Nashik Crime News : बनावट सोने विक्री प्रकरणातील आणखी कारनामे समोर, पानटपरी चालकाला पाच लाखांना गंडा
Nashik News : बनावट सोने विक्री प्रकरणातील टोळीचे आणखी काही प्रकरणे उघडकीस आले आहेत. शहरातील एका पानटपरी चालकाला या टोळीने बनावट सोने देत तब्बल पाच लाखांना गंडविल्याचा प्रकार घडला आहे.

Nashik Crime News नाशिक : आम्हाला खोदकामात सोन्याची मणी असलेल्या माळा सापडल्यात, अशी बतावणी करत 16 सोन्याचे मणी असल्याचे भासवून लोकांना गंडा घालणाऱ्या राजस्थानच्या (Rajasthan) तीन जणांना पोलिसांनी (Nashik Police) ताब्यात घेतले होते. आता या टोळीचे आणखी काही प्रकरणे उघडकीस येत आहेत.
शहरातील एका पानटपरी चालकाला या टोळीने बनावट सोने देत तब्बल पाच लाखांना गंडविल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका पानटपरी व्यावसायिकांकडे संशयितांची साथीदार गेले होते. पानटपरी चालकालाही खोदकामात जुन्या सोन्याच्या माळा सापडल्याचे सांगत संशयितांनी दोन सोन्याचे मणी टपरी चालकाला तपासण्यासाठी दिले.
कमी किमतीत सोने विकायचंय सांगून पाच लाखांत व्यवहार
पानटपरी चालकाने ते मणी सराफाकडून तपासून घेतले होते. त्यानंतर संशयितांनी बनावट सोन्याचे दागिने पानटपरी चालकासमोर ठेवले. कमी किंमतीत सोने विकायचे असल्याचे सांगत पाच लाखांमध्ये व्यवहार झाला. पानटपरी चालकाने त्याच्या घरातील सर्व सोने विकून पाच लाख रुपये जमा केले होते. ते पैसे त्याने संशयितांना दिले आणि संशयितांकडील सोन्याचे दागिने घेतले.
संशयितांना जेरबंद केल्याची माहिती मिळताच गाठले पोलीस ठाणे
संशयित फरार झाल्यानंतर पानटपरी चालकाने सोन्याच्या दागिण्यांची पुन्हा एकदा तपासणी केली. तेव्हा ते दागिने बनावट असल्याचे त्याला समजताच पानटपरी चालकाला मोठा धक्का बसला. मात्र, फसवणूक झाल्यामुळे बदनामी होईल या भीतीने पानटपरी चालकाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली नाही. संशयितांना पोलिसांनी जेरबंद केल्याची खबर लागताच पानटपरी चालकाने गुन्हे शाखेत धाव घेतली आणि आपल्यासोबत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.
दोन तक्रारी दाखल
गुरुवारी तवली फाटा परिसरातून केशाराम पिता सवाराम (रा. बागरियोका वास, रानीवाडा, जि. सांचोर, राज्यस्थान), बाबुभाई लुंबाजी मारवाडी (रा. आदीवाडा, मारवाडीवास, गांधीनगर, गुजरात), रमेशकुमार दरगाराम (रा. बागरा, जि. जालोर, राज्यस्थान) यांना शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली होती. संशयितांनी त्याच दिवशी एका उद्योजकाला बनावट सोन्याच्या माळा देत 20 हजारांना गंडा घातला होता. याप्रकरणी पोलिसांनी संशयितांचा तवली फाट्यापर्यंत पाठलाग करीत त्यांना अटक केली होती. गुन्हा दाखल होताच पंचवटीतील चहा विक्रेता व नाशिकरोडचे एक व्यावसायिकाची तक्रार पोलिसांकडे दाखल झाली आहे.
संशयितांचे साथीदार फरार
शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने तिघा संशयितांना अटक केल्यानंतर तवली फाटा परिसरात असलेल्या संशयितांच्या पालाच्या ठिकाणी जाऊन मुद्देमाल जप्त केला. संशयितांनी चौकशीसाठी आणल्यानंतर पोलिसांचे दुसरे पथक पंचनामा करण्यासाठी पुन्हा तवली फाटा परिसरात पोहोचले असता, संशयितांचे साथीदार, कुटुंबीय पसार झाले होते.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
