Mahadev Munde : मुंबईत अधिवेशन सुरू अन् बीडमध्ये महादेव मुंडेंच्या पत्नीचं आमरण उपोषण स्थगित; पोलिसांना एक महिन्याचा अल्टीमेटम
Mahadev Munde Case : परळी येथील महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आमरण उपोषणाला बसल्या होत्या.

Mahadev Munde Case : परळी येथील महादेव मुंडे हत्या प्रकरणातील (Mahadev Munde Murder Case) आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे (Dnyaneshwari Munde) आजपासून आमरण उपोषणाला बसल्या होत्या. बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी उपोषण सुरु केले होते. महादेव मुंडे प्रकरणाचा तपास तात्काळ एसआयटी आणि सीआयडीकडे दाखल करावा. खुनाच्या कटात ज्यांनी फोन केले त्या आरोपींचे सीडीआर काढावेत. महादेव मुंडे यांच्या आरोपींना तात्काळ अटक करावी, या 3 प्रमुख मागण्यांसाठी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्याकडून आमरण उपोषण केले जात होते. ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या उपोषणाला मस्साजोग येथील ग्रामस्थांनीही पाठिंबा दिला होता. आता अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्याकडून मुंडे कुटुंबियांना आरोपींना करण्याचे आश्वासन देण्यात आल्यानंतर त्यांनी आपले आमरण उपोषण तूर्तास स्थगित केले आहे.
परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांची गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात हत्या झाली होती. या हत्या प्रकरणाला 16 महिने उलटून गेले, तरीही आरोपी मोकाटच आहेत. पोलिसांनी एकाही आरोपीला अटक केली नाही. वाल्मिक कराड आणि त्यांच्या साथीदारांनी महादेव मुंडेंची हत्या केल्याचा आरोप केला जात आहे. पोलिसांनी आरोपींना अटक करून कठोरातील कठोर शिक्षा करावी, अशी मागणी मुंडे कुटुंबीयांची आहे. या मागणीसाठी हे कुटुंबीय बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसल्या होत्या. त्यांच्या उपोषणाचा आज पहिला दिवस होता.
ज्ञानेश्वरी मुंडे यांचे आमरण उपोषण तूर्तास स्थगित
अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांनी उपोषण स्थळी भेट देत मुंडे कुटुंबियांची समजूत काढली. महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपीला लवकरात लवकर अटक करू, आमच्यावर विश्वास ठेवा, असा शब्द अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांनी मुंडे कुटुंबियांना दिला. यानंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आमरण उपोषण तूर्तास स्थगित केले. अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांनी मुंडे कुटुंबियांना पाणी पाजल्यानंतर त्यांनी उपोषण सोडले.
काय म्हणाल्या ज्ञानेश्वरी मुंडे?
ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्या की, एक महिन्यात आरोपीला अटक करू, असे आश्वासन दिले. त्यामुळे उपोषण स्थगित केले आहे. पोलीस अधीक्षकंवर आमचा विश्वास आहे. आमची मागणी मान्य झाली नाही तर उपोषण पुढे सुरू ठेवणार आहे. पोलीस अधीक्षक यांनी आश्वासन दिले आहे. त्यांच्या विश्वासाला मान देऊन एक महिन्याची मुदत दिली आहे. आता एक महिन्याचा कालावधी हा शेवटचा असणार आहे. एक महिन्यात आरोपीला अटक केली तर ठीक, नाहीतर पुन्हा उपोषण मात्र न्याय मिळत नाही तोपर्यंत लढत राहणार आहे. मस्साजोगच्या ग्रामस्थांचा मला पाठिंबा आहे. सुप्रिया सुळे यांचे सकाळपासून चार फोन आले आहेत. त्यामुळे त्यांचा मान ठेवून उपोषण तूर्तास स्थगित करत आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
आणखी वाचा























