मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणी आज मुंबई न्यायायलयात सुनावणी पार पडली, त्यामध्ये चेतन पाटीलला दिलासा देत न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे
मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. अखेर मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटनाप्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या जयदीप आपटे आणि चेतन पाटील यांना अटक करण्यात आली होती. त्यातच, दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी मालवणच्या दिवाणी न्यायालयात आरोपींना हजर केले असता, न्यायालयाने जामीन फेटाळला होता. मात्र, चेतन पाटील यास मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. सिंधुदुर्गमधील (Sindhudurg) मालवण परिसरातील राजकोट किल्ल्यावर असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा (Shivaji Maharaj) पुतळा कोसळला. या प्रकरणानंतर मुख्य आरोपी असलेला जयदीप आपटे आणि चेतन पाटील यांना अटक करण्यात आली होती. मात्र, चेतन पाटील यास जामीन मंजूर झाला असून जयदीप आपटे अद्यापही तुरुंगातच आहे.
मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणी आज मुंबई न्यायायलयात सुनावणी पार पडली, त्यामध्ये चेतन पाटीलला दिलासा देत न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 25 हजाराच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ऑगस्टमध्ये कोसळल्याप्रकरणी सल्लागार असलेल्या चेतन पाटीलला अटक करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदल दिनी अनावरण केल्याच्या जवळपास नऊ महिन्यांनंतर 26 ऑगस्ट रोजी प्रतिष्ठित मराठा योद्धा राजाचा 35 फुटांचा पुतळा सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोसळला होता. त्यानंतर, चेतन पाटील याला 30 ऑगस्ट रोजी कोल्हापुरातून अटक करण्यात आली होती. पुतळ्याचा स्ट्रक्चरल डिझायनर म्हणून नियुक्ती न केल्यामुळे पाटील यांना या प्रकरणात गोवण्यात आलेले नाही, असे न्यायमूर्ती ए.एस. किल्लोर यांच्या एकल खंडपीठाने गुरुवारी सांगितले. याप्रकरणी, पाटील यांनी केवळ पुतळ्याच्या पायाचा स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी अहवाल सादर केला होता. दरम्यान, जयदीप आपटेनं हा पुतळा बनवला होता, तर स्ट्रक्चरल डिझायनरसाठी चेतन पाटील यांची नियुक्ती केल्याचं सांगण्यात येत होतं.
दरम्यान, शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर मोठं राजाकारणही पाहायला मिळालं होतं. विरोधकांनी या मुद्दयावरुन सरकारला धारेवर धरलं, पहिल्यापेक्षा मोठा आणि उत्कृष्ट दर्जाचा पुतळा उभारू, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही तो मुद्दा चांगलाच गाजला होता. महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी या मुद्द्यावरुन सत्ताधाऱ्यांना लक्ष केलं. तर, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही या मुद्द्यावरुन महायुतीवर टीका केली होती.
हेही वाचा
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर