'प्रियकराच्या मदतीनं पत्नीनं पतीला संपवलं, नवऱ्यानं बायकोचा काटा काढला'; अशी प्रकरणं का वाढताहेत? क्रिमिनल सायकॉलॉजी काय?
कुठं पत्नीला मारलं जातंय तर कुठं प्रियकर अन् प्रेयसीचा काटा काढला जातोय. तर कुठं लहान मुलं देखील या घटनांमध्ये बळी पडत आहेत. या घटनांमध्ये अलीकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
Crime News: चंद्रपूरमध्ये अनैतिक संबंधातून शिक्षक प्रियकराच्या मदतीनं पतीची हत्या केली. सोलापुरात प्रियकराच्या मदतीनंआपल्या पतीची हत्या करणाऱ्या पत्नीला प्रियकरासह बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तिकडे बेळगावमध्ये अनैतिक संबंधांतून महिलेसह दोन मुलांची निर्घृण हत्या करण्यात आली. तर पनवेलमध्ये अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्यानं प्रेयसीने प्रियकराच्या पत्नीची सुपारी दिली. कुठं पतीला मारलं जातंय, कुठं पत्नीला मारलं जातंय तर कुठं प्रियकर अन् प्रेयसीचा काटा काढला जातोय. तर कुठं लहान मुलं देखील या घटनांमध्ये बळी पडत आहेत. या घटनांमध्ये अलीकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
या घटना नेमक्या का वाढत आहेत? या घटनांच्या मागे नेमकी क्रिमिनल सायकॉलॉजी काय आहे? काय कारणं आहेत ज्यामुळं या घटना वाढत आहेत? याचा काही तज्ञांशी संवाद साधून आढावा घेण्याचा प्रयत्न आम्ही केला. यामध्ये सर्वात महत्वाचं कारण समोर आलं ते म्हणजे टेक्नॉलॉजी अर्थात मोबाईल. शिवाय नात्यांमधील घसरत चाललेली नैतिकता हे देखील यामागचं एक कारण असल्याचं काही तज्ञांचं म्हणणं आहे.
मानसोपचार तज्ञ डॉ. संग्राम धालगडे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, अशा गुन्ह्यांमधील व्यक्ती मुळात पर्सनॅलिटी डिसऑर्डर असतात. सामान्य माणसाची मानसिकता अशी नसते. अॅन्टी सोशल व्यक्ती असतात ज्या अशी कृत्य करतात. अशा केसेसमध्ये संस्कार हा शब्द फार महत्वाचा असतो. सध्या नैतिकता वगैरे गोष्टींवर जास्त विचार होताना दिसत नाही. तात्पुरत्या फायद्यासाठी अनेकदा अशा गोष्टी घडतात. पुरुष असो वा स्त्री, अशा लोकांबरोबर राहणंच मुळात चुकीचं आहे, असं डॉ धालगडे सांगतात.
डॉ धालगडे सांगतात की, नवरा आणि बायकोचं एकमेकांवर प्रेम नसतं असं नाही. मात्र काही चुका झाल्यानंतर किंवा संवाद होत नसल्यास कुठेतरी भावनिक सहारा शोधला जातो. मग ती भावनिकता वाढीस जाते, हवीहवीशी वाटते आणि त्यात आपल्या पार्टनरविषयीचा राग भरीस असतोच, त्यामुळं मग टोकाची पावलं उचलली जातात.
काही केसेस या मायक्रो सायकॅटिक एपिसोडमधील असतात. यामधील व्यक्ती हा एकदम व्यवस्थित असतो. मात्र अचानक असं काहीतरी होतं आणि त्या व्यक्तिकडून टोकाची पावलं उचलली जातात. असं काही कृत्य आपल्याकडून घडलंय हे देखील अनेकांना कळत नाही, नंतर पश्चातापाशिवाय त्यांच्याकडे काहीच नसतं. क्षुल्लक कारणंही एखाद्याला संपवण्यासाठी पुरेसी ठरतात, असं डॉ धालगडे सांगतात.
कायद्याचे अभ्यासक अॅड सचिन झालटे पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, पती-पत्नीच्या संबंधांतील नैतिक मूल्य हरवत चालल्याची उदाहरणं म्हणजे अशा घटना आहेत. सध्या अशी प्रकरणं वाढत चालली आहेत. या गुन्ह्यांच्या पाठिमागे इज्जत, इगो अशा गोष्टी प्रामुख्यानं आहेत. अनैतिक संबंध किंवा प्रेमप्रकरणं आधीही होत नव्हती अशातला भाग नाही मात्र आता ती उघड होण्याचं प्रमाण वाढलं आहे. याला कारणीभूत आहे आजचं तंत्रज्ञान. शिवाय सध्या वेब सीरिज किंवा टीव्ही मालिकांमधील क्राईमच्या कथानकांनी अशा वृत्तींना आयडिया देखील लवकर मिळत आहेत. आपण अशा प्रकारच्या बातम्या देखील वाचतो, असंही ते म्हणाले.
मग उपाय काय?
डॉ संग्राम धालगडे यांनी सांगितलं की, यासाठी नात्यांमध्ये संवाद होणं फार गरजेचं आहे. मग ते नातं कुठलंही असो. संवादानं बऱ्याच गोष्टींवर उपाय निघतो. हल्ली संवाद होत नाही. शिवाय काही केसेसमध्ये सामोपचाराने निर्णय घेतला तर अशा वळणावर जात नाही, मात्र अशा शक्यता फार कमी उरतात, असंही ते म्हणाले. तर कायद्याचे अभ्यासक अॅड सचिन झालटे पाटील यांनीही यावर उपाय सांगताना संवादाचं महत्व अधोरेखित केलं. प्रत्यक्ष व्यक्तीशी संवाद व्हायला हवा. अशा प्रकरणात बऱ्याचदा मध्यम मार्ग उपलब्ध होत नाही. आधी आपल्याकडे एकत्र कुटुंबपद्धती होती. तिथं कुणीतरी एखादा व्यक्ती आपल्याला मन मोकळं करायला मिळायचा, आता तसं होत नाही. शिवाय झालटे यांनी सांगितलं की, नात्यांना वेळ देताना मोबाईलसारख्या गोष्टींना जरा दूर ठेवणं गरजेचं आहे.
एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यानं सांगितलं की, आम्ही अशा केसेस हाताळतो. अशा घटना घडण्यासाठी इगो, इज्जत अशा गोष्टी प्रामुख्यानं कारणीभूत ठरतात. नवरा-बायकोमध्ये वाद असला आणि दुसरीकडे प्रेम झालं तर समोरच्याला संपवायचंच ही मानसिकता काही काळासाठी निर्माण होते. अशा वेळी सामोपचार महत्वाचा असतो. सामोपचाराने चर्चा करुन आणि त्या नात्यातून वेगळं होऊन नवं नातं स्वीकारलं जाऊ शकतं, मात्र तसं फार कमी होताना दिसतंय, असं अधिकाऱ्यानं सांगितलं.
इतर महत्वाच्या बातम्या