Virat Kohli Profile : क्रिकेटचा 'किंग', क्रीजवर टिकला की विरोधी संघाला सळो की पळो करून सोडणारा लढवय्या 'विराट'
Virat Kohli Profile : क्रिकेटचा किंग, भारताचा स्टार बॅटर विराट कोहलीचे नाव जगातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये घेतले जाते. तो एकदा क्रीजवर स्थिरावला की, तो विरोधी संघाला अक्षरशः सळो की पळो करून सोडतो.

Virat Kohli Profile : क्रिकेटचा किंग, भारताचा स्टार बॅटर विराट कोहलीचे (Virat Kohli) नाव जगातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये घेतले जाते. तो एकदा क्रीजवर स्थिरावला की, तो विरोधी संघाला अक्षरशः सळो की पळो करून सोडतो. विराट बॅटिंगचा बादशाह फिल्डिंगचा राजा तर आहेच. पण फिटनेसचा देखील बाप आहे. त्याची मैदानावरील ऊर्जा, जोश आणि फिटनेस पाहून प्रत्येक जण अवाक होतो. त्याच्या नावावर आजवर अनेक बडे विक्रम आहेत. भलेभले गोलंदाज (Bowler) त्याच्यासमोर हात टेकतात. त्याच्या खेळीने त्याने आतापर्यंत भारतीयांची अनेकदा मनं जिंकली आहे. आज रविवारी भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना (IND vs NZ Final Champions Trophy 2025 ) आज रविवारी (दि. 09) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. त्यामुळे भारतीयांना आजच्या सामन्यात देखील मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात विराट कोहलीच्या क्रिकेटच्या कारकिर्दीबद्दल...
विराट कोहलीचा जन्म 5 नोव्हेंबर 1988 रोजी दिल्लीतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला आहे. विराट कोहली बारावी पास आहे. त्याने विशाल भारती पब्लिक स्कूलमधून नववीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांने पश्चिम विहार येथील सेव्हियर कॉन्व्हेंट स्कूलमध्ये बारावीपर्यंत शिक्षण घेतले. देशासाठी क्रिकेट खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या कोहलीने त्याचं शिक्षण अर्धवट सोडलं आणि क्रिकेटचा ध्यास घेतला. त्याच्या मेहनत, जिद्द आणि प्रामाणिकपणामुळे तो आता भारतीय क्रिकेट संघाचा एक महत्त्वाचा घटक बनला आहे.
2000 साली क्रिकेटची सुरुवात
विराट कोहलीने त्याच्या क्रिकेटच्या करिअरची सुरुवात ऑक्टोबर 2000 मध्ये पॉली उम्रीगर ट्रॉफीमधून केली आहे. या स्पर्धेत तो अंडर 15 दिल्लीच्या संघासाठी खेळला. 2004 मध्ये त्याची विजय मर्चंट ट्रॉफीसाठी अंडर 17 च्या दिल्ली संघात निवड करण्यात आली. जुलै 2006 मध्ये कोहलीची इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या अंडर 19 च्या भारतीय संघात निवड करण्यात आली. त्यावेळी भारताच्या क्रिकेट अंडर 19 संघाने सामन्यांच्या दोन्ही मालिकांमध्ये अजिंक्यपद मिळवले. दौऱ्याच्या समाप्तीच्या वेळी संघाचे प्रशिक्षक लालचंद राजपूत कोहलीच्या फलंदाजीने प्रभावित झाले होते. त्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात भारताच्या अंडर 19 संघाने पाकिस्तानचा दौरा केला. त्यावेळी कसोटी मालिकेत विराटने 58 तर एकदिवसीय मालिकेत 41.66 च्या सरासरीने धावा केल्या होत्या.
2006 साली वडिलांचे निधन
विराट कोहलीचे वडील प्रेम कोहली यांचे 2006 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर दुसऱ्याच दिवशी कर्नाटकविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात विराट कोहलीने 95 धावांची शानदार खेळी केली होती. त्याची खेळी झाल्यानंतर तो त्याच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी गेला होता. कोहलीच्या खऱ्या करिअरची सुरुवात इथूनच झाली आणि त्यानंतर विराटने मागे वळून पाहिले नाही. आजही त्याच्या प्रत्येक शतकानंतर विराट मैदानावरच त्याच्या वडिलांना नमस्कार करायला कधीही विसरत नाही.
आंतरराष्ट्रीय संघात पदार्पण
विराट कोहलीचे 2008 साली आंतरराष्ट्रीय संघात पदार्पण झाले. वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात कोहलीला फलंदाजीत काही विशेष करता आले नाही. तो 4 धावा करून बाद झाला. ऑगस्ट 2008 मध्ये श्रीलंकेतील वनडे मालिकेत विराट कोहलीला सलामीला फंलदाजी करण्याची संधी देण्यात आली. त्यानंतर त्याने सलामीवीर म्हणून काही प्रशंसनीय खेळी खेळल्या होत्या. ज्यामुळे भारताला एकदिवसीय मालिका जिंकण्यात मदत झाली होती. त्यानंतर काही काळ विराटला संघाबाहेर राहावे लागले होते. त्यानंतर कोहलीला भारतीय संघात पुनरागमन झाले. डिसेंबर 2009 मध्ये श्रीलंकेविरुद्ध प्रभावी धावसंख्येचा पाठलाग करताना त्याने पहिले एकदिवसीय शतक झळकावले होते. त्यानंतर विराटने भारतासाठी चांगली कामगिरी केली. ज्यामुळे त्याला विश्वचषक 2011 च्या संघात स्थान मिळाले होते. सचिन तेंडूलकर आणि वीरेंद्र सेहवाग ऑऊट झाल्यानंतर कोहलीने गौतम गंभीरसह 83 धावांची भागीदारी केली होती. त्याने 35 धावांची महत्त्वपूर्ण इनिंग खेळली होती.
2017 साली अनुष्का शर्माशी विवाह
2012 च्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर त्याच्या वाईट खेळीमुळे त्याला संघात संधी न देण्याचे सिलेक्टर्सचे मत होते. पण महेंद्रसिंग धोनीने त्यावेळी विराटवर विश्वास दाखवला आणि त्याने तो सार्थ देखील केला. बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्यासोबत विराटने 11 डिसेंबर 2017 रोजी विवाह झाला आणि त्याच्या वैवाहिक आयुष्याला सुरुवात झाली. अनुष्का आणि विराट यांना वामिका, आणि अकाय अशी दोन गोंडस मुलं आहेत.
कर्णधार पदाची सूत्र
ॲडलेड येथे डिसेंबर 2014 मध्ये सुरू झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी पहिल्यांदाच दुखापतग्रस्त धोणीऐवजी कर्णधारपदाची सुत्रे कोहलीच्या हाती दिली गेली. सामन्यात कोहलीने पहिल्या डावात 115 धावा केल्या. कसोटी कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात शतक करणारा तो 4 था भारतीय कर्णधार ठरला. दुसऱ्या डावात पाचव्या दिवशी भारतासमोर विजयासाठी 364 धावांचा डोंगर होता. पण भारताची धावसंख्या 2 गडी बाद 57 असताना कोहली फलंदाजीस आला आणि त्वेशाने फलंदाजी करू लागला. त्याने मुरली विजय सोबत तिसऱ्या विकेटसाठी 185 धावांची भागीदारी केली. परंतु त्यानंतर भारताचा डाव 315 धावांवर आटोपला. 175 चेंडूत 141 धावा करून कोहली सामन्यातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता.
वनडे क्रिकेटमध्ये विराट कोहलीची कामगिरी
विराट कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत 301 सामने खेळले आहेत. यामधील 289 डावात त्याने 58.11 च्या सरासरीने आणि 93.35 च्या स्ट्राईक रेटने 14180 धावा केल्या आहे. विराट कोहलीच्या खात्यात आतापर्यंत 51 शतकांची नोंद आहे. तर 74 अर्धशतकेही विराटने केली आहेत. क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकरच्या वनडेतील शतकांचा विक्रमही विराट कोहलीने मोडला आहे.
विराटचे कसोटी मालिकेतील करिअर
विराट कोहलीने आतापर्यंत भारतासाठी एकूण 123 कसोटी सामने खेळले आहेत. या काळात त्याने खेळलेल्या 210 डावांमध्ये 46.85 च्या सरासरीने आणि 55.57 स्ट्राईक रेटने त्याने 9230 धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये कोहलीच्या नावावर 30 शतके आणि 31 अर्धशतके आहेत.
विराट कोहलीच्या विक्रमांची मालिका
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम हे किंग कोहलीच्या नावावर आहेत. टी 20 क्रिकेटमध्ये एकही चेंडू न टाकता विकेट घेण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. 2011 मध्ये इंग्लंडविरोधात विराट कोहली करिअरमधील पहिले षटक टाकण्यास आला. विराट कोहलीने टाकलेला चेंडू पंचांनी वाईड दिला. पण एमएस धोनीने त्या चेंडूवर केविन पीटरसनला स्टम्पिंग बाद केले. विराट कोहलीने कसोटीत कर्णधार असताना सात द्विशतके ठोकली आहेत. असा करणारा विराट कोहली एकमेव खेळाडू आहे. श्रीलंका 2, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकाविरोधात द्विशतक ठोकली आहेत. सर्वात वेगवान 10 हजार धावांचा रेकॉर्ड विराट कोहलीच्या नावावर आहे. विराट कोहलीने 205 डावात दहा हजार धावांचा पल्ला पार केला आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात गांगुलीचा विक्रम मोडणार?
विराट कोहलीने आतापर्यंत दोन एकदिवसीय विश्वचषक फायनल (2011 आणि 2024) आणि दोन चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल (2013-2017) खेळले आहेत. या 4 एकदिवसीय आयसीसी अंतिम सामन्यांमध्ये त्याने 34.55 च्या सरासरीने 137 धावा केल्या असून. या काळात त्याने एक अर्धशतक झळकावले आहे. आयसीसी एकदिवसीय अंतिम सामन्यात विराट भारताकडून सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज आहे. आता त्याला नंबर एकवर असलेल्या सौरव गांगुलीचा विक्रम मोडण्याची संधी असून सौरव गांगुलीने भारतासाठी 4 आयसीसी फायनलमध्ये एकूण 141 धावा केल्या आहेत. विराट कोहलीने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध आणखी 5 धावा केल्या तर तो सौरव गांगुलीचा आयसीसी एकदिवसीय स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतासाठी सर्वाधिक धावा करणार खेळाडू ठरणार आहे.
आणखी वाचा




















