(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pimpari Chinchwad Commissioner Car : त्रास दिल्याच्या रागातून दोघांकडून आयुक्तांच्या कारची तोडफोड
Pimpari Chinchwad Commissioner Car : त्रास दिल्याच्या रागातून दोघांकडून आयुक्तांच्या कारची तोडफोड
पिंपरी चिंचवड महापालिकेत स्वतंत्र दिन साजरा होत असतानाच पालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. गाडीवर हल्ला करणाऱ्या व्यक्तींमध्ये एक दृष्टिहीन व्यक्तीचा ही समावेश आहे. प्रशासनाने समस्या न सोडविता जाणीवपूर्वक त्रास दिला. असा आरोप करत दोघांनी हे पाऊल उचललं. ध्वजारोहण झाल्यावर पालिका आयुक्तांच्या डोळ्या देखत ही घटना घडली अन पालिकेतच एकच खळबळ उडाली. पालिकेच्या मुख्य इमारतीत स्वतंत्र दिन साजरा होत होता. आयुक्त शेखर सिंह यांनी ध्वजारोहण केलं, त्यानंतर पालिकेने आयोजित केलेले काही उपक्रम सुरू होते. त्याचवेळी दृष्टिहीन व्यक्ती सह दोघांनी आयुक्तांच्या गाडीच्या काचा फोडल्या अन पालिकेत एकच खळबळ उडाली. पालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी तातडीनं या दोघांना शांत केलं. या दोघांनी हे टोकाचं पाऊल का उचललं, हे कारण शोधण्यासाठी पालिका आयुक्तांसह अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली. माझ्या टपरीवर वारंवार कारवाई केली जातीये, ऊसाच्या रसाचे गुऱ्हाळ टाकण्यासाठी परवानगी दिली नाही, रमाबाई आवाज योजनेतील घरकुलास निधी दिला जात नाही, सोबतच पालिकेच्या रुग्णालयात उपचाराची तत्परता दाखवली जात नाही असे आरोप या दोघांचे होते. प्रशासनाचा वेळकाढूपणा आणि समस्यांचं निराकरण करण्याची पद्धत यानिमित्ताने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली. आता या घटनेनंतर पालिका आयुक्तांनी प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या आहेत. तसेच हे प्रकरण पुढं वाढू नये म्हणून या दोघांना ही समज देऊन त्यांना घरी सोडून देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.