BLOG : विजयादशमी: आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचंय? रावणाच्या या दुर्गुणांपासून दूर रहा!
रामायण हे भारतातलं अत्यंत प्राचीन महाकाव्य म्हणून जगभर ओळखलं जातं. रामायणातलं रावणाचं पात्र त्याच्या बुद्धीमुळे, तसेच शक्ती आणि संपत्तीमुळे प्रसिद्ध आहे. अनेक गुण रावणाच्या ठायी होते, असं असूनही अहंकार आणि अति आत्मविश्वास या दोन गोष्टींमुळे रावणाचा अखेर पराभव झाला. सत्याचा असत्यावर विजय म्हणून रावणाच्या या पराभवाकडे पाहिलं जातं. रावणाकडे असलेली तल्लख बुद्धिमत्ता, ताकद आणि दिव्य शक्ती तर आपण मिळवू शकत नाही, परंतु रावणाच्या आयुष्यातून काही धडे मात्र नक्कीच शिकू शकतो. आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठीच्या आपल्या प्रवासात हे धडे उपयुक्त ठरतील असे आहेत. कोणत्याही आर्थिक दबावाला बळी न पडता आपण ठरवू त्याप्रमाणे आयुष्य जगण्याचं जे स्वातंत्र्य असतं, त्याला आपण आर्थिक स्वातंत्र्य असं म्हणतो. हे आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी रावणाच्या आयुष्यातून कोणते संदेश मिळतात, हे आपण जाणून घेणार आहोत…
1. अहंकार आणि अति आत्मविश्वास टाळा
रावण हा राक्षसांचा राजा होता. त्याच्याकडे प्रचंड संपत्ती आणि ताकद होती. परंतु अहंकार आणि अति आत्मविश्वास या दोन गोष्टींनी अखेरीस त्याचा घात केला. हे दोन्ही दुर्गुण आर्थिक नियोजन करताना तुमचाही घात करू शकतात. त्यामुळेच आर्थिक स्थैर्य हे कधीच शाश्वत नसतं, अचानक आलेलं एखादं संकट तुमच्या आर्थिक नियोजन ढासळण्यासाठी पुरेसं असतं हे समजून घ्या. त्यामुळे भविष्यातील कुठलीच शक्यता गृहीत न धरता आर्थिक नियोजन करा. पैशांचं नियोजन कसं करावं याचं ज्ञान आणि नवनवीन माहिती सतत घेत रहा. त्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचं मार्गदर्शन घ्या. या मार्गाने गेल्यास तुमच्या गुंतवणुकीवर बाजारातील चढउतारांचे परिणाम तुम्ही नियंत्रणात ठेवू शकाल.
2. तुमची संपत्ती डायव्हर्सिफाय करा
रावण प्रचंड श्रीमंत होता आणि त्यांची लंका सोन्याची होती असं म्हटलं जातं. आपल्याकडची सगळी संपत्ती एकाच ठिकाणी आणि एकाच स्वरूपात त्याने ठेवली होती. लंका हे रावणाच्या साम्राज्याचं केंद्र होतं. म्हणूनच रामाच्या सैन्याला त्या केंद्रावर हल्ला करून रावणाला पराभूत करणं सोपं झालं. म्हणूनच गुंतवणूक करताना तुमची सर्व संपत्ती एकाच ठिकाणी गुंतवणं जोखमीचं ठरतं. त्याऐवजी उपलब्ध असलेल्या अनेक पर्यायांमध्ये थोडी थोडी गुंतवणूक केल्यास रिस्क कमी होते. आर्थिक नियोजन करताना, गुंतवणूक करताना एकाच पर्यायावर अवलंबून न राहता अनेक ठिकाणी गुंतवणूक केल्यास ते फायद्याचं ठरतं.
3. क्षमतेपेक्षा जास्त कर्ज घेऊ नका
जास्तीत जास्त संपत्ती आपल्याकडे असायला हवी या लोभापायी रावणाने राक्षसकुळाचे स्वामी शुक्राचार्य यांच्याकडून अनेक वेळा कर्ज घेतलं. शुक्राचार्यांच्या ऋणात अडकल्यामुळे त्याचे हात दगडाखाली होते. शुक्राचार्यांच्या मर्जीप्रमाणे त्याला निर्णय घ्यावे लागत असत. आपल्या क्षमतेच्या बाहेर घेतलेलं कर्ज आपलं आर्थिक स्वातंत्र्यच हिरावून घेतं. रावणाच्या बाबतीत हेच झालं. आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचं आणि टिकवायचं असेल तर तुमचं कर्ज आटोक्यात ठेवा. तुमची परतफेड करण्याची क्षमता विचारात घेऊन कर्ज घ्या आणि त्याची नियोजित वेळेत परतफेड करा. जितक्या लवकर तुम्ही कर्जातून मुक्त व्हाल तितक्या लवकर तुम्ही तुमचं उत्पन्न चांगल्या ठिकाणी गुंतवू शकाल आणि त्यातून परतावा मिळवू शकाल.
4. हुशारीने बचत आणि गुंतवणूक करा
रावणाकडे प्रचंड संपत्ती होती, परंतु त्याने आपल्या संपत्तीचं नीट नियोजन केलं नाही. आपल्या इच्छांवर अमाप संपत्ती खर्च केल्यामुळे राज्य संकटात असताना त्याच्याकडे संपत्ती उरली नाही. वैयक्तिक आर्थिक नियोजन करताना आपल्या संपत्तीचं नियोजन हुशारीने करण्याची गरज असते. आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी बचत आणि गुंतवणूक करण्याची सवय लावून घ्या. तुमच्या नियमित उत्पन्नातून काही ठरावीक भाग बचत करता यावा यासाठी तुमचं मासिक बजेट तयार करा. गुंतवणुकीचे दीर्घकालीन आणि सुरक्षित पर्याय निवडून ती रक्कम गुंतवा. स्टॉक, म्युच्युअल फंड, बॉण्ड्स, सॉवरेन गोल्ड बांड असे अनेक दीर्घकालीन पर्याय आज बाजारात उपलब्ध आहेत. अशा पर्यायांमध्ये शिस्तीने गुंतवणूक केल्यास आर्थिक स्वातंत्र्य मिळवणं सोपं होईल.
5. अतिरेकी लोभ टाळा
रावणाला सत्ता आणि संपत्तीचा अवाजवी मोह होता, त्या मोहापायी त्याने अनेक चुकीचे निर्णय घेतले आणि त्यातून रावणाचा घात झाला. संपत्तीच्या लोभाने अंध झालेल्या रावणाला आयुष्यात नक्की कशाला महत्व द्यायचं हेच कळलं नाही.वैयक्तिक आर्थिक नियोजन करताना असा अतिरेकी लोभ जोखमीचा ठरू शकतो. त्यातून अनेक चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतात. जास्त कर्ज घेणं, जास्त रिस्क असलेल्या ठिकाणी माहिती न घेता गुंतवणूक करणं, भविष्याचा काहीही विचार न करता खर्च करणं, अशा अनेक गोष्टी होऊ शकतात. आर्थिक स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी हुशारीने आणि शिस्तीने निर्णय घेणं आवश्यक असतं. त्यामुळे तुमच्याकडे किती पैसा आहे, त्याची बचत आणि गुंतवणूक कशी करायची हा विचार करा. आर्थिक निर्णय घेताना कोणत्याही भावनिक दबावाला बळी पडू नका.
