Holi 2023 : होळी रे होळी! मतभेद विसरून लोकांना एकत्र आणणारा सण, महत्त्व आणि पौराणिक कथा जाणून घ्या
Holi 2023 : होळीचा सण हा एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करणे, सर्वांनी एकत्र येणे, बंधुभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून याकडे पहिले जाते. होळीचा पौराणिक कथेशी संबंध तसेच महत्त्व काय आहे?

Holi 2023 : फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी हा सण भारतामध्ये, विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक सण आहे. होळी या उत्सवाला होळी पौर्णिमा, होलिकोत्सव, होलिकादहन, अशी विविध नावे आहेत. वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून होळीचे सामाजिक महत्त्व म्हटले जाते. या सणाच्या दिवशी लोक एकमेकांमधील मतभेद विसरून एकत्र येतात. असे मानले जाते की या दिवशी लोकांमधील आपापसातील सर्व प्रकारचे मतभेद दूर होतात. कारण होळीसोबतच विविध प्रकारचे रंग हे प्रेम आणि एकतेचे प्रतीक आहे. या सणानिमित्त लोकांमधील परस्पर प्रेम आणि आपुलकी वाढते. तर, धार्मिक महत्त्वाबद्दल असं सांगण्यात येत की, या दिवशी होलिका सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्तींचा नाश करते आणि सकारात्मकतेची सुरुवात होते.
विविध प्रांतांतील नावे
या उत्सवाला "होलिकादहन" किंवा "होळी", "शिमगा", "हुताशनी महोत्सव", फाग, फागुन "दोलायात्रा", "कामदहन" अशी वेगवेगळी नावे आहेत. कोकणात शिमगो म्हणतात. फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा होणाऱ्या ह्या लोकोत्सवाला "फाल्गुनोत्सव",आणि दुसऱ्या दिवशी सुरू होणाऱ्या वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त "वसंतागमनोत्सव" किंवा "वसंतोत्सव" असेही म्हणण्यात येते.
महाराष्ट्रात अशाप्रकारे साजरी होते होळी
महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून लाकडं मंत्रोच्चारात जाळतात येतात, पेटलेल्या होळीभोवती 'बोंबा' मारत लोक प्रदक्षिणा घालतात. होळीला नारळ अर्पण करून नैवेद्य दाखवतात. महाराष्ट्रात पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्याची रीत आहे. होळी नंतर 5 दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो. होळीच्या दुसऱ्या दिवशी धूलिवंदनाचा सण साजरा केला जातो. याला 'धुळवड' असेही म्हणतात. या दिवशी होळीची राख अंगाला फासली जाते किंवा ओल्या मातीत लोळण घेतली जाते. या दिवशी एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करणे, सर्वांनी एकत्र येणे, बंधुभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून याकडे पहिले जाते.
शेतकरी वर्गात होळीचे खास महत्त्व
भारतातील शेतकरी वर्गात होळी या सणाचे खास महत्त्व आहे. पौराणिक इतिहास पाहता या सणाचे आणि कृष्ण-बलराम यांचे नाते दिसून येते. होळीच्या निमित्ताने या दोन्ही देवतांचे स्मरण आणि पूजा करतात. या दिवशी हाती आलेल्या पिकाबद्दल देवाला धन्यवाद देण्यासाठी प्रार्थना करतात. होळीच्या दुसऱ्या दिवशी गव्हांच्या ओंब्या भाजण्याची प्रथा आहे. या दिवसात गव्हाचे पीक तयार होते हे त्यामागील कारण असू शकते. नवीन पीक अग्नी देवतेला समर्पित करण्याचीही प्रथा आहे.
होळीचा पौराणिक कथेशी संबंध
होळीबद्दल अनेक कथा प्रचलित आहेत. पण भक्त प्रल्हादाची कथा त्याच्या आरंभी सापडते. असे मानले जाते की प्राचीन काळी हिरण्यकशिपू नावाचा एक अतिशय शक्तिशाली राक्षस राजा होता. त्याला आपल्या सामर्थ्याचा इतका अभिमान होता की तो स्वतःला देव मानू लागला. एवढेच नाही तर त्याने सर्व लोकांना त्याची पूजा करण्याचा आदेश दिला. यासोबतच त्याने एक आदेशही जारी केला की जर कोणी त्यांच्याशिवाय इतर कोणत्याही देवतेची पूजा केली तर त्याला मृत्युदंड देण्यात येईल. राक्षस राजा हिरण्यकशिपूचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूचा भक्त होता. त्याची भक्ती इतकी दृढ होती की वडिलांनी वारंवार नकार देऊनही तो हरिभक्तीत तल्लीन राहिला. हिरण्यकशिपूच्या समजूतीनंतरही प्रल्हादने ऐकले नाही, तेव्हा पिता राजाने वेगळी योजना आखली आणि बहीण होलिकाला राजवाड्यात पोहोचण्याचा निरोप दिला. भाऊ हिरण्यकश्यपूचा निरोप मिळताच होलिका तिथे पोहोचली. तिथे गेल्यावर तिला कळलं की आपल्याला भाच्यासोबत आगीमध्ये बसावं लागणार आहे. कारण होलिका वरदान लाभले होते की आग तिला कधीही स्पर्श करू शकत नाही. जरी सुरुवातीला तिला हे मान्य नव्हते, परंतु बराच काळ ती हिरण्यकशिपूची आज्ञा टाळू शकली नाही. दुसर्याच दिवशी ती आपला पुतण्या प्रल्हाद याला कुशीत घेऊन अग्नीत बसली.
..येथूनच होळीचा सण सुरू झाला
होळीनिमित्त आख्यायिका आहे की, होलिका प्रल्हादासोबत अग्नीत बसली होती, तेव्हाही प्रल्हाद श्री हरी नामाचा जप करत होती. थोड्याच वेळात होलिका पूर्णपणे जळून गेली आणि प्रल्हाद सुखरूप वाचला. येथूनच होळीचा सण सुरू झाला आणि हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जाऊ लागला.
होळीचे महत्त्व
असुर राजा हिरण्यकश्यपू आणि त्याच्या मुलाच्या या कथेत जिथे एक पिता आपल्या मुलाच्या मृत्यूसाठी धगधगत्या अग्नीत बसवतो. पण देवाप्रती असलेल्या भक्तीमुळे अग्नी मुलाला इजा करू शकली नाही. म्हणजेच चांगल्यावर वाईटाचा विजय तर झालाच, पण तो इतिहासातीलच एक सण बनला. या घटनेने देवावर दृढ श्रद्धा असेल तर कोणतेही संकट स्पर्श करू शकत नाही, असा संदेशही दिला.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर बातम्या
Holi 2023 : होळीच्या दिवशी 4 विशेष शुभ योग! पूजा, दान केल्याने मिळेल पुण्य, ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घ्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
