BLOG | हाती तिफणीची 'कास', मनी प्रसिद्धीची 'आस'...
गेल्या काही वर्षांत माध्यमं सर्वार्थानं ताकदवान झालीत. ती कुणाला तरी 'सेट' करण्यासाठी लागणाऱ्या 'इमेज मेकींग'साठी सर्वात मोठं शस्त्रं झालीत. वृत्तपत्रानंतर इलेक्ट्रॉनिक मीडियानं माध्यमांचं सारं आकाश आणि क्षितीजं व्यापलीत. अन 'सोशल मीडिया'नं तर जगण्याबरोबरच माध्यम क्षेत्रातले सारे संदर्भच बदलवून टाकलेत.
सध्या कोरोनाच्या संकटामुळं जणू सारं जगच थांबलं की काय?, अशी परिस्थिती सर्वच ठिकाणी पहायला मिळते आहे. माणसाचं जीवनचक्र थांबून ते फिरायला लागलं फक्त 'कोरोना' या तीन अक्षरी शब्दांच्याभोवती. हे चक्रव्यूह भेदतांना भल्याभल्यांच्या तोंडाला फेस येतो आहे. मोठेपणा, मिजाशी, मस्ती, सत्तेचा दर्प उरवायला कोरोनाचं संकट सर्वांवरच भारी ठरलं आहे. या सर्व परिस्थितीशी लढतो आहे, दोन हात करतो आहे तो फक्त शेतकरी. जगात सर्वात आधी कोरोना संकटातून बाहेर निघत हे 'चक्रव्यूह' भेदण्याचा प्रयत्न कुणी केला असेल तर तो आहे फक्त आपला 'शेतकरी'... आपला 'अन्नदाता'... आपला 'बळीराजा'.
राज्यात गेल्या आठवडाभरात चांगला पाऊस झाला आहे. अडचणी आणि आव्हानं ही शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेली आहेत. तरीही तो थांबत नाही. तो शेतीसोबतच आयुष्यातील दु:खांचीही 'मशागत' करतो. कारण, पिकांसारखंच आपल्यासह समाजाचं, देशाचं आयुष्यही 'आबादानी' व्हावं, एव्हढंच त्याची अपेक्षा अन ध्येय्य असतं. कोरोना, खत-बियाण्यांचा तुटवडा, पिक कर्जासाठी वणवण फिरवणाऱ्या बँका अशा सर्व परिस्थितीतही तो शेतीची पेरणी करतो आहे, स्वत:चं संपुर्ण आयुष्यच पणाला लावत. कारण, पेरणी त्याच्या आयुष्यातील त्या वर्षातील 'वार्षिक' परिक्षा असते. हीच पेरणी त्याच्या जगण्याचा, जीवन-मरणाचाही प्रश्न असते. यावर्षीही अनेक संकटांना पार करीत, आव्हानं परतवून लावत देशातील, राज्यातील शेतकरी पेरणीला सज्ज झाला आहे, धान्याच्या नव्या सुगीसाठी...
मात्र, गेल्या काही वर्षांत माध्यमं सर्वार्थानं ताकदवान झालीत. ती कुणाला तरी 'सेट' करण्यासाठी लागणाऱ्या 'इमेज मेकींग'साठी सर्वात मोठं शस्त्रं झालीत. वृत्तपत्रानंतर इलेक्ट्रॉनिक मीडियानं माध्यमांचं सारं आकाश आणि क्षितीजं व्यापलीत. अन 'सोशल मीडिया'नं तर जगण्याबरोबरच माध्यम क्षेत्रातले सारे संदर्भच बदलवून टाकलेत.
