BLOG : रंग चाळीतल्या दिवाळीचे...
फटाक्यांची आतषबाजी, दिव्यांची माळ, फराळावर ताव... सध्या सगळीकडे असं वातावरण पाहायला मिळतंय. त्याच वेळी आम्ही गिरगावकर आमच्या श्याम सदन चाळीतून बाहेर पडल्यानंतरची दुसरी दिवाळी साजरी करतोय, जी आमच्या मूळ वास्तुत नाहीये. आमच्या वास्तुचा पुनर्विकास प्रकल्प सुरु असल्याने आम्ही सर्वच चाळकरी विखुरले गेलोय. माझी खात्री आहे, माझ्यासारखीच आज सगळ्यांनाच त्या चाळीतल्या दिवाळीची आठवण येत असणार.
चाळ असा नुसता शब्द जरी उच्चारला तरी मेमरीच नव्हे तर मनही रीफ्रेश होतं. त्यात चाळीतली दिवाळी असं म्हटल्यावर ते वातावरणच एकदम मनाच्या भिंतीवर उमटू लागतं. ते दारातल्या गॅलरीत उंच टांगलेले कंदील, दरवाज्याच्या कमानीला लगडलेल्या लाईट्सच्या माळा, दारादारातल्या मनमोहक रांगोळ्या. एकेक दृश्य जसंच्या तसं समोर आलं. त्याच वेळी घराघरातून दरवळणारा चकली, चिवड्याचा सुगंध, हाही मनाच्या कुपीतून बाहेर आला. आमच्या प्रत्येक मजल्यावर जवळपास 22 च्या आसपास रुम्स होत्या.
चाळीची रचना अशी की, पुढे आणि मागे गॅलरी. चाळीला दोन्ही बाजूंनी जिने. त्या दोन जिन्यांच्या मधोमध भली मोठी गॅलरी. शिवाय आमचा दुसरा मजला वगळून काही मजल्यांना बोळ देखील होते. त्या बोळातून रोडसाईडच्या जागांसाठीच्या गॅलऱ्या. या सगळ्या कानाकोपऱ्यात त्या दिव्यांनी प्रकाश पसरलेला असे. अनेक ठिकाणी रांगोळ्यांचे रंग.
काही ठिकाणी घराघरातले कसलेले कलाकार रांगोळी काढत, तर काही ठिकाणी अगदी लहान मुलंही रंग घेऊन बसत. जमिनीवर त्यांच्या त्यांच्या कुवतीनुसार, रांगोळी रेखाटण्याचा कार्यक्रम होत असे. मग गेरु सारवलेली गॅलरीतली जमीन, नंतर रांगोळी, मग रंगांनी माखलेले हात, जणू दुसरी धुळवडच. माझी आईही रांगोळी काढण्यात तरबेज. दिवाळीच्या वाढीव कामांसह घरातली सर्व कामं आटोपून रांगोळीसाठी एकाग्र होऊन तासन तास बसून रांगोळी काढणाऱ्या माझ्या आईसह तमाम महिला वर्गाला खरंच सलाम आहे. रांगोळी काढताना आणि ती पूर्ण झाल्यावर पाहून समोरच्याने दिलेली कॉम्प्लिमेंट ऐकताना त्यांच्या चेहऱ्यावरचा समाधानाचा रंग त्या रांगोळीपेक्षाही खुललेला असे. रांगोळीच्या दोन्ही बाजूने मातीची पणती. त्यात मंद तेवणारी ज्योत त्या रांगोळीचं सौंदर्य खुलवत असे. जणू त्यात प्रकाशाचा निराळा रंगच ही ज्योत ओतायची. निमुळत्या गॅलरीमधून येजा करणारी मंडळीही रांगोळीला धक्का लागणार नाही, याची दक्षता घेत. प्रत्येक मजल्यावर 22 च्या आसपास घरं असल्याने मजल्याच्या या टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत सर्वांच्याच रांगोळ्या पाहून येणं, ही वेगळीच मजा असायची. त्या काळी मोबाईल नव्हते, कालांतराने ते आले, मग रांगोळ्यांचे फोटो निघू लागले. रांगोळीच्या ठिपक्यांचा कागद, रांगोळ्यांची पुस्तकं, कालांतराने नेटवरुन घेतलेल्या किंवा मोबाईलवर फॉरवर्ड झालेल्या चित्रांच्या रांगोळ्या असा रांगोळ्यांचा प्रवास राहिलाय. काहींच्या पाटावरच्या तर काहींच्या गेरुने सारवलेल्या जमिनीवरच्या रांगोळ्या. तितक्याच सुबक. दुसऱ्या दिवशी नवीन रांगोळी काढायला घेताना आधीची रांगोळी पुसायची वेळ जेव्हा येत असेल तेव्हा मनाला किती वेदना होत असतील हाही विचार माझ्या मनाला स्पर्शून जातो.
आधी कागदी कंदील, मधल्या काळात प्लॅस्टिकचे कंदील आणि मग कापडी कंदील, असा कंदिलांचाही प्रवास आपण पाहिलाय. अगदी अलीकडे पुठ्ठ्याचे फोल्डेबल कंदीलही पाहायला मिळतात. ते कंदील लावण्याचा पण एक सोहळा असे. म्हणजे कंदील टांगायचा छोटा हूक, जो फक्त त्या कंदिलासाठीच वापरला जाई. त्यामुळे त्या हूकवरची धूळ झटकावी लागे. मग तो कंदील टांगताना वायर त्यात नीट अटॅच करणे. ती नीट बांधून ठेवणे. जेणेकरुन वारा किंवा अवचित येणाऱ्या पावसाने त्याला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी लागत असे. त्याशिवाय दरवाज्यावर जे दिव्यांचं तोरण असायचं, त्याच्या वर आणखी एक प्रकाशमान करणारा दिवा असे. त्या तिघांचीही वायर एकाच थ्री पिन सॉकेटमध्ये नीट लावणं. ही कसरत करावी लागत असे.
कॉमन पॅसेजमध्ये फुटणारे फटाके, चाळीच्या मोठ्या चौकात फुटणारे फटाके. हेही सारं लख्खं आठवतंय. चाळीत फराळाच्या ताटांची होणारी देवाणघेवाण हाही एक रुचकर कार्यक्रम असे. कुणाकडची चकली बेस्ट तर, कुणाकडच्या लाडवांची गोडी, कुणाचा चिवडा भारी, तर कुणाची शेव. घराघरात जाऊन दिवाळी शुभेच्छा देत ज्येष्ठांना नमस्कार करुन त्यांचा आशीर्वाद घ्यायचो. आज त्यातील काही मंडळी हयात नाहीत. तरीही त्यांचा आशीर्वादाचा पाठीवरुन फिरलेला हात अशा क्षणांवेळी अस्तित्त्व दाखवून देतो.
अगदी लहान वयात तर दिवाळीसाठीची नवीन कपडे खरेदी शेजारच्या घरांमध्ये दाखवायला जाण्याचा आनंदही परमोच्च असायचा. अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी तृप्ततेची पावती देऊन जात. आज चाळीबाहेरच्या दुसऱ्या दिवाळीच्या निमित्ताने असे अनेक क्षण पुन्हा एकदा मनामध्ये बोलू लागले. आज गिरगावच्या अनेक चाळी किंवा इमारतींचा पुनर्विकास सुरु आहे, तेव्हा आपल्या मूळ वास्तुमधून बाहेर पडून दुसऱ्या ठिकाणी राहणाऱ्या माझ्यासारख्या अनेक मंडळींच्या मनात असंच आठवणींचं तोरण लागलं असणार. ज्यामध्ये दिवाळीतला क्षणन् क्षण त्यांनी वेचून बांधून ठेवला असेल. आपण एरवी लावत असलेल्या पाना-फुलांचं तोरण कोमेजत असेलही. पण, या आठवणींच्या तोरणाचा ताजेपणा, टवटवीतपणा कायम राहणार. ज्यावर आपलेपणा, प्रेम, ओलाव्याचं सिंचन करुन तो आम्ही जपणार आणि पुढच्या पिढीकडे देणार.
- अश्विन बापट