बांगलादेशनंतर अमेरिकेत विद्यार्थ्यांची आक्रमक भूमिका, तीन विद्यापीठांच्या प्रमुखांनी दिले राजीनामे, काय घडलं?
Students Protest : बांगलादेशमध्ये विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन केल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांना सरकारमधून पायऊतार व्हावं लागलं होतं.
न्यूयॉर्क : बांग्लादेशमध्ये विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन करताच पंतप्रधान शेख हसीना यांना पद सोडून भारतात दाखल व्हावं लागलं होतं. बांगलादेशनंतर अमेरिकेत देखील विद्यार्थी (US Student Protest) आक्रमक झाले आहेत. अमेरिकेतली पॅलेस्टाईन समर्थक विद्यार्थी संघटना डेमोक्रेटिक सोशालिस्टस ऑफ अमेरिका यांनी आंदोलन सुरु केलं आहे. या विद्यार्थ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला असून या शैक्षणिक वर्षातील आगामी सत्रात बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थी घरीच अभ्यास करणार असून विद्यापीठ आणि महाविद्यालयांवर बहिष्कार टाकणार आहेत. गेल्या शैक्षणिक सत्रात देखील विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु ठेवलं होतं.
द फ्री प्रेसच्या एका रिपोर्टनुसार अमेरिकेतील लोकशाही, समाजवादी तरुणांची संघटना वायडीएसएनं गेल्या महिन्यात एक योजना बनवली होती. त्यानुसार देशातील 100 हून अधिक विद्यापीठांमधील सदस्यांना आंदोलनात भाग घेण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. पॅलेस्टाईनसाठी विद्यार्थी संपावर अशी त्याची टॅगलाईन होती. वायडीएसएनं 2024-25 पासून सुरुवातीच्या शैक्षणिक सत्रांमध्ये विद्यापीठांवर बहिष्कार घालण्याचं आवाहन करण्यात आलं होतं.
विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षणसंस्थांच्या परिसरात गाझा पट्टीत शस्त्रसंधी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची बाजू मांडण्यासाठी संप करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. त्यावेळी विद्यार्थ्यांना हे आंदोलन किती दिवस किंवा कालावधीपर्यंत सुरु राहणार हे सांगण्यात आलं नव्हतं. अमेरिकेतील डाव्या विचाराच्या विद्यार्थ्यांच्या संघटनांनी हे नव्या प्रकारचं आंदोलन पुकारलं आहे. ते विद्यार्थी पॅलेस्टाईनच्या नागरिकांच्या हक्कासाठी आवाज उठवत आहेत.
गेल्या शैक्षणिक सत्रात देखील विद्यार्थी कॉलेजच्या परिसरात आक्रमक भूमिका घेतली होती. काही विद्यापीठांमध्ये हिंसक घटना देखील घडल्या होत्या. कोलंबिया आणि कॅलिफोर्निया विद्यापीठात विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला होता. या दरम्यान तीन विद्यापीठांच्या प्रमुखांनी राजीनामे दिले आहेत. कोलंबिया विद्यापीठाचे प्रमुख मिनोचे शफीक यांनी बुधवारपासून सुरु होणाऱ्या सत्रापूर्वी राजीनामा दिला. गेल्या शैक्षणिक सत्रात कोलंबिया विद्यापीठात आंदोलन सुरु झालं होतं. ते विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचं केंद्र बनलं आहे. पेन्सिलवेनिया विद्यापीठाचे प्रमुख लिज मैगिल यांनी देखील डिसंबेरमध्ये राजीनामा दिला होता. तर, जानेवारीत हार्वर्ड विद्यापीठाचे प्रमुख क्लॉडाइन यांनी देखील राजीनामा दिला होता.
दरम्यान, बांगलादेशात विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर शेख हसीना यांना सत्ता सोडावी लागली होती. सध्या बांगलादेशात अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस सरकारचं नेतृत्त्व करत आहेत.
संबंधित बातम्या :