डंपरला रिक्षा ठोकली म्हणून मित्रालाच संपवले; कुजलेल्या मृतदेहाची ओळख पटवून आरोपी अटकेत
Crime News : डंपरला रिक्षा ठोकल्याच्या कारणाने मित्रालाच संपवले असल्याचा घटना उघडकीस आली आहे.
Vasai Crime News : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर (Mumbai Ahmedabad Highway) नायगांवजवळ (Naigaon) कुजलेल्या अवस्थेत आढळून आलेल्या बेवारस मृतदेहाची (dead body found) उकल सोडवण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. डंपरला रिक्षा ठोकली म्हणून ही हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे.
नायगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अनोळखी इसमाची हत्या करुन, पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगतच्या शेताच्या बांधावर दाट झुडपात टाकलेल्या अवस्थेत टाकण्यात आला होता. गुन्हे शाखा-2 च्या युनिटने मयताची ओळख पटवली. त्या गुन्ह्यातील तीन आरोपींपैकी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. तर एक अल्पवयीन असल्याने त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. आरोपीची ऑटोरिक्षा मयताने डंपरला ठोकली होती. त्यात रिक्षाची काच फुटली होती. त्याचाच राग मनात धरत मयताची हत्या केल्याच निष्पन्न झालं आहे.
22 नोव्हेंबर रोजी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून बाफाने पुलाजवळ एका मोकळ्या शेताच्या झुडपात पंकज मोरे हे लघुशंकेसाठी थांबले होते. नैसर्गिक विधी करत असताना त्यांना एक मृतदेह कुजलेल्या अवस्थेत दिसला. त्यांनी त्याची तात्काळ माहिती नायगांव पोलिसांना दिली. मयताच्या डोक्यात दगड मारण्यात आलं होतं. तसेच तीक्ष्ण हत्यारानं ही दुखापत करण्यात आल्याचे दिसून आले. पुरावा नष्ट करण्यासाठी दाट झाडीत मृतदेह टाकून देण्यात आला होता.
मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने मृतदेहाची ओळख पटवणे जिकरीचे होते. पोलिसांनी मिसिंग तक्रार शोधून, मयताची ओळख पटवली. मयताचे नाव लवेश माळी असल्याच समजल्यावर वसई गुन्हे कक्ष शाखा 2 च्या पथकाने तपास सुरू केला.
मित्रचं झाला वैरी, रिक्षाचा अपघात झाला म्हणून संपवलं
लवेश सोबत नशा करणाऱ्या त्याच्याच मित्रांनी त्याला ठार मारल्याचं भयानक वास्तव समोर आलं. तीन आरोपींपैकी एक अल्पवयीन आरोपी आहे. मृत लवेशने आरोपीच्या मालकीची ऑटोरिक्षा एका डंपरला ठोकली होती. त्यात रिक्षाची काच फुटली. मयताने रिक्षाचं नुकसान केल्याच राग मनात ठेवून, तिघांनी मयत लवेशची हत्या केली. हत्या करताना चौघांनी ही नशा केल्याच तपासात समोर आलं आहे. त्यानंतर नशेत असताना तिघांनी मिळून लवेशला संपवले. या प्रकरणी गुन्हे शाखा अधिक तपास करत आहेत.