Cyber Crime : बनावट पोलिस अधिकाऱ्याचा चुकून सायबर सेलला कॉल, व्हिडीओ होतोय व्हायरल
Online Scam : पोलिस असल्याचे भासवून फसवणूक करणाऱ्या घोटाळेबाजाने खऱ्या अधिकाऱ्याला फोन केला. त्या संबंधित सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय.
मुंबई : पोलिस म्हणून फसवायला गेला आणि स्वतःच पोलिसांच्या जाळ्यात अलगद सापडला अशी काहीशी घटना केरळमधील एका ठगाच्या बाबतीत घडली. मुंबई पोलिस अधिकारी असल्याचं सांगत लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारा एक घोटाळेबाज केरळमधील त्रिशूर शहर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. या आरोपीने चुकून सायबर पोलिसांनाच कॉल केला आणि त्यानंतर तो सापडला.
पोलिसांचा गणवेश घालून व्हिडीओ कॉल करायचा आणि लोकांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे उकळायचे असा धंदा हा आरोपी करायचा. असाच एक कॉल करताना त्याने चुकून त्रिशूर सायबर सेलमधील एका पोलिसाला कॉल केला. व्हिडीओ कॉलवर त्याने स्वत:ची ओळख मुंबई पोलिस अधिकारी असल्याचे सांगितले. मात्र, दुसरीकडे स्वत: त्रिशूर सायबर सेलचा एक अधिकारी होता, ज्याने आपली ओळख लपवली आणि घोटाळेबाजाशी संवाद साधला.
समोर पोलिस अधिकारी दिसल्याने धक्का
घोटाळेबाजाने समोरच्या पोलिसाला कुठे आहे असं विचारलं. त्यावर त्या पोलिस अधिकाऱ्याने आपला कॅमेरा निट काम करत नसल्याचं सांगितलं. घोटाळेबाज त्याला वारंवार कॅमेरा चालू करण्याचा आग्रह करत होता. अधिकाऱ्याने नंतर कॅमेरा ऑन केला आणि त्या घोटाळेबाजाचा चेहराच पडला. कारण व्हिडीओमध्ये दिसणारा समोरचा माणूस हा पोलिस अधिकारी असल्याचं दिसून आलं. त्यामुळे घोटाळेबाजाला त्याची चूक लगेच लक्षात आली.
संधीचा फायदा घेत त्रिशूरच्या अधिकाऱ्याने घोटाळेबाजाला दम दिला. पोलिस अधिकारी म्हणाला की, "हे काम थांबव. मला तुझा पत्ता, ठिकाण आणि सर्व काही माहीत आहे. हा एक सायबर सेल आहे. हे सर्व थांबवणे तुझ्यासाठी चांगले होईल."
View this post on Instagram
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
त्रिशूर शहर पोलिसांनी मंगळवारी हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला, जो काही तासांतच व्हायरल झाला. यावर लाखो व्ह्यूज आणि अनेक प्रतिक्रिया आल्या. या मजेशीर घटनेवर लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या.
एका यूजरने लिहिले की, "जेव्हा तुम्हाला वाटते की तुम्ही सगळ्यांना मूर्ख बनवू शकता तेव्हा असे होते. बिचाऱ्याला तो कोणाशी बोलत आहे हे देखील माहित नव्हते."
घोटाळेबाजाची चूक पाहून काहींना हसू आवरता आले नाही. एकाने लिहिले, रेड हँड पकडला गेला. हा तो क्षण आहे जेव्हा तुम्हाला कळते की तुम्हीच अडकले आहात अशी प्रतिक्रिया एका यूजरने दिली.
पोलिसांच्या कामाचं कौतुक
अनेकांनी त्रिशूर पोलिसांची जलद कारवाई आणि घोटाळेबाजांचा पर्दाफाश केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. एका युजरने लिहिले, याला खरी स्मार्टनेस म्हणतात.