6. दीर्घकालीन नियोजन करा
आपल्या संपत्तीचा वापर करून तेवढ्यापुरतं समाधान मिळवणं ही रावणाची वृत्ती होती. भविष्याचा दूरदृष्टीने विचार करण्यात तो अपयशी ठरला आणि म्हणूनच त्याला पराभवाचा सामना करावा लागला. म्हणूनच आर्थिक नियोजन करताना दीर्घकालीन विचार करणं अत्यंत आवश्यक आहे.आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर तुमचं दिर्घकालील ध्येय ठरवा. घर विकत घेताना, मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करताना, निवृत्तीच्या दृष्टीने बचत करताना हा दीर्घकालीन दृष्टिकोन अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे बाजारात सतत होत पाहणाऱ्या चढउतरांना भुलून न जाता तुम्हाला दीर्घ काळाने चांगला परतावा मिळवून देऊ शकतील अशा पर्यायांमध्ये गुंतवणूक करा.
7. तुमचे असेट्स सुरक्षित ठेवा
रावण सर्वज्ञानी होता. प्रचंड ज्ञान आणि बुद्धीचा संचय त्याच्या ठायी होता, परंतु बाहेरून येणाऱ्या आक्रमणापासून आपल्या संपत्तीचं रक्षण करण्यात तो अयशस्वी ठरला. आर्थिक नियोजन करताना बाजारातील जोखमींपासून आपल्या असेट्सचं रक्षण करणं अत्यंत गरजेचं असतं. आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने वाटचाल करताना तुमचे असेट्स सुरक्षित ठेवण्यासाठी विम्याचा आधार घ्या. स्वतःचा टर्म आणि कुटुंबाचा हेल्थ इन्शुरन्स, Critical illness, अपंगत्व विमा, आणि प्रॉपर्टी इन्शुरन्स असे विम्याचे अनेक पर्याय आज उपलब्ध आहेत. प्रत्येक महत्वाच्या गोष्टीला विम्याचं कवच असेल तर भविष्यात अचानक येणाऱ्या अपघात, नैसर्गिक आपत्ती अशा अनेक वित्तीय संकटांचा सामना तुम्ही आत्मविश्वासाने करू शकाल.
8. सामाजिक जबाबदारी ओळखा
अहंकार आणि अतिरेकी लोभ या दोन दुर्गुणांमुळे रावणाने अनेकांना धोका पोहोचवला. त्यांची संपत्ती हिरावून घेतली. त्यामुळे त्याचा सर्वनाश ठरलेला होता. आर्थिक नियोजन करताना आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो याची जाण ठेवून गरजूंना मदत करण्याची वृत्ती जोपासा. वैयक्तिक आर्थिक नियोजन करताना काही रक्कम समाजोपयोगी कामांसाठी दान म्हणून बाजूला ठेवा. तुम्हाला जी गोष्ट महत्वाची वाटते त्यासाठी तुमच्या क्षमतेप्रमाणे हातभार लावा. त्यातून तुमच्या आर्थिक स्वातंत्र्याच्या प्रवासाला, आणि एकूणातच तुमच्या जीवनाला अर्थ प्राप्त होईल.
अहंकार, अतिरेकी लोभ, अति आत्मविश्वास आणि नियोजनशून्य वृत्ती आपल्याला सर्वनाशाकडे घेऊन जाते हे रामायणातील रावणाच्या आयुष्यातून मिळालेला बोध आहे. त्याच्या चुकांतून धडा शिकून त्या गोष्टी आपलं वैयक्तिक आर्थिक नियोजन करताना विचारात घेतल्यास आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करणं शक्य होईल. तुमचे अस्टेट्स डायव्हर्सिफाय करा, अति आत्मविश्वास टाळा, दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून बचत आणि गुंतवणूक करा आणि समाजाप्रती असलेल्या तुमच्या जबाबदारीची जाण ठेवून वाटचाल करा. ही तत्वे तुमचा आर्थिक पाया भक्कम करण्यासाठी आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतील यात शंका नाही.
किरांग गांधी यांचे अन्य ब्लॉग:
BLOG : भारतीय स्टॉक मार्केटमधला विरोधाभास: दीर्घकाळ चालत आलेलं रिस्क परसेप्शन
BLOG : वाढत्या महागाईमुळे तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग कोलमडू शकतं!