Home Loan घेताय, पण ते चुकवणार कसे? कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी EMI भरताना या टिप्स फॉलो करा
Home Loan : दीर्घकालीन कर्ज भरताना त्याचे हप्ते कसे भरायचे, काही अडचण आली तर त्याचं नियोजन कसं करायचं असे अनेक प्रश्न आपल्यासमोर असतात.
मुंबई: आजच्या काळात प्रत्येकालाच आपल्या स्वप्नातील घर असावं असं वाटतं. एखाद्या शहरात नवीन घर घ्यायचं म्हटल्यास मोठी किंमत मोजावी लागते, त्यासाठी बँकेतून कर्ज (Home Loan) काढावं लागतं. हे कर्ज 15 ते 20 वर्षांच्या दीर्घमुदतीचं असतं, त्यामुळे तोपर्यंत त्याचा व्याजासकट ईएमआय (EMI) भरावा लागतो. या दीर्घ कालावधीसाठी कर्जाची परतफेड करताना मध्यमवर्गीय, नोकरदार वर्गाला अनेक चिंता लागल्या असतात. त्यामध्ये समस्या उद्भवली आणि गृहकर्ज अडकले तर काय होईल? इतके दिवस कर्ज कसे फेडणार? काही वर्षानंतर हे कर्ज एक ओझे बनू लागते. पण असं असलं तरी वेळेपूर्वी कर्ज फिटू शकतं, तुमच्या कर्जाचं ओझं वेळेआधीच संपू शकतं. त्यासाठी काही गोष्टी तुम्हाला अवलंबाव्या लागतील.
प्री पेमेंटचा पर्याय
कर्जाचा कालावधी कमी करण्यासाठी, तुम्ही कर्जाच्या प्री-पेमेंटचा पर्याय निवडू शकता. त्यामुळे तुमच्या हाती एखादी मोठी रक्कम आली तर ती तुम्ही कर्जासाठी भरू शकता आणि तुमच्या कर्जाच्या हप्त्याची रक्कम कमी करू शकता. यामुळे तुमच्या कर्जाची मूळ रक्कमही कमी होते आणि कालावधीही कमी होतो. जर तुम्ही कर्जाची मुदत कमी केली तर एकीकडे तुमचे टेन्शन कमी होईल आणि दुसरा फायदा म्हणजे तुम्हाला बँकेला कमी व्याज द्यावे लागेल.
ईएमआय वाढवणे, एखादा हप्ता
कर्जाचा बोजा लवकरात लवकर कमी करण्याचा एक मार्ग म्हणजे तुमचा EMI वाढवणे. जर तुम्ही नोकरी बदलली आणि तुमचे पॅकेज चांगले झाले तर तुम्ही हा पर्याय निवडू शकता. म्हणजे दरवर्षी एखादा जास्तीचा हफ्ता तुम्ही भरला तर कर्जाचा कालावधी आपोआप कमी होतो. याद्वारे तुम्ही कर्ज परतफेडीचा कालावधी कमी करू शकता. असे अनेक पर्याय आहेत जे तुम्हाला वार्षिक आधारावर होम लोन इन्स्टॉलमेंट रिव्हिजन करण्याचा पर्याय देतात.
मालमत्ता खरेदी करताना अधिक डाउन पेमेंट करा
कर्जाची रक्कम जितकी जास्त असेल तितकी तुम्हाला त्याची मुदत वाढवावी लागेल. कारण अल्प कालावधीसाठी ईएमआय मोठा बसेल. त्यामुळे त्याची परतफेड करणे कठीण होईल. म्हणून मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी जास्तीत जास्त डाउन पेमेंट करा. तुम्ही किमान 25 टक्के डाउन पेमेंट करा आणि 75 टक्के रक्कम कर्ज म्हणून घ्या. असं जर गणित बसलं तर त्यामुळे कर्जाची परतफेड करणं अधिक सोईचं होईल. तसेच तुम्ही तुमच्या सोयीनुसार कर्ज परतफेडीचा कालावधी मिळवू शकता.
ही बातमी वाचा: