एक्स्प्लोर
Advertisement
India vs New Zealand: मरगळ झटका, जोशात खेळा
India vs New Zealand: एकीकडे राज्यासह देशात दिवाळीचा उत्साह शिगेला पोहोचतोय. त्यात क्रिकेटच्या मैदानातही उद्यापासून फटाके फुटणार आहेत. ठिकाण आहे मुंबईचं वानखेडे स्टेडियम. मैदान कसोटी सामन्याचं आहे. मालिकेत भारताची ०-२ पिछाडी आहे. असं असलं तरीही रोहितसेना या सामन्यात सकारात्मक क्रिकेट खेळेल, अशी अपेक्षा क्रिकेटरसिक करतायत. तब्बल १२ वर्षांनी आपल्याच भूमीवर कसोटी मालिका गमावण्याचा नकोसा विक्रम गेल्याच सामन्यात आपल्या नावावर लागलाय. तो घाव नक्की जिव्हारी लागला असेल. नव्हे लागायलाच हवा. त्यात भारतीय फलंदाजांची हाराकिरी संघाला फटका देणारी ठरलीय. यासाठी हीआकडेवारी पुरेशी बोलकी आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधील चार डावांमधील भारताची धावसंख्या पाहा, बंगळुरु - ४६ आणि ४६२, पुणे - १५६ आणि २४५... यातील बंगळुरुच्या दुसऱ्या डावातील अपवाद वगळता भारतीय फलंदाज आपल्या लौकिकाला अजिबात जागले नाहीत.
भारतीय खेळपट्ट्यांवर सातत्याने कोसळण्याची उदाहरणं अलिकडे वाढलीत. खास करुन कसोटी मालिकेत. अगदी बांगलादेशसारख्या तुलनेने कमी अनुभवी असलेल्या कसोटी संघाविरुद्धही एका सामन्यात आपण सहा बाद १४४ अशा अडचणीत आलो होतो. अश्विन आणि जडेजाने आपल्याला सावरलं आणि आपण त्या खिंडीतून बाहेर आलो. इथे समोर किवी होते. अधिक अनुभवी, अधिक तिखट मारा करणारे आणि अधिक दक्ष क्षेत्ररक्षण करणारे. त्यात पहिल्या सामन्यात पावसानंतरच्या पिचवर टॉस जिंकून आपण फलंदाजी घेतली आणि निर्णय आपल्यावर उलटला. आपण ४६ वरच ऑलआऊट झालो. फक्त ३१.२ षटकांत आपण पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळलो. त्याच खेळपट्टीवर पहिल्या डावात किवींनी ९१.३ षटकं फलंदाजी केली आणि ४०० पार स्कोअर केला. दुसऱ्या कसोटीत भारताने पहिल्या डावात ४५.३ षटकं तर, दुसऱ्या डावात ६०.२ षटकं टिकाव धरला.
दुसऱ्या कसोटीत टॉस हरल्यावरही आपण किवींना २५९ वरच रोखलेलं. त्याच वेळी भारताला किमान दीडशेची आघाडी घेऊन मालिकेवर ग्रिप मिळवण्याचा चान्स होता . खेळपट्टीवर बाऊन्स होता, टर्नही होता. तिसऱ्या, चौथ्या दिवशी ती आणखी गिरकी घेणार हे नक्की होतं. तेव्हा पहिल्याच डावात भारताने गियर टाकून धावांची फेरारी सोडणं गरजेचं होतं. एक बाद ५० अशा स्थितीत आपण पोहोचलो. तेव्हा वाटलं आपली गाडी एक्स्प्रेस हायवेला लागली. पण, न्यूझीलंडने आपल्या बॅटिंगला ब्रेक लावला. हायवेवरुन आपण १५६ लाच पार्किंगमध्ये गेलो. तिथे मॅचवरचा एक हात सुटला. मग १०३ ची पिछाडी घेऊन दुसऱ्या डावात त्यांना कमी धावात गुंडाळणं हे आपल्या हातात होतं. तेही आपल्याला करता आलं नाही. खास करुन आपल्या फिरकीची धार बोथट करण्यासाठी किवींनी स्वीप, रिव्हर्स स्वीपचे फटके या सामन्यात कौशल्याने वापरले. तिथे आपल्या स्पिनर्सना त्यांनी सेटल होऊ दिलं नाही. याउलट आपण जैस्वाल-गिलची भागीदारी वगळता प्रचंड प्रेशर घेऊन बॅटिंग केली. त्यातच सँटनरच्या चेंडूची दिशा आणि टप्पा अप्रतिम होता. त्याला उंचीमुळे मिळणारा बाऊन्सही आपल्याला त्रासदायक ठरला.
एखाद्या स्पिनरने आपल्याच मैदानात येऊन आपली दाणादाण उडवल्याचं उदाहरण विरळच म्हणावं लागेलं. मालिका आपण आधीच गमावलीय. वानखेडेच्या मॅचमध्ये ही निराशा झटकून टाकत ३-० टाळायचं असेल तर फलंदाजांना मोठा स्कोअर करावाच लागेल. खास करुन सामन्यातल्या पहिल्या डावातली धावसंख्या निकालाची दिशा सेट करु शकते. समोरच्या २० विकेट्स काढताना आक्रमक क्षेत्रव्यूह हवा असेल तर, तुम्हाला मोठ्या स्कोअरची संरक्षक जाळी लागते. नाहीतर आपणच जाळ्यात अडकतो. या मालिकेत आतापर्यंत नेमकं हेच झालं. आता फलंदाजांना मरगळ झटकून नव्या उमेदीने सज्ज व्हावं लागेल. कारण, पुढचं मिशन ऑस्ट्रेलिया आहे. तिथे असा निगेटिव्ह माईंडसेट घेऊन जाणं आपल्याला परवडणारं नाही. रोहित शर्मालाही ही बाब पक्की ठाऊक आहे. टी-ट्वेन्टी वर्ल्डकपच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये त्याने स्टार्क, कमिन्स आणि कंपनीवर जो हल्लाबोल केला होता, त्या तिखट अॅप्रोचची गरज वाटतेय. अर्थात मैदान कसोटीचं असलं तरी हा माईंड गेम आहे. या माईंड गेममध्ये आपल्याला किवींपेक्षा सरस ठरण्यासाठी तडफेने आणि आक्रमक बाण्यानेच उतरावं लागेल. तेव्हा हल्लाबोल करुनच दिवाळीत विजयाचा फटाका वाजवण्यासाठी रोहित शर्माच्या भारतीय टीमला ऑल द बेस्ट म्हणूया.
संबंधित बातमी:
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
नाशिक
निवडणूक
Advertisement