(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दिवसाढवळ्या फाडफाड इंग्रजी बोला... दारूच्या दुकानाचं पोस्टर व्हायरल, कलेक्टरांनी केला 10 हजारांचा दंड
Burhanpur Liquor Shop Viral Poster : इंग्रजी बोलण्यास शिकवणारे कोचिंग क्लासेस कोपऱ्या-कोपऱ्यावर निघाले असताना दारुच्या ठेक्याजवळचे एक पोस्टर सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे.
भोपाळ : इंग्रजी ही जगाच्या ज्ञानाची भाषा असून आजच्या काळात ती बोलता येणं आणि समजणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्यांची पार्श्वभूमी इंग्रजी शाळेची नाही अशा विद्यार्थ्यांसाठी किंवा लोकांसाठी इंग्रजी बोलण्यासाठी गावोगावी कोचिंग क्लासेस निघाले आहेत. इंग्रजीचा कोणताही गंधही नसताना फाडफाड इंग्रजी बोलता येईल का? याचं उत्तर नक्कीच नाही असं आहे. पण मध्य प्रदेशातील एका दारूच्या दुकानासमोर असाच एक बोर्ड लावला असून तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायल होत आहे. 'दिवसाढवळ्या इंग्रजी बोलायला शिका' असं त्या बोर्डवर लिहिलं असून तो बोर्ड देशी दारूच्या ठेक्याचा आहे. मध्य प्रदेशातील बुऱ्हानपूरमधील दुकानाचा हा बोर्ड असून कलेक्टरांनी त्यावर कारवाई करत दुकानदाराला 10 हजारांचा दंड ठोठावला आहे.
Burhanpur Liquor Shop Viral Poster : इंग्रजी बोलण्यासाठी 'मार्ग' दाखवला
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले हे पोस्टर मध्य प्रदेशातील बुऱ्हानपुरातील एका देशी दारूच्या दुकानाचा पत्ता सांगणारे आहे. हे पोस्टर प्रथमदर्शनी पाहिल्यानंतर स्पोकन इंग्लिश कोचिंग सेंटरचे पोस्टर असल्याचं वाटतं. दारूचा दुकानचालक ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी या पोस्टरच्या माध्यमातून दारू पिऊन इंग्रजी बोलता येते असं सांगू इच्छित आहे.
दारू प्यायल्यानंतर माणसाचा जिभेवरचा तोल जातो, अनेकजण आपण काय बोलतात हे त्यांनाच लक्षात येत नाही. अनेकजण तर दारू प्यायल्यानंतर इंग्रजीत बोलायला सुरूवात करतात. ते अशा अविर्भावात आणि आत्मविश्वासाने इंग्रजी बोलतात की जणू काय त्यांचे त्यावर प्रभुत्वच आहे. त्यामुळेच दारू प्यायल्यानंतर तुम्ही इंग्रजीत बोलू शकता असा एक प्रकारचा संदेशच या दारूच्या ठेकेदाराने दिला आहे.
शिक्षणाची चेष्टा लावल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप
पण ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी लावलेल्या या पोस्टरमधून चुकीचा संदेश जात असल्याचा आरोप स्थानिक लोकांनी आणि विद्यार्थ्यांनी केला आहे. हे पोस्टर पाहून त्या ठिकाणाहून ये-जा करणाऱ्यांचा विशेषत: तरुण आणि विद्यार्थ्यांचा चांगलाच गोंधळ होत असल्यांच दिसंतय. हे पोस्टर कोणी लावले असा प्रश्न दारू दुकानाच्या कर्मचाऱ्यांना विचारला असता त्यांनीही टाळाटाळ करत कोणतेही उत्तर दिले नाही.
जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई, 10 हजारांचा दंड
दारुच्या ठेकेदाराने लावलेले हे पोस्टर म्हणजे शिक्षणाची क्रूर चेष्टा असल्याचा आरोप आता स्थानिक विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे बुऱ्हानपूरच्या जिल्हाधिकारी भव्या मित्तल यांना या पोस्टरबाबत माहिती मिळताच त्यांनी उत्पादन शुल्क विभागाला तातडीने हे पोस्टर काढण्याचे आदेश दिले. तसेच हे पोस्टर लावणाऱ्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. जिल्हा उत्पादन शुल्क विभागाने संबंधित दारू ठेकेदारावर 10 हजार रुपयांचा दंड वसूल करून कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.
ही बातमी वाचा: