खळबळजनक! नरबळीसाठी चिमुकलीचं अपहरण; दहा तासात सुटका, आरोपी गजाआड, पिंपरी चिंचवड पोलिसांची कमाल
Pimpari Chinchwad Police : पिंपरी चिंचवड पोलिसांना शिताफीने तपास करत नरबळीचा प्रकार उघडकीस आणला आहे. साडे तीन वर्षांच्या चिमुकलीची अवघ्या दहा तासातच अपहरणातून सुटका केली.
Pimpari Chinchwad Police : पिंपरी चिंचवड पोलिसांना शिताफीने तपास करत नरबळीचा प्रकार उघडकीस आणला आहे. साडे तीन वर्षांच्या चिमुकलीची अवघ्या दहा तासातच अपहरणातून सुटका केली. चिखली पोलीस आणि गुन्हे शाखेच्या दोनशे कर्मचाऱ्यांनी सीसीटीव्हीचा आधार घेतला आणि या संवेदनशील प्रकरणाचा उलगडा केला. याप्रकरणी चार आरोपींना अटक तर दोन अल्पवयीन ताब्यात घेण्यात आले.
जुन्नर येथील संतोष चौघुले आणि विमल चौघुले या दाम्पत्याला पैशाचा हव्यास सुटला होता. नरबळी केल्यास मालामाल होतात म्हणून गेल्या आठवड्यात चौघुले कुटुंबीयांनी नरबळीचा कट रचला. यासाठी एका बाळाची त्यांना गरज होती. विमल चौघुलेने याबाबत पिंपरी चिंचवडमध्ये वास्तव्यास असलेली तिची बहीण सुनीता नलावडेला याची कल्पना दिली. मग त्यांनी लगतच साडे तीन महिन्यापूर्वी आलेल्या कुटुंबाबाबत विमलला कळवलं. त्या कुटुंबात साडे तीन वर्षाची मुलगी होती. नरबळीसाठी तिचं अपहरण करायचं ठरलं.
अपहरणासाठी असा केला प्लान
यासाठी विमलने त्याच्या बारा वर्षाच्या मुलाला बहिणीच्या घरी पाठवलं. चार दिवसांपूर्वीच तो पिंपरी चिंचवडमध्ये आला, त्याच्यावर त्या चिमुकलीला विश्वासात घेण्याची जबाबदारी सोपवली. त्यानुसार तो आल्यापासून त्या चिमुकलीला खाऊ द्यायचा, तिच्यासोबत खेळायचा, तिला स्वतःचा मोबाईल खेळायला द्यायचा. अशा पद्धतीने चिमुकलीशी ओळख निर्माण केली. मग शनिवारी (23 जुलै) दुपारी खाऊ देतो असं सांगून, घरापासून दूर घेऊन गेला.
तिथं त्या बारा वर्षीय मुलाची आई म्हणजेच विमल थांबली होती. तिथून ते काही अंतर पुढं गेले आणि विमलने चिमुकलीला उचून घेतलं. तोंडावर कापड टाकलं आणि तिथून थेट जुन्नरचं घर गाठलं. विमलने मुलाला मात्र पिंपरी चिंचवडच्या बहिणीकडेच ठेवलं. पोलिसांना चक्राऊन सोडण्यासाठी ही खेळी आखण्यात आली होती. दुसरीकडे बराच वेळ झाला तरी आपली मुलगी घरी येईना म्हणून चिमुकलीच्या आईने चिखली पोलिसांकडे अपहरणाची तक्रार केली. पोलीस आयुक्त अंकुश शिंदेंना प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आलं होतं. तपास एपीआय तौफिक सय्यद यांच्याकडे सोपविण्यात आला. सोबतीला गुन्हे शाखेचे पथक देण्यात आलं.
जवळपास दोनशे कर्मचाऱ्यांचा तपास
जवळपास दोनशे कर्मचाऱ्यांनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही तपासले त्यात बारा वर्षाच्या मुलासोबत ती आढळली, म्हणून त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली. पण मी त्या दुकानातून लगेच घरी आलो, असं उत्तर त्याने दिलं. तिथून पुढच्या दुकानात ही तोच बारा वर्षाचा मुलगा चिमुकलीसोबत दिसला. मग मात्र तो खोटं बोलत असल्याचं निष्पन्न झालं. तरी तो मात्र कबुली देत नव्हता. मग तिच्या कुटुंबियांच्या घरी जुन्नर पोलिसांना पाठविण्यात आलं. तिथं ती चिमुकली आढळून आली. अवघ्या दहा तासात चिमुकलीची सुखरूप सुटका करण्यात आली. याप्रकरणात सहभागी चौघुले आणि नलवडे कुटुंबियातील चौघांना अटक आणि दोन अल्पवयीनांना ताब्यात घेतलं आहे. चौघुले कुटुंबियांना मार्गदर्शन करणारा कोणी भोंदूबाबा आहे का? याचा तपास सुरू आहे.