सध्या राज्यात पेरणीचा हंगाम सुरू आहे. या पेरणीचा 'इव्हेंट' झाल्याचे तीन प्रसंग मागच्या दोन दिवसांत विदर्भात पहायला मिळालेत. पुढच्या काही दिवसांत हा 'इव्हेंट' राज्याच्या इतर भागातही पहायला मिळू शकतो. हा 'इव्हेंट' आहे नेत्यांनी पेरणी करण्याच्या त्यांच्या 'कथित' शेतकरी कळवळ्याचा. 'होऊ दे व्हायरल' म्हणत या नेत्यांनी आपली शेतकरी-शेतमजूर होण्याची हौस 'फोटोसेशन-व्हिडीओसेश'नपुरती भागवली. अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू, अमरावतीच्या खासदार नवनीतकौर राणा आणि बुलडाणा जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तूपकर यांच्या पेरणीच्या फोटो-व्हिडीओंची सध्या समाज माध्यमांवर चांगलीच चर्चा आहे. राजकीय नेतेही एका वेगळ्या अर्थानं 'शेतकरी' असतात. कारण, संपुर्ण पाच वर्ष त्यांची लोकांमध्ये मतांसाठी 'मशागत' सुरू असते. याच मशागतीतून ते 'सत्तेचं पिक' घेतात. यातूनच विविध लाभ, पदं, प्रतिष्ठा, पैसा यातून त्यांच्या या मेहनतीची 'कर्जमाफी' होत असते. या तिन्ही पेरण्यांचा आढावा घेतला तर त्यातलं सामाईक सुत्र एकच आहे, ते आहे 'प्रसिद्धी'चं... 'इमेज बिल्डींग'चं
प्रसंग एक :
वेळ... 15 जूनच्या दुपारी....अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालूक्यातलं प्रकाश साबळे यांचं शेत... शेतात तुरीची पेरणी सुरू होती. तितक्यात रस्त्यानं जाणाऱ्या गाड्यांचा ताफा शेताच्या बांधासमोर थांबला. मुख्य गाडीतून कुणी उतरण्याआधीच कॅमेरे आणि मोबाईलवाल्यांची झुंबड पेरणी करणाऱ्या लोकांकडे लगबगीने आली. तितक्यात गाडीतून एक महिला उतरली. तोपर्यंत शेतकरी आणि पेरणी करणाऱ्यांनी त्यांना ओळखलं होतं. त्या होत्या अमरावतीच्या खासदार नवनीतकौर राणा. खासदार शेतात आल्यानं त्यांना आश्चर्य अन आनंदही झाला. लगेच नवनीत कौर यांची बियाण्यांसाठी ओटी बांधायची लगबग सुरू झाली. ओटी बांधून झाली. खासदार नवनीत कौर यांनी पेरणीचं 'सरतं' धरलं. इकडे फोटो अन शूटवाले वेगवेगळे 'अँगल' घेत होते. पाऊणतास हे सारं सुरू होतं. सारं 'शूट' अन 'फोटो' झाल्यामुळं 'शुटींग-फोटो'वाले शांत झाले. तोपर्यंत आपला 'इव्हेंट' संपल्याचं नेत्यांच्या लक्षात आलं. पाऊण तासात पेरणी करून नेते दमलेत. सर्व 'बरोबर' झाल्याची खातरजमा करीत ताफा पुढील प्रवासासाठी निघून गेला. ताफा येणं अन ताफा जाणं अन मधला 'इव्हेंट' हे सारं घडलं फक्त पाऊण तासात. पुढे याच 'इव्हेंट'च्या बातम्या झाल्यात. मागच्या वर्षीही राणा दांपत्यांनं अशीच पेरणी केली होती.प्रसंग दुसरा :
तारीख 16 जून.... अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांचा ताफा मुर्तिजापूर तालूक्यातील राजनापूर खिनखिनी या दत्तक गावातील बैठकीसाठी धुरळा उडवत निघाला. ताफा शेतासमोरून जात असतांना शेतात सोयाबीन पेरणी करणारा शेतकरी प्रशांत साबळे औत्सुक्यानं मंत्र्यांच्या या भल्यामोठ्या ताफ्याकडे तिफण थांबवून पहात होता. तितक्यात ताफ्यातली मोठी गाडी शेतासमोर थांबली अन लागोपाठ मागच्याही गाड्या थांबल्यात. गाडीतून उतरत पालकमंत्री बच्चू कडू म्हणालेत, 'मले या शेतात पेराचं हाय. मी तिफण हाणतो जरासक'... साक्षात पालकमंत्री तिफणीवर आल्याचं पाहून शेतकरी प्रशांत यांना आनंद झाला. पण तिफणीसोबत बाकीची गर्दी पाहून बैलं काहीसे बुजाडल्यासारखे झालेत. बैलांना शुटींगवाले पुढं असल्यानं 'तास' काढणंही कठीण झालं. अवघ्या दहा मिनिटात बच्चूभाऊंची पेरणी आटोपली. भाऊंचे कार्यकर्ते, काही अधिकाऱ्यांनी फोटो-व्हिडीओ 'व्हायरल' केलेत. अन लगेच 'ब्रेकींग' फिरू लागल्यात...'बच्चू कडू यांनी चालवली तिफण'...
प्रसंग तिसरा :
बुलडाणा जिल्ह्यातील डोंगरखंडाळ्याचं भास्कर सावळे यांचं शेत. दुपारी एक गाडी आली. गाडीतून उतरलेला चेहरा या शेतकऱ्याच्या चांगल्याच ओळखीचा. कारण, शेतकऱ्यांच्या आंदोलनामूळं बुलडाणा जिल्ह्यासह महाराष्ट्र रविकांत तूपकरांना ओळखतो. रविकांत तूपकरांनी भास्कर यांना तिफणीचा कासरा हाती मागितला अन थेट 'तास' काढायला सुरूवात केली. तिफण हाकतांना बियाणं कसं, कुठून घेतलं याची चर्चाही झाली. समोरून दोघा-तिघांचे मोबाईल रविकांतभाऊंना मोबाईलमध्ये साठवून घेत होते. अर्ध्या तासानंतर शेतकरी आणि पेरणी करणाऱ्या मजुरांच्या जेवणाची वेळ झाली. सर्वांनी रविभाऊंना सोबत जेवण्यासाठी आग्रह केला. रविभाऊंनीही मस्त झाडाखाली वनभोजनाचा आनंद घेतला. जेवण झालं अन ताफा पुढे निघून गेला. अवघ्या अर्ध्या तासातच रविभाऊंची पेरणी संपली होती.
