(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पंढरपुरात प्रेम विवाहाला विरोध करणाऱ्या वडिलांना मुलीकडून बेदम मारहाण, प्रियकराच्या मदतीनं रचला डाव
माढ्यातील प्रसिद्ध व्यापारी महेंद्र शहा हे शेटफळ येथून आपल्या मुलीला घेऊन माढ्याकडे येत असताना वडाचीवाडी गावाच्या हद्दीत बाथरूमसाठी गाडी उभी केली असता अज्ञातांनी त्यांना जबर मारहाण केली
मुंबई : प्रेमविवाहाला परवानगी न दिल्यानं पोटच्या मुलीनंच आपल्या वडिलांना बेदम मारहाण केलीये. प्रियकराच्या मदतीनं मुलीनं हा सगळा कट रचला. काल रात्रीच्या सुमारास (Pandharpur News) आपल्या मुलीला घेऊन माढाच्या दिशेनं येत असताना हा सगळा प्रकार घडला. महेंद्र शहा असं या मुलीच्या पित्याचं नाव आहे. मारहाणीनंतर शहा हे गंभीररित्या जखमी झालेत. याप्रकरणी माढा पोलिसांनी मुलीसह पाच जणांना अटक केलीये. तसंच यासंदर्भात आणखी तपास सध्या पोलिसांकडून सुरु आहे.
मंगळवारी रात्री साडे दहाच्या सुमारास माढ्यातील प्रसिद्ध व्यापारी महेंद्र शहा हे शेटफळ येथून आपल्या मुलीला घेऊन माढ्याकडे येत असताना वडाचीवाडी गावाच्या हद्दीत बाथरूमसाठी गाडी उभी केली असता अज्ञातांनी त्यांना जबर मारहाण केली. या मारहाणीत जबर जखमी झाले त्यांना उपचारासाठी सोलापूर येथे हलविण्यात आले आहे या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली तर व्यापारी वर्गात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.
या संदर्भात त्यांच्यासोबत असलेली त्यांची कन्या साक्षी महेंद्र शहा हिने आज सकाळी माढा पोलीसात खबर दिली. त्यानुसार साक्षी हिला तिचे वडिलांनी व्यावसायिक कारणासाठी 7 ऑगस्ट रोजी सकाळी पुण्याला पाठवले होते. तेथील कामे उरकून ती पुणे सोलापूर शिवशाही बसने माढ्यास निघाली. प्रारंभी टेंभुर्णीपर्यंत तिकीट काढले होते मात्र वडिलांनी तीला शेटफळ पर्यंतचे तिकीट काढून तेथे उतर मी तेथून तुला घेऊन जायला गाडी घेऊन येतो असे सांगितले. त्यानुसार ती शेटफळ येथे आली आणि ती आणि तिचे वडील हे दोघे स्वतःच्या गाडीतून माढ्याकडे येत असताना वडाचीवाडी गावाच्या हद्दीत आल्यावर मुलीने बाथरूमसाठी गाडी थांबविण्यास सांगितले. त्यानुसार गाडी थांबली त्यातून मुलगी बाहेर आली त्याचवेळी महेंद्र शहाहेही बाहेर आले . यावेळी अचानक अज्ञातांनी त्यांना मारहाण करून ते दोन मोटारसायकल वरून शेटफळच्या दिशेने निघून गेल्याचे मुलीने पोलीसांना दिलेल्या माहितीमध्ये म्हटले होते.
प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केल्या नंतर पोलीसांना विसंगती आढळून आली. त्यामुळे पोलीसी खाक्या दाखवताच अटक करण्यात आलेल्या संशयीतांपैकी एका बरोबर प्रेमसंबंध होते. परंतु वडिलांचा विरोध होता त्यांना जायबंदी करून विवाह करण्याचा कट रचला आणि त्यानुसार हे कृत्य केले असे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महंमद शेख या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत