Team India Rishabh Pant : चॅम्पियन ट्रॉफीच्या 2 दिवस आधी टीम इंडियाच्या मागे लागली साडेसाती! सराव सत्रादरम्यान स्टार खेळाडूला दुखापत, पाहा Video
चॅम्पियन ट्रॉफी 2025चा थरार येत्या 2 दिवसात रंगणार आहे, पण त्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.

Champions Trophy 2025 Team India : चॅम्पियन ट्रॉफी 2025चा थरार येत्या 2 दिवसात रंगणार आहे, पण त्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. दुबईमध्ये संघाच्या सराव सत्रादरम्यान भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतला गुडघ्याला दुखापत झाली आहे. भारताचा पहिला सामना 20 फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे आणि त्याच्या फक्त तीन दिवस आधी, पंतला त्याच गुडघ्याला दुखापत झाली आहे. हार्दिक पांड्याचा एक शॉट जोरात पंतच्या डाव्या गुडघ्याला लागला. त्यानंतर तो खुप वेदनेने दिसत होता.
यानंतर, हार्दिक पांड्या लगेच नेटमधून बाहेर आला आणि पंतच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी गेला. पंत खुप वेदनेने दिसत होता आणि त्यानंतर तो लंगडत असल्याचे दिसून आले. पण, दुखापत गंभीर नव्हती आणि फिजिओने उपचार घेतल्यानंतर पंतने ताबडतोब पॅड घातले आणि फलंदाजीचा सराव सुरू केला. ड्रेसिंग रूममधून परतल्यानंतर तो अक्षर पटेलसोबत हसताही दिसला. पंत पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफी खेळताना दिसणार आहे. भारत आपले सर्व सामने दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळेल.
रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा जोरदार सराव
गेल्या आठवड्यात कटकमध्ये इंग्लंडविरुद्ध शतक झळकावल्यानंतर रोहित चांगल्या उत्साहात दिसत होता. विराट कोहलीने सराव करताना एकाग्रतेवर लक्ष केंद्रित केले. मुख्य फलंदाजांच्या नेट प्रॅक्टिस दरम्यान, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती आणि पंत यांनी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप यांच्यासोबत सराव केला.
मोहम्मद शमीने मोर्ने मॉर्केलसोबत घालवला वेळ
मोहम्मद शमीने गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केलसोबत बराच वेळ घालवला. इंग्लंडविरुद्ध टी-20 आणि एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या शमीने गुडघ्यावर स्ट्रेचेबल कॅप घातली होती. त्याने एका लहान रनअपने सुरुवात केली. फलंदाज नेटवर येण्यापूर्वी शमी त्याच्या लेंथमध्ये बदल करताना दिसला आणि गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्केलसह फलंदाजांच्या टोकाकडे गेला. हार्दिक आणि श्रेयस अय्यर यांनी कुलदीप यादव आणि इतर फिरकीपटूंना खेळवले.
Rishabh Pant got hit on his knees 👀
— Nikhil (@TheCric8Boy) February 16, 2025
- hope this is not serious 🙏 pic.twitter.com/Nz4e93Jf1b
भारत 20 फेब्रुवारी रोजी दुबई येथे बांगलादेशविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. यानंतर, संघ 23 फेब्रुवारी रोजी त्यांचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी सामना करेल. त्यानंतर टीम इंडियाचा सामना न्यूझीलंडशी होईल. गट अ आणि गट ब मधील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. भारताने दोनदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. 2002 मध्ये त्यांनी यजमान श्रीलंकेसोबत ट्रॉफी शेअर केली. तर 2013 मध्ये भारताने यजमान इंग्लंडला पाच धावांनी पराभूत केले होते.
हे ही वाचा -
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
