लग्नात मानपान केला नाही, स्वयंपाक करता येत नाही...; सासरच्या मंडळींकडून टोमणे, विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
Crime News: टिटवाळा भागातील हरीओम व्हॅली या इमारतीमध्ये ही घटना घडली.
Crime News: 25 वर्षीय विवाहितेचा सासरच्या मंडळीकडून मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याने तिने टोकाचे पाऊल उचलत राहत्या घरात आत्महत्या केल्याची धक्कादायक (Crime News) घटना समोर आली आहे. टिटवाळा भागातील हरीओम व्हॅली या इमारतीमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी कल्याण ग्रामीण तालुका पोलीस ठाण्यात सासरच्या पाच नातेवाईकांवर गुन्हा दाखल करून पाचही नातेवाईकांना अटक केली आहे.
लग्नात मानपान केला नाही, स्वयंपाक करता येत नाही..., असे सतत टोमणे सासरकडील लोक मारत होते. या त्रासाला कंटाळून विवाहितेने हे टोकाचं पाऊस उचलल्याचं सांगण्यात येत आहे. पती केतन दिनकर भांगरे ,सासरा दिनकर काशिनाथ भांगरे ,सासू लतिका भांगरे, दीर गुंजन भांगरे आणि जाव मनीषा भांगरे असे अटक केलेल्या नातेवाईकांची नावे आहे. तर आरती दिनकर भांगरे (25) असे आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचे नाव आहे.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक आरती ही मूळची नाशिक जिल्ह्यात राहणारी होती. तिचे गेल्याच वर्षी 2023 मध्ये आरोपी दिनकर याच्याशी विवाह झाला होता. विवाह झाल्यानंतर काही दिवसातच सासरच्या मंडळींकडून मृत आरतीचा छळ सुरु केला. त्यातच 21 मे 2023 ते 10 ऑगस्ट 2024 पर्यंत तिचा मानसिक व शारीरिक छळ करत तुला स्वयंपाक करता येत नाही. लग्नात मानपान केलं नाही,असे वारंवार टोमणे तसेच नवीन घर घेण्यासाठी 20 लाख रुपये माहेरहुन आणण्यासाठी मृतक आरतीच्या मागे गुन्हा दाखल असलेल्या पाचही नातेवाईक आरोपींनी मागणी करत होते. त्यांच्या याच छळाला कंटाळून 10 ऑगस्ट रोजी सासरी राहत असतानाच, घरातील बेडरूममध्ये ओढनीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
पतीसह पाच नातेवाईकांवर गुन्हा दाखल-
घटनेची माहिती मिळताच कल्याण तालुका पोलीस पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत आरतीचा मृतदेह उत्तरणीय तसपाणीसाठी मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात रवाना केला. त्यानंतर मृतकचा भाऊ जनार्दन घारे यांच्या तक्रारीवरून मृत आरतीच्या पतीसह पाच नातेवाईकांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. अटक पाचही आरोपीना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात आज 11 ऑगस्ट रोजी हजर केले असता 13 ऑगस्टपर्यत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी दिली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब वाघ करीत आहेत.