ना धोनी, ना विराट कोहली,जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू कोण? राजस्थान रॉयल्ससोबत विशेष कनेक्शन, 22 व्या वर्षी घेतली निवृत्ती
World's Richest Cricketer : क्रिकेट खेळणाऱ्या देशांपैकी सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड बीसीसीआय आहे. याशिवाय सर्वात श्रीमंत क्रिकेट खेळाडू देखील भारतीय आहे.
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणून ओळखलं जातं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक खेळाडूंनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. पर्यायानं ते आर्थिक दृष्ट्या देखील समृद्ध बनले. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू कोण म्हटलं तर विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी किंवा सचिन तेंडुलकर अशी नावं आपल्या समोर येतात. मात्र, यांच्यापैकी कोणीही सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू नाही. सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूचं नाव आर्यमान बिर्ला असं आहे. आर्यमान बिर्लानं मध्य प्रदेशसाठी देशांतर्गत स्पर्धांमध्ये क्रिकेट खेळलं आहे.
विशेष बाब म्हणजे आर्यमान बिर्ला याला राजस्थान रॉयल्सनं देखील संघात घेतलं होतं. मात्र, तो प्रत्यक्ष एकाही सामन्यात खेळू शकला नाही. आर्यमान बिर्ला आदित्य बिर्ला ग्रुपचे चेअरमन कुमार मंगलम बिर्ला यांचा मुलगा आहे. आर्यमान बिर्ला यानं देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. मात्र, तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करु शकला नाही. मध्य प्रदेशसाठी त्यानं प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये 9 सामने खेळले आहेत. तर, लिस्ट ए साठी 4 सामने खेळले आहेत.
आर्यमान बिर्ला यानं भारतीय क्रिकेट संघासाठी एकही मॅच खेळली नाही. मात्र, मध्य प्रदेशसाठी तो देशांतर्गत स्पर्धेत खेळला आहे. तो जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू आहे. आर्यमान बिर्ला याची नेटवर्थ 70 हजार कोटी रुपये आहे. त्याची बहुतांश कमाई उद्योग क्षेत्रातून होते. आर्यमान बिर्ला याला 2023 मध्ये आदित्य बिर्ला फॅशन अँ रिटेल लिमिटेडचं संचालक बनवण्यात आलं आहे.
आर्यमान बिर्लानं 2017 मध्ये प्रथमश्रेणी सामना खेळला होता. मध्यप्रदेशसाठी खेळताना त्यानं 414 धावा केल्या. यामध्ये एका शतकाचा आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. आर्यमाननं शेवटचा सामना आंध्रप्रदेश विरुद्ध जानेवारी 2019 मध्ये खेळला होता. 2018 मध्ये डेब्यू लिस्ट एमध्ये हैदराबाद विरुद्ध त्यानं 4 सामने खेळले होते. सौराष्ट्र विरुद्ध त्यानं लिस्ट ए चा सामना खेळला.
आर्यमान बिर्ला याला राजस्थान रॉयल्सनं 2018 मध्ये ऑक्शनमध्ये खरेदी केलं होतं. 2018 आणि 2019 च्या आयपीएलच्या हंगामात तो संघासोबत होता. मात्र, त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. 2019 ला राजस्थाननं त्याला रिलीज केलं. राजस्थाननं ऑलराऊंडर म्हणून 30 लाख रुपयांमध्ये संघात घेतलं होतं. आर्यमान बिर्ला यानं वयाच्या 22 व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.
इतर बातम्या :