Kapaleshwar Mandir : कपालेश्वर मंदिराच्या दानपेट्यातील पैशांची मोजणी सुरू असतानाच चोरटा 'मालामाल', हनुमान मंदिरात दर्शन घेतलं, दानपेटीवर पिशवी टाकली अन्...
Nashik Crime News : कपालेश्वर मंदिराच्या दानपेट्यातील पैशांची मोजणी सुरू असतानाच मंदिर परिसरात खळबळजनक घटना घडली आहे.
नाशिक : पंचवटी (Panchavati) येथील कपालेश्वर मंदिरात (Kapaleshwar Mandir) सप्टेंबर महिन्यात दोन गुरवांमध्ये दानपेटीवरुन वादावादी झाली होती. या वादाचे व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाल्यानंतर धर्मादाय आयुक्तांनी मंदिरातील पाच दानपेट्या सिल केल्या होत्या. सिल केलेल्या दानपेट्यातील पैशांची गुरुवारी मोजणी सुरू असतानाच मंदिर परिसरात एका दानपेटीची चोरी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कपालेश्वर मंदिराबाहेरील परिसरात हनुमानाचे मंदिर (Hanuman Mandir) आहे. गुरुवारी कपालेश्वर मंदिर ट्रस्टच्या कार्यालयात दानपेट्यातील पैशांची मोजणी सुरू होती. या दरम्यान एक चोरटा मंदिर परिसरात आला. त्याने हनुमान मंदिरात सुरुवातीला दर्शन घेतले. त्यानंतर त्याने मंदिराच्या बाजूला उभे राहून आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज घेतला. आपल्याला कोणी बघत नाही हे लक्षात येताच चोरट्याने एक पिशवी काढली आणि टी दानपेटीवर टाकली. यानंतर चोरट्याने दानपेटी उचलून पोबारा केला. हा सर्व थरार मंदिराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सीसीटीव्हीमध्ये एक संशयित चोरी करताना आढळून आला आहे.
चार दानपेट्यांमधून निघाले 11 लाख रूपये
दरम्यान, कपालेश्वर मंदिरात चार दानपेट्या ट्रस्टच्या व एक पेटी गुरवांची आहे. या पेटीवरही प्रभाकर गाडे, हेमंत गाडे, अनिल भगवान, प्रभावती जगताप, अतुल शेवाळे या पाच गुरवांचा हक्क असल्याचे सांगितले जाते. ही गुरव मंडळी अनधिकृतपणे पेटी ठेवून भाविकांची दिशाभूल करीत असल्याने विद्यमान विश्वस्त व सर्व गुरव यांच्यात कोर्टात दावा सुरू आहे. या पाच गुरवांपैकी प्रभाकर गाडे व हेमंत गाडे यांच्यातही एकमेकांविरोधात कोर्टात दावे आहेत. काही महिन्यांपूर्वी प्रभाकर गाडे यांच्याकडे कपालेश्वर मंदिराचा कार्यभार होता. त्यामुळे दानपेटीच्या चाव्या त्यांच्याकडे होत्या. हा कार्यभार सप्टेंबरमध्ये संपला होता. नवीन कार्यभार हेमंत गाडे यांच्याकडे देणे गरजेचे होते. मात्र प्रभाकर गाडे यांनी तो हेमंत गाडे यांच्याकडे सुपूर्द करण्यास टाळाटाळ केली होती. त्यामुळे त्यांच्यात वादावादी झाली होती. यानंतर धर्मादाय आयुक्तांनी 25 सप्टेंबरला मंदिरातील पाच दानपेट्या सिल केल्या होत्या. या दानपेट्यांमधील पैशांची गेल्या तीन दिवसांपासून मोजणी सुरू होती. तेथील पाच पैकी चार दानपेट्या उघडण्यात आल्या. त्यातील पाचपैकी चार दानपेट्यांमधून 11 लाख 8 हजार 541 रूपये प्राप्त झाले आहे.
आणखी वाचा