या तिन्ही प्रसंगांच्या 'बातम्या' झाल्यात. मात्र, सध्याचा या तिन्ही प्रसंगाचं 'व्हायरल सत्य' हे आहे. हे तिन्ही नेते संवेदनशील आहेत. त्यांच्या संवेदनशीलतेबद्दल कुणाच्याच मनात अजिबात संशय नाही. त्यातही बच्चू कडू आणि रविकांत तुपकर हे लढवय्ये, शेतकरी, शेतमजूर, वंचितांच्या आंदोलनातून पुढे आलेले नेते. या दोघांनीही शेती, तिफण, नागर, वखर, पेरणी हे काही नविन नाही. या दोघांनीही आपल्या उमेदीच्या काळात ही सारी कामं केली आहेतच. मात्र, आता 'नेते' म्हणून त्यांनी हे सारं करतांना त्यांच्या हाती असणाऱ्या व्यवस्थेला वठणीवर आणणं आवश्यक आहे. बच्चू कडू पालकमंत्री असलेल्या अकोला जिल्ह्यात बँकांनी शेतकऱ्यांची मोठी अवहेलना आणि फसवणूक केली आहे. परस्पर पिक कर्जाचं पुनर्गठण केल्यानं हजारो शेतकरी आजही पिक कर्जापासून वंचित आहे. त्यामुळे अनेकांनी खाजगी सावकारांकडून व्याजानं पैसे काढत आपली स्वप्नं पेरली आहेत. या शेतकऱ्यांची भावना मराठी गझल लेखक आबेद शेख यांच्या ओळींसारखी आहे. आबेद शेख लिहितात की,
'समजू नको ढगा हे साधेसुधे बियाणे, मी पेरले पिलांच्या चोचीमधील दाणे'.
पालकमंत्री म्हणून बच्चू कडूंनी या पिलांना त्यांच्या दाण्यांविषयी आश्वस्त करावं.
अमरावतीच्या खासदार नवनीतकौर राणा या माध्यमांमध्ये कायम चर्चेत असतात. कधी त्या सायकल चालवतात. कधी त्या आदिवासींच्या सणात त्यांच्यात मिसळत नृत्य करतात. कधी घरच्या फार्म हाऊसवर स्वयंपाक करतात. तर कधी आमदार असणाऱ्या पती रवि राणांची 'हेअरकट' करतात. लोकांना अशा गोष्टींमध्ये तेव्हढ्यापुरतं नाविण्य वाटेलही. मात्र, यातून जनतेचं जगणं खरंच सुखकर होतं का?, याचाही विचार केला जावा. मात्र, शेतकऱ्यांमध्ये 'इमेज बिल्डींगसाठी का होईना राणांना तिफण आणि सरतं हातात घ्यावं लागलं, हेही नसे थोडके. राजकारणात अलिकडे प्रसिद्धीच्या हव्यासापायी होणारे 'प्लॅन्ड इव्हेंट' प्रसिद्धीचं स्वस्त माध्यम होऊ पाहतं आहे. माध्यमं आणि पत्रकारितेसोबतच सोशल मीडियानंही या 'इव्हेंट'पेक्षा शेतकरी, सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न या व्यासपीठाद्वारे करावा.
या तिन्ही घटना समाज आणि राजकारणातील एका नव्या विचारप्रवाहाचं प्रातिनिधिक उदाहरण म्हणता येईल. पुढच्या काळात अशा अनेक 'इव्हेंट'चं अमाप पिक येईलही. आपण मात्र आपला विवेक कायम जागृत ठेवला पाहिजे. शेतकरी तर नेहमीच हा परिपाठ पाळतो. तो अशा गोष्टी, घटना फार मनाला लावून घेत नाही. कारण, त्याला 'लढण्यातून जगणं' आणि 'जगण्यातून लढण्याचं' भान कदाचित नियतीनंच दिलं असावं... कारण, त्याचं 'पसायदान' अन 'मागणं' हे या गोष्टींच्या पार पलिकडचं असतं. त्याचं जगणं या प्रार्थनेसारखं असतं, जे 'प्रसिद्धी'च्या फार दूर असतं.
'राबणारा बाप माझा, घाम तेथे गाळतो माझियासाठी स्वत:चा, जीव वेडा जाळतो एव्हढी त्याची अपेक्षा, एव्हढे त्याला हवे ज्या घरी अंधार आहे, त्या घरी उजळो दिवे'...