एक्स्प्लोर
Advertisement
घुमक्कडी (13) : सांवरे अई जइय्यो जमुना किनारे
दिवाळीशी निगडित अनेक प्राचीन कथा आहेत. त्यातली माझी सर्वात आवडती आहे ती यमुना नदीची कहाणी. सुमेरू वा कलिंद पर्वताची कन्या म्हणून हिचं दुसरं नाव कलिंदजा वा कालिंदी. गंगा ज्ञानाचं प्रतीक आणि ही भक्तीचं. म्हणून भक्तकवींना ही अधिकच प्रिय. ब्रजभाषेत हिच्यावर असंख्य कविता रचल्या गेल्या आहेत. काही लोक हिला काळी गंगा असंही म्हणतात. तर आधी हिची दिवाळीतली गोष्ट वाचू.
सूर्याची पत्नी संवर्णा वा संज्ञादेवी. छाया तिची धाकटी बहीण असं कुणी म्हणतात, तर कुणी तिला संज्ञाची सावली मानतात. सूर्य जितका उजळ, छाया तितकीच काळीकुट्ट. यम आणि यमुना ही तिची दोन मुलंही तिच्याच सारखी काळी. सूर्याच्या दाहाने आपण तर त्रासलो, पण तोच त्रास आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नये म्हणून ती सूर्यलोकातून मुलांना घेऊन पृथ्वीवर निघून आली आणि उत्तर ध्रुवप्रदेशात राहू लागली. तिथं तिनं अजून दोन मुलं जन्माला घातली – ताप्ती आणि शनी. यानंतर तिचं यमाशी वागणं बदललं. त्याला सावत्रपणाची वागणूक मिळू लागली. त्यामुळे यम दुखावला गेला. आईला सोडून निघून जाऊन त्याने आपली ‘यमनगरी’ वसवली. चुका करणाऱ्या माणसांना कठोर दंड करणारा राजा म्हणून तो ख्यातकीर्त झाला; इतका की मृत्युदंड देणारा किंबहुना प्रत्येक जीवाला मरण देणारा तोच असे मानले जाऊ लागले. त्याचा भाऊ शनी देखील पापी, गुन्हेगारांना शिक्षा देणारा! पण महत्त्वाकांक्षी आणि क्रूर. सर्व लोकांचा राजा बनायचं होतं त्याला; पण बापाशी त्याचं पटलं नाही आणि पत्नीचाही शाप भोवला. पुत्र व्हावा या अपेक्षेने त्याची पत्नी ऋतुस्नान झाल्यानंतर त्याच्याकडे गेली. तिने बराच काळ वाट पाहूनही तो आला नाही, तेव्हा संतापून तिने त्याला शाप दिला की, ज्याच्याकडे तुझी नजर जाईल त्याचे अनिष्ट होईल... तो नष्ट होईल! तेव्हापासून शनी खाली मान घालून बसलाय.
... तर यमापाठोपाठ यमुनेनेही आईचं घर सोडलं आणि ‘गो लोका’त राहण्यास गेली. तिने अनेकवेळा भावाला आपल्याघरी जेवण्यास बोलावलं, पण यमाला कामातून सवडच मिळेना. अखेर एकदाचा वेळ मिळाला तेव्हा तो गो लोकात बहिणीला भेटायला गेला. विश्रामघाटावर त्यांची भेट झाली. बहिणीच्या हातचं स्वादिष्ट भोजन करून यम प्रसन्न झाला आणि त्याने तिला काय हवं ते वरदान मागण्यास सांगितलं. यमुनेची मागणी थोर होती. जी व्यक्ती यमुनेत स्नान करेल, तिला यमलोकात जावं लागणार नाही; असं वरदान तिने मागितलं. यम धास्तावला. अशाने सगळेच यमुनेत स्नान करून यमलोकापासून मुक्त झाले असते आणि कुणाला धाक राहिलाच नसता. कुणी कायदे – नियम पाळले नसते. नवे कायदे रुजवण्याचा काळ होता तो. पूर्वी यमुनेने मागणी केल्यावर त्याने बहीण-भावंडात लैंगिक संबंध नकोत... हे स्पष्ट सांगितलं होतं; हा नियम सर्वत्र रुजत होता. विवाहसंस्था बळकट होत होती. शेती वाढली होती. मातेचे प्राबल्य सरून पुरुषसत्ता प्रस्थापित होत होती. यम काळजीत पडलेला पाहून यमुनेनेच मार्ग काढला आणि ज्या दिवशी तो तिच्याकडे जेवायला आला होता, त्या दिवशी म्हणजे यमद्वितीयेला जी व्यक्ती यमुनेत स्नान करेल, तिला यमलोकात जावं लागणार नाही; असं वरदान मागितलं. यमाने ते आनंदाने दिलं. या तिथीला जे भाऊ बहिणीच्या घरी जाऊन जेवणार नाहीत, तिला भेट देणार नाहीत, त्यांना यमलोकात घेऊन जाईन; असंही सांगितलं. ‘भाऊबीज’ म्हटले तरी हा दिवस ‘सिस्टर्स डे’च आहे एका अर्थी. जमिनींची मालकी भावांकडे गेली आणि मालमत्तेत बहिणीला वाटा मिळणार नाही हे स्पष्ट झालं; तरी परंपरा चटकन मोडणे शक्य नसतंच. नवं धान्य, भाजीपाला, फळफळावळ घेऊन वर्षातून एकदा या दिवशी भाऊ बहिणीला तिच्या हिश्शापोटी वानवळा तरी देऊ लागला. काळानुसार या ‘भेटवस्तू’ बदलत गेल्या आणि मग ‘रिटर्नगिफ्ट’ देखील रुळले; तरी ही रीत टिकून आहेच अजून.
