Highest Average Salary in India: सर्वाधिक पगाराच्या सर्व्हेमध्ये सोलापूर टॉपला, मुंबई आणि बंगळुरूलाही टाकलं मागे; पण वस्तूस्थिती वेगळीच दिसतेय
Highest Average Salary in India: भारतात सरासरी 18.91 लाख इतका वार्षिक पगार मिळतो, त्याचबरोबर महिलांपेक्षा पुरुषांना जास्त पगार मिळत आहे असे एका सव्हेतून समोर आलं आहे.
Highest Average Salary in India: सर्वाधिक पगार देणारं शहर म्हणून सोलापूर (Solapur) उदयास आलेलं आहे. सोलापुरात सरासरी 28 लाख 10 हजार 92 रुपये इतका वार्षिक पगार दिला जात असल्याचं एका सव्हेतून समोर आलं आहे. यासाठी सोलापुरातील फक्त दोन जणांचा सर्वे करण्यात आला असला तरी, यातून मिळालेल्या आकडेवारीने मुंबई, बंगळुरुलाही मागे टाकलं आहे. मुंबईत 1 हजार 748 लोकांचं सर्वेक्षण करण्यात आलं असून, तेथील लोकांचा सरासरी वार्षिक पगार 21 लाख 17 हजारांपेक्षा जास्त आहे. याशिवाय बंगळुरूमधील लोकांचा सरासरी वार्षिक पगार 21.01 लाखांपