(Source: ECI/ABP News/ABP Majha)
चौकीदार ही निकला चोर! PNB बँकेच्या हॉल इन्चार्जकडून LIC ला दोन कोटींचा गंडा; 106 बनावट वारसदार तयार केले अन्...; नाशिकमधील घटना
Nashik Crime News : पंजाब नॅशनल बँकेच्या एका हॉल इन्चार्ज अधिकाऱ्याने पंतप्रधान जीवन ज्योती विम्यासह अन्य केंद्रीय योजनांचे तब्बल दोन कोटी रुपये लाटल्याची घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे.
नाशिक : पंजाब नॅशनल बँकेच्या (PNB Bank) एका हॉल इन्चार्ज अधिकाऱ्याने पंतप्रधान जीवन ज्योती विम्यासह अन्य केंद्रीय योजनांचे तब्बल दोन कोटी रुपये बनावट विमाधारक उभे करुन लाटल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये (Nashik Crime News) उघडकीस आली आहे. या अधिकाऱ्याने पदाचा व बँकेच्या लॉग इन आयडीचा गैरवापर करुन पत्नी व कुटुंबासह नातलगांच्या बँक खात्यात या योजनांचे पैसे एनईएफटी करुन घेत एलआयसीला (LIC) व पीएनबीची फसवणूक केली आहे. दीपक मोतीलाल कोळी (40) असे संशयित हॉल इन्चार्ज अधिकाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी कॅनडा कॉर्नर येथील पंजाब नॅशनल बँकेच्या शाखा प्रबंधक लतीका मधुकर कुंभारे यांनी सरकारवाडा पोलिसांत फिर्याद नोंदविली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दीपक कोळी हे बँकेत जुलै 20242 पासून कार्यरत आहे. केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वी सामान्य नागरिकांसाठी प्रधानमंत्री जीवनज्योती विमा व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना सुरु केली आहे. या योजनेसाठी एलआयसी व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीची मास्टर पॉलिसी होल्डर म्हणून नेमणूक आहे. विमाधारक खातेदार मृत पावल्यावर वारसदाराने विमा रकमेचा दावा करण्यासाठी बँकेचा फॉर्म व इतर कागदपत्रे सादर केल्यावर ती बँकेकडून पडताळणी करून संबंधित एलआयसी किंवा ओरिएंटलच्या पोर्टलवर अपलोड केले जातात.
लॉग इन व पासवर्ड कुणालाही माहित नसल्यानं घातला गंडा
त्याचवेळी बँक खातेदारांना सुविधा पुरविण्याच्या कामावर देखरेख व समन्वय साधण्याचे काम दीपक कोळी पाहत होते. पंधरा लाख रुपयापर्यंतच्या कोणत्याही व्यवहारामध्ये निर्णय घेण्याचे अधिकार दीपकला होते. त्यामुळे दोन्ही विमा योजनांमध्ये प्रत्येक प्रकरणामधील दोन लाख रूपये रक्कम योजनेमधील सर्व लाभार्थ्यांना पुरविण्याचे काम कोळीच पाहत होता. त्याला दिलेला लॉग इन व पासवर्ड कुणालाही माहीत नसल्यामुळे त्याने हा गंडा घातला आहे.
106 बनावट वारसदार तयार केले अन्...
27 नोव्हेंबर रोजी बँकेतील लिपीक प्रतिभा कुमारी यांच्याकडे दीपकने 19 खातेधारकांची यादी दिली. त्यात त्यांचे केवायसी कागदपत्रांमधील आधारकार्ड नंबर काढून टाकत त्याऐवजी मतदार ओळखपत्र क्रमांक नोंद करण्यास सांगितले होते. प्रतिभा यांना या बाबीचा संशय आल्याने त्यांनी व्यवस्थापक कुंभारे यांना याबाबत माहिती दिली. हे प्रकरण संशयास्पद वाटल्याने कुंभारे यांनी या 19 खात्यांची माहिती घेतली. त्यातील आठ खात्यावर जीवन ज्योती योजनेतून विमा धारकांच्या वारसदारांच्या खात्यावर येणारे प्रत्येकी दोन लाख रुपये जमा झाले होते आणि हेच पैसे दीपक कोळीने स्वतः सह पत्नी, आई, वडील, भाऊ व इतरांच्या बँक खात्यावर एनईएफटी, आरटीजीएसद्वारे वळविल्याचे दिसून आले, यामुळे फसवणूक झाल्याचे उघडकीस आले. यात तब्बल 106 बनावट वारसदार तयार करत दाव्यांपोटी एलआयसीने वितरीत केलेले पैसे या अधिकाऱ्याने नातलगांच्या बँक खात्यांत वळते करत वैयक्तिक ‘मुदतठेव’ योजना राबविल्याचेही माहिती समोर आली आहे.
आणखी वाचा