LIC IPO GMP : ग्रे बाजारात एलआयसी IPO चा दर घसरतोय; अखेरच्या दिवशी झाला होता तीन पट सब्सक्राइब
LIC IPO GMP : ग्रे बाजारात एलआयसी आयपीओ प्रीमियम दरात घसरण होत असल्याने गुंतवणुकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
LIC IPO GMP : भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या ( LIC IPO)आयपीओसाठी बोली लावण्याचा सोमवारी अखेरचा दिवस होता. अखेरच्या दिवशी पॉलिसधारकांसाठी असलेल्या आरक्षित कोट्यासाठी सर्वाधिक सब्सक्रिप्शन मिळाले आहेत. तर, कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या कोट्यातूनही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. किरकोळ गुंतवणुकदारांनीदेखील भरभरून प्रतिसाद दिला आहे. मात्र, ग्रे बाजारात एलआयसीच्या आयपीओ दरात घट होत असल्याचे चित्र आहे.
एलआयसी आयपीओच्या माध्यमातून सरकार आपला 3.5 टक्के हिस्सा विक्री करून 21 हजार कोटी रुपये उभारत आहे. कंपनीने यासाठी 902 ते 949 रुपये प्रति शेअर दर इतकी किंमत निश्चित केली आहे. अँकर गुंतवणुकदारांकडून एलआयसीने जवळपास 5627 कोटी रुपये जमवले आहेत.
पॉलिसीधारक आणि कर्मचाऱ्यांच्या कोट्यातून आयपीओला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पॉलिसीधारकांच्या कोट्यातून जवळपास 6 पटीने सब्सक्रिप्शन मिळाले आहे. तर, कर्मचाऱ्यांच्या कोट्यातून आयपीओ जवळपास 4.32 पटीने सब्सक्राइब झाला आहे. संस्थात्मक गुंतवणुकदारांच्या (QIB) कोट्यात 2.83 पटीने सब्सक्राइब झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे.
ग्रे बाजारात घसरण
ग्रे बाजारात एलआयसी आयपीओच्या प्रीमियम दरात घसरण सुरू आहे. ग्रे बाजारात प्रीमियम दरात कपात झाली असून 40 रुपयांवर आला आहे. ग्रे बाजारात एलआयसी आयपीओचा प्रीमियम दर 105 रुपयांपर्यंत गेला होता. एलआयसी आयपीओ खुला झाला तेव्हा एवढा दर सुरू होता. त्यानंतर आतापर्यंत जवळपास 60 टक्क्यांनी दर घटला आहे.
आयपीओ खुला होण्यापूर्वी एलआयसीचा ग्रे बाजारातील दर 85 रुपयापर्यंत आला होता. सोमवारी ग्रे बाजारात सुरू असलेला दर पाहता एलआयसी लिस्ट होताना 40 रुपयांच्या प्रीमियम दरावर वाढू शकतो. एलआयसी बाजारात लिस्ट होताना 949 रुपये +40 रुपयांचा प्रीमियन अशा 989 रुपयांवर लिस्ट होऊ शकतो.
'आयपीओमध्ये आत्मनिर्भर भारताची ताकद दिसली'
या आयपीओमधून आत्मनिर्भर भारताची ताकद दिसून आली आहे. आपल्या देशातील गुंतवणूकदारांमध्येही गुंतवणूक करण्याची क्षमता आहे हे यातून अधोरेखित झालं असल्याचं, डिपार्टमेन्ट ऑफ इन्व्हेस्टमेन्ट अॅन्ड पब्लिक असेट मॅनेजमेन्टचे (DIPAM) सचिव तुहीन कांत पांडे यांनी म्हटलं.