यमुनेची भूमिका पुढच्या काळात बदलली. बहिणीऐवजी तिचीही ओळख गंगेप्रमाणे ‘आई’ अशीच झाली. अवघी ब्रजसंस्कृती तिच्याच तर किनाऱ्यावर जोपासली गेली, वाढली. स्वभावाने ‘गंभीर’ तर ती आधीपासूनच होती.
पार पुराणकाळापासून यमुनेच्या शेकडो कहाण्या सापडतात; श्लोक, आरत्या, लोकगीतं आणि कवितादेखील कैक! गंगेमुळे तिचं महत्त्व कमी झालं तरी तिला गंगेचा मत्सर कसा तो नाहीच; गंगेला जाऊन नुसती दुरून नव्हे तर अगदी गळाभेट घेऊन तिच्यात मिसळूनच पुढे जातात दोघी सोबतीने. गंगेहून मोठी आहे ती. थोरली. तिला धाकटीचा मत्सर तरी का वाटावा? गंगा शंकराच्या डोक्यावर जाऊन बसली, तरी कालिंदी कृष्णाच्या हृदयात आहे. भक्तकवी नंददास म्हणतो, “कृष्ण सर्वांची मने हरतो, पण कृष्णाचं मन हरते ती यमुनाच. तिचा वियोग कृष्ण क्षणभरही सहन करू शकत नाही.”
सोळाव्या शतकातल्या भार्गवपुराणाच्या प्रतीत यमुनेची सुंदर चित्रं पाहण्यास मिळतात. बाळकृष्णाला टोपलीतून घेऊन पावसात यमुना ओलांडणारा वासुदेव, यमुनेच्या डोहात कालियामर्दन करणारा कृष्ण, यमुनेत स्नान करणाऱ्या गोपींची वस्त्रे पळवणारा कृष्ण... किती देखणी रूपं! कवींप्रमाणेच चित्रकार आणि शिल्पकारांना देखील यमुनेने भुरळ घातलेली आहेच.
आता काळ्या यमुनेवरचा प्रदूषणाने जमलेला पांढरा फेस बघवत नाही. लोक त्यातच उतरून स्नान करतात, तेव्हा ते यमलोकातच आहेत असं वाटतं. कचरा, घाण आणि पावित्र्य यांची एक विचित्र सांगड आपल्याकडे घातली गेली आहे. जी जी स्थानं धार्मिक पावित्र्य असलेली मानली जातात, ती हमखास अस्वच्छ आणि गलिच्छ असणार अशी धास्तीच पहिल्यांदा मनात निर्माण होते. नरक याहून निराळा काय असणार?
एका दिवाळीला मी आदिवासी भागात वास्तव्याला होते. घरातल्या प्रौढ स्त्रीने सुकलेल्या फळांचे सुंदर दिवे बनवले. देवाजवळ, दाराशी ठेवून झाल्यावर एक दिवा अंगणाच्या एका कोपऱ्यात कचऱ्याचा ढीग होता त्यावर ठेवला. ते पाहून मी चकित झाले होते. वाटलं, कचराही दिसायला हवाच! दिसला तरच तो नष्ट करता येऊ शकतो.
तापदायक नवऱ्यापासून दूर राहणारी छाया, लैंगिक अधिकार न देणाऱ्या नवऱ्याला शाप देणारी शनीपत्नी, स्वतंत्र राहणारी यमुना... हा सगळ्या बाया धाडसीच! त्यांच्याकडून थोडं धाडस, कष्टाचं बळ उसनं घेऊन दिवाळीत स्वच्छता मोहीम राबवतातच बायका... ती घराबाहेरही न्यावी आणि आपल्या नद्यांची काळजी घ्यावी. अखेर नदी आणि आपण वेगळ्या थोडीच आहोत?
‘घुमक्कडी’ ब्लॉग मालिकेतील याआधीचे ब्लॉग :
घुमक्कडी (12) : आईच्या आधी लेकीला न्हाण आलं हो…!
घुमक्कडी (11) : इज्जत जाईल, पण प्रियकर राहील!
घुमक्कडी (10) : तुमच्या हातात एक फूल दिलं, तर…
घुमक्कडी (9) : सासू-सुनांच्या विहिरी आणि तळी
घुमक्कडी (8) : फूल जंगल मे खिले किन के लिये
घुमक्कडी (7) : हुंकारकुपातले हरिण
घुमक्कडी (6) : वेगळ्या जागेवरून पाहताना
घुमक्कडी (5) : मिठाचा शुभ्र खारट खडा!
घुमक्कडी (4) साता प्रश्नांची कहाणी
घुमक्कडीः (3) न नींद नैना, ना अंग चैना
घुमक्कडी : (2) सीतेची तहान
घुमक्कडी : आभाळाचा कागद, समुद्राची शाई
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement