पत्नी गरोदर राहत नव्हती, सोनोग्राफी केल्यानंतर वय लपवल्याचं समोर; जास्त वयाच्या पत्नीवर पतीने दाखल केला फसवणुकीचा गुन्हा
Ahmedabad Fraud Case : लग्नाच्या वेळी 32 वय असल्याचं सांगितलं, पण सोनोग्राफी केल्यानंतर वय हे 40 पेक्षा जास्त असल्याचा आरोप करत पतीने पत्नीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
अहमदाबाद: असं म्हटलं जातंय की लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात. पण अलिकडच्या काळात लग्न जमण्यासाठी काय काय करावं लागतंय हे ज्याचं त्यालाच माहीत. अनेकवेळा वय निघून गेलं असताना कागदोपत्री वय कमी केलं जातं आणि लग्न ठरवलं जातं. लग्नानंतर ही गोष्ट उघड जरी झाली तरी मग ते निभावून नेलं जातं. पण गुजरातमध्ये अशाच एका प्रकरणात पतीने चक्क पत्नी आणि त्यांच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल केला. लग्नाच्या वेळी मुलीचं वय कमी दाखवलं, पण गरोदर राहत नसल्याने चाचणी केल्यानंतर मात्र बिंग फुटलं. पत्नी ही पतीपेक्षा तब्बल आठ वर्षांनी मोठी असल्याचं समोर आलं. पतीने या प्रकरणी पत्नी आणि तिच्या कुटुंबीयावर गुन्हा दाखल केला आहे.
हे विचित्र प्रकरण गुजरातमधील अहमदाबादमध्ये उघडकीस आलं आहे. अहमदाबादच्या सरखेज भागात राहणाऱ्या एका महिलेला वर्षभरापासून गर्भधारणा होऊ शकली नाही. तेव्हा तिचा 34 वर्षीय पती तिला डॉक्टरांकडे घेऊन गेला. त्यावेळी केलेल्या वैद्यकीय अहवालात ती महिला 40 वर्षांची असल्याचे समोर आलं. वैद्यकीय मदतीशिवाय ती आई होऊ शकत नाही असं डॉक्टरांनी सांगितलं.
सोनोग्राफी अहवालातील खुलासा झाल्यानंतर पतीच्या पायाखालची जमीनच सरकली. लग्नाच्या वेळी पत्नीचे वय 32 वर्षे असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र सोनोग्राफीमध्ये तिचे वय 40 वर्षांपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले. पतीने अहमदाबाद पोलिसांकडे तक्रार दाखल करून पत्नीचे वय लपविल्याबद्दल कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांवर कारवाई करावी असे पतीने तक्रारीत म्हटले आहे.
पतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी पत्नी, तिचे वडील आणि तिच्या नातेवाईकांसह आठ जणांविरुद्ध फसवणूक, गुन्हेगारी कट आणि धमकावण्याशी संबंधित अनेक कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
काय आहे घटना?
या घटनेतील पती पत्नी असलेल्या जोडप्याची मे 2023 मध्ये एकमेकांशी ओळख झाली होती. लग्नासाठी देण्यात आलेल्या बायोडेटामध्ये त्या मुलीचं वय हे 18 मे 1991 असं नमूद होतं. त्यामुळे तिचं वय हे मुलापेक्षा 18 महिन्यांनी लहान असल्याचं दाखवण्यात आलं. पण मुलाकडच्या लोकांनी वारंवार मागणी करूनही मुलीच्या बाजूच्यांनी तिचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा इतर शैक्षणिक पुरावे दिले नव्हते. नंतर यासंबंधित सर्व दाखले हे बनावट पद्धतीने काढण्यात आले आणि पतीला देण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.
गर्भधारणा होत नव्हती म्हणून सोनोग्राफीचा निर्णय
पतीच्या म्हणण्यानुसार, अनेक महिने प्रयत्न करूनही गर्भधारणेचे प्रयत्न अयशस्वी ठरले. त्यामुळे घरी कुणालाही न सांगता त्याने पत्नी आणि मेहुणीसह जुहापुरा येथील डॉक्टरांकडून स्वत:ची तपासणी करून घेतली. पत्नीने हा अहवाल पतीला सांगितला नाही.
यानंतर पतीने सप्टेंबर 2023 मध्ये पुन्हा पालडी येथील स्त्रीरोगतज्ञाचा सल्ला घेतला. त्यावेळच्या सोनोग्राफी अहवालात पत्नीचे वय 40 ते 42 वर्षांच्या आसपास असल्याचे समोर आले. पत्नी नैसर्गिकरित्या गर्भधारणा करू शकणार नाही असे डॉक्टरांनी सांगितले. यानंतर पतीने जुहापुराच्या डॉक्टरांकडून रिपोर्टही मिळवला. दोघांचे निष्कर्ष सारखेच असल्याचे दिसून आले.
पत्नीविरोधात गुन्हा दाखल
या प्रकरणात पत्नीचे वय हे पतीपेक्षा आठ वर्षांनी जास्त असल्याचं समोर आलं. त्यामुळे लग्नावेळी खोटं वय दाखवून आपली फसवणूक करण्यात आल्याचा आरोप पतीने केला. त्यानंतर पतीने पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांविरोधात फसवणूक, धमकी देणे आणि गुन्हेगारी कट रचण्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे.