'या' वस्तूंच्या निर्यातीवरील बंदी कायम राहणार, मंत्री पियूष गोयलांची माहिती
देशात खाद्यपदार्थांच्या किमती वाढू नयेत, यासाठी सरकारनं अनेक वस्तूंच्या निर्यातीवर निर्बंध (Export Ban) लादलेत. अशातच आता वाणिज्य मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे.
Export Ban: देशात खाद्यपदार्थांच्या किमती वाढू नयेत, यासाठी सरकारनं अनेक वस्तूंच्या निर्यातीवर निर्बंध (Export Ban) लादले आहेत. अशातच आता वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी या वस्तूंच्या निर्यातीवरील बंदी कायम राहणार असल्याचे सांगितले आहे. गहू, तांदूळ आणि साखरेच्या निर्यातीवरील बंदी उठवली जाणार नाही, अशी माहिती मंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे. अर्थसंकल्पापूर्वीच सरकारनं ही मोठी घोषणा केली आहे.
गहू, तांदूळ आणि साखरेवरील निर्यातबंदीबाबत सरकारने पुन्हा एकदा परिस्थिती स्पष्ट केली आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी स्पष्टपणे सांगितले की, या खाद्यपदार्थांच्या निर्यातीवरील बंदी सध्या उठवली जाणार नाही. केंद्र सरकार अशा कोणत्याही प्रस्तावावर विचार करत नाही. देशात गहू आणि साखरेची पुरेशी उपलब्धता असल्याचेही ते म्हणाले. त्याच्या आयातीची गरज भासणार नाही असंही त्यांनी सांगितले.
निर्यातबंदी हटवण्याबाबतचा कोणताही प्रस्ताव नाही
केंद्र सरकारकडे निर्यातबंदी हटवण्याबाबतचा कोणताही प्रस्ताव नाही. देशांतर्गत मागणीमुळं गहू, तांदूळ आणि साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आल्याचे पियुष गोयल यांनी सांगितले. आमच्याकडे त्यांची उपलब्धता पुरेशा प्रमाणात आहे. आमच्या देशांतर्गत गरजा पूर्ण करण्यासाठी आम्हाला त्यांची आयात करण्याचीही गरज नसल्याचे गोयल म्हणाले.
महागाई नियंत्रणात आणण्यासाठी पावले उचलण्यात आली
भारताने मे 2022 मध्ये गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. यानंतर जुलै 2023 मध्ये गैर-बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली. याशिवाय ऑक्टोबर 2023 मध्ये साखर निर्यातीवरही बंदी घालण्यात आली होती. देशातील वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने ही पावले उचलली होती. याशिवाय भारत आटा आणि भारत दालही स्वस्त दरात बाजारात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तांदूळ इंडोनेशिया, सेनेगल आणि गॅम्बियाला पाठवले
निर्यातीवर बंदी असतानाही भारताने आपले मित्र देश इंडोनेशिया, सेनेगल आणि गांबिया यांना तांदूळ पुरवला आहे. निर्यातीवरील बंदी उठताच त्यांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता असल्याचे गोयल यांनी सांगितले. सरकार 19 ते 23 रुपये प्रतिकिलो दराने शेतकऱ्यांकडून मुबलक प्रमाणात कांदा खरेदी करत आहे. कांद्याचे भाव वाढल्यानंतर त्याच्या निर्यातीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती. किरकोळ चलनवाढीचा दर डिसेंबर 2023 मध्ये 5.69 टक्क्यांवर गेला आहे. हा जर चार महिन्यांतील उच्चांकीवर पोहोचला आहे.
कमी पावसाचा गहू, तांदूळ आणि ऊस उत्पादनावर परिणाम
कमी पावसामुळं गहू, तांदूळ आणि ऊसाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळं मैदा, तांदूळ, साखर महाग होऊ लागली आहे. यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमुळं देशांतर्गत बाजारपेठेत या वस्तूंची उपलब्धता वाढावी, यासाठी सरकारने या वस्तूंची निर्यात तातडीने बंद केली होती. मात्र, सरकारच्या या निर्णयाचा निर्यातीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Onion Export Ban : कांदा निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांचे तब्बल हजार कोटीचे नुकसान, विवाह सोहळ्यांनाही बसला फटका