इंद्रजीत सावंत यु-ट्यूबमधून चुकीची माहिती पसरवतात; करनी सेनेचा आरोप, पोलिसात तक्रार
इतिहासकार इंद्रजीत सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी करनी सेनेच्यावतीने करण्यात आली आहे. करनी सेना अध्यक्ष अजय सिंग सेंगर यांच्याकडून खांन्देश्वर पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी अर्ज

मुंबई : छावा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर पुन्हा एकदा इतिहासात डोकावून पाहत चिकित्सा होऊ लागली. छावा सिनेमानंतर काही वादही समोर येऊ लागले, सिनेमातील गणोजी, कान्होजी या पात्रामुळे शिर्के कुटुंबीय संतापले तर दुसरीकडे इतिहासकार इंद्रजीत सावंत यांच्यासह अनेक इतिहास संशोधकांनी चित्रपटावर आपली भूमिका मांडली. दरम्यान, काही दिवसांपूर्वी इंद्रजीत सावंत (Indrajit sawant) यांना धमकीचा फोन आला होता. या धमकीच्या फोनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली होती. इंद्रजीत सावंत यांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीचं नाव प्रशांत कोरटकर असल्याचा दावा केला होता. त्यानंतर त्यांनी कोल्हापूर पोलिसात तक्रार देखील दिली होती. ही घटना उघडकीस आल्यानंतर प्रशांत कोरटकर यांनी हा आवाज आपला नसल्याचं म्हटलं होतं. मात्र, त्यानंतर ते फरार झाले आहेत. एकीकडे हा वाद सुरु असतानाच आता करनी सेनेनं (Karni sena) इंद्रजीत सावंत यांच्यावर गुन्हा करण्याची मागणी केली आहे.
इतिहासकार इंद्रजीत सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी करनी सेनेच्यावतीने करण्यात आली आहे. करनी सेना अध्यक्ष अजय सिंग सेंगर यांच्याकडून खांन्देश्वर पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. इतिहासकार इंद्रजीत सांवत हे ब्राह्मण आणि राजपूत यांच्या विरोधात यु-ट्यूब चॅनलमध्ये चुकीची माहिती पसरवत असल्याचा आरोप सेंगर यांनी केला आहे. वारंवार ब्राम्हण आणि राजपूत समाजाविरोधात इंद्रजीत सावंत यांच्याकडून स्टेटमेंन्ट करण्यात येते. विदेशी लेखकांचा इतिहास वाचून इंद्रजीत सावंत बोलत असल्याचा आरोपही करनी सेनेच्या सेंगर यांनी केला आहे. त्यामुळे, त्यांच्यावर समाजात दुही माजवली जात असल्याने त्यांच्या गुन्हा दाखल करावा अशी मागणी करनी सेनेच्यावतीने करण्यात आली आहे. त्यामुळे, एकीकडे इंद्रजीत सावंत आणि प्रशांत कोरटकर यांच्यात वाद सुरू असतानाच सावंत यांच्याविरुद्ध करनी सेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.
कोरटकर कुटुंबीनाही धमक्या
प्रशांत कोरटकर यांनी इंद्रजीत सावंत यांना दिलेल्या धमकी प्रकरणानंतर कोरटकर यांनाही अनेकांकडून धमकी देण्यात आली. सोशल मीडियावरुनही त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल सुरू आहे. त्यामुळे, प्रशांत कोरटकर यांच्या पत्नीने नागपूरच्या बेलतरोडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून समाजमाध्यमातून त्यांना धमक्या येत असल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे.


















