृहात कैद असलेले वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली. गित्ते टोळीतल्या महादेव गित्तेनं कराड आणि घुलेवर हात उचलल्याची माहिती समोर आली. पण हा दावा महादेव गित्तेने खोडून काढला. उलट आपल्यालाच मारहाण झाली असून त्याचे सीसीटीव्ही चेक करावे असंही तो म्हणाला.
बबन गित्तेची पोस्ट
गित्ते टोळीचा म्होरक्या शशिकांत उर्फ बबन गित्ते हा बापू आंधळे हत्या प्रकरणातील आरोपी असून तो नऊ महिन्यांपासून फरार आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष असलेला बबन गित्ते, पक्षप्रवेशावेळीच्या वाहनांच्या ताफ्यामुळे चर्चेत आला होता. हत्या प्रकरणात फरार असला तरी तो सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय आहे. अंदर मारना या मरना सबकुछ माफ है, अशी सूचक पोस्ट बबन गित्तेनं केली.
वाल्मिक कराडला मारहाण झालीच नाही, कारागृहाचा दावा
दरम्यान, जिल्हा कारागृहातील मारहाण प्रकरणी प्रशासनाने निवेदन जारी केलं आहे. वाल्मिक कराड, सूर्दशन घुलेला मारहाण झाली नाही अशी माहिती कारागृह अधीक्षक अधिकाऱ्याने अधिकृत पत्र काढून दिली. कारागृहात सुदीप सोनवणे, राजेश वाघमोडे यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर या दोघांमध्ये किरकोळ झटपट झाली आहे. सोमवारी सकाळी साडे नऊ वाजता ही घटना घडली होती. या प्रकरणी शिवाजी नगर पोलिसात तक्रार देणार असल्याची माहिती कारागृह अधीक्षक बिएन मुलानी यांनी दिली.
ही बातमी वाचा:

























