Abu Azmi: औरंगजेब उत्तम प्रशासक, त्याच्या काळात भारताचा जीडीपी 24 टक्के अन् बॉर्डर अफगाणिस्तानापर्यंत पसरली होती: अबू आझमी
Abu azmi on Shivaji Maharaj: औरंगजेबाच्या काळात भारतात अनेक मंदिरं बांधण्यात आली. त्यावेळी भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर 24 टक्के इतका होता, असे अबु आझमी यांनी म्हटले.

मुंबई: औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता. त्याच्या राजवटीत भारताची सीमा ही अफगाणिस्तान आणि बर्मा देशापर्यंत होती, असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन वादंग निर्माण झाला आहे. औरंगजेब (Aurangzeb) हा उत्तम प्रशासक होता. त्याच्या काळात भारताला 'सोने की चिडीयाँ' म्हणायचे. औरंगजेबाच्या राजवटीत भारताचा जीडीपी 24 टक्के इतका होता. त्यामुळेच इंग्रज भारतात आले, असे अबू आझमी (Abu Azmi) यांनी म्हटले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि औरंगजेब यांच्यातील लढाई धार्मिक नव्हती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील लढाई ही राजकीय होती, असेही त्यांनी म्हटले. ते सोमवारी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी विधिमंडळाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
देशात सध्या औरंगजेबाची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने रंगवली जात आहे. औरंगजेबाने त्याच्या काळात अनेक मंदिरं बांधली होती. औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता. त्या काळातील लढाई ही धर्मासाठी किंवा हिंदू-मु्स्लीम अशी नव्हती, असे अबू आझमी यांनी सांगितले.
यावेळी अबू आझमी यांना औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना (Chhatrapati Sambhaji Maharaj) ज्याप्रकारे मारले, ती कृती योग्य होती का, असा सवालही विचारण्यात आला. मात्र, अबू आझमी या प्रश्नाचे उत्तर न देता तेथून निघून गेले. त्यांच्या या वक्तव्यावरुन वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. भाजपचे आमदार राम कदम यांनी याबाबत भाष्य केले आहे. अबू आझमी यांना इतिहास माहिती नाही. त्यांचे वक्तव्य चुकीचे आहे. उद्या ते सभागृहात येतील तेव्हा मी त्यांना इतिहासाचं पुस्तक देणार आहे, असे राम कदम यांनी म्हटले. औरंगजेबाने आमच्या छत्रपती संभाजी महाराजांना कशाप्रकारे कैदेत ठेवलं, त्यांचा कशाप्रकारे अनन्वित छळ केला, हे अबू आझमी यांना माहिती नाही का, असा सवाल राम कदम यांनी उपस्थित केला.
इतिहासकार इंद्रजीत सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करा; करनी सेनेची मागणी
करनी सेना अध्यक्ष अजय सिंग सेंगर यांच्याकडून खांदेश्वर पोलीस स्टेशनमध्ये इतिहास अभ्यासक आणि संशोधक इंद्रजित सावंत यांच्याविरोधात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. इतिहासकार इंद्रजीत सावंत हे ब्राह्मण आणि राजपूत यांच्याविरोधात युट्यूब चॅनल मध्ये चुकीची माहिती पसरवत असल्याचा आरोप सेंगर यांनी केला. ते वारंवार ब्राह्मण आणि राजपूत यांच्याविरोधात वक्तव्यं करतात. विदेशी लेखकांचा इतिहास वाचून इंद्रजीत सावंत बोलत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर समाजात दुही माजवली जात असल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी लेखी तक्रार करनी सेनेने पोलिसांत दिली आहे.
आणखी वाचा























