BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपने बुथ लेव्हलवरुन माहिती गोळा केली होती, या एक्झिट पोलनुसार विधानसभा निवडणुकीत महायुतीला 164 जागा तर महाविकास आघाडीला अवघ्या 100 जागा मिळण्याची शक्यता आहे.
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांचे एक्झिट पोल समोर आले असून बहुतांश संस्थांच्या या सर्वेक्षणात भाजप महायुतीचीच सत्ता येईल, असा अंदाज आहे. विशेष म्हणजे या सर्वेक्षणातून भाजप (BJP) सर्वात मोठा पक्ष राहिल, असेही दिसून येते. त्यामुळे, भाजप नेत्यांचा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. मात्र, एक्झिट पोलबाबत (Exit Poll) आमच्या पक्षाचे प्रवक्ते बोलतात, नेते नाहीत, असे म्हणत फडणवीसांनी एक्झिट पोलच्या अनुषंगाने भाष्य करण्याचे टाळले. तरीही, मी 25 ते 30 मतदारसंघात फोनवरुन संपर्क साधत आढावा घेतला असता लाडकी बहीण योजनेमुळे मतदानाचा टक्का वाढला असून याचा फायदा भाजप महायुतीला होईल, असे त्यांनी म्हटले. त्यातच, भाजपनेही बुथ लेव्हलवरुन सर्वेक्षण केलं असून त्यातही भाजप महायुतील स्पष्ट बहुमत मिळत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भाजपच्या बुथ लेव्हल सर्वेक्षणातून महाविकास आघाडीला केवळ 100 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर, अपक्ष आणि इतर पक्षांना मिळून 24 जागा मिळू शकतात. त्यामुळे, इतरांचीही भूमिका निवडणूक निकालानंतर महत्त्वाची ठरणार आहे.
भाजपने बुथ लेव्हलवरुन माहिती घेतलेल्या सर्वेक्षणात भाजप हा सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष राहिल, असा अंदाज आहे. तर, या सर्वेक्षणातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सर्वात कमी 22 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भाजपने बुथ लेव्हलवरुन माहिती गोळा केली होती, या एक्झिट पोलनुसार विधानसभा निवडणुकीत महायुतीला 164 जागा तर महाविकास आघाडीला अवघ्या 100 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर अपक्ष व इतर उमेदवारांना 24 जागांवर विजय मिळेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. भाजपच्या या बुथ लेव्हल एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, महायुतीमध्ये भाजपला 100, शिंदे गटाला 42 आणि अजितदादा गटाला 22 जागांवर विजय मिळेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीत काँग्रेसला 40, शरद पवार गटाला 35 आणि उद्धव ठाकरे गटाला 25 जागा मिळण्याची शक्यता आहे. परंतु, प्रत्यक्षात निकाल काय लागणार, याचा निर्णय 23 नोव्हेंबर रोजीच होणार आहे.
मतदानाची टक्केवारी वाढली, 65.10 टक्के मतदान
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढल्याचे दिसून आले, गेल्या 30 वर्षातील निवडणुकांचा आढावा घेतल्यास यंदा सर्वाधिक मतदान झाल्याची माहिती आहे. सन 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत राज्यात तब्बल 61.13 टक्के मतदान झाले होते. मात्र, यंदा राज्यात संध्याकाळी सहा वाजेपर्यंत 65 टक्क्यांच्या आसपास मतदान झाले. अंतिम आकडेवारीनुसार मतदानाची ही टक्केवारी 65.10 टक्क्यांपर्यंत गेल्याचे समजते. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये 70 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले आहे. मुंबईत सर्वाधिक कमी म्हणजे 52.07 टक्के मतदान झाले. त्यामुळे या वाढलेल्या मतदानाचा फायदा आणि तोटा कोणाला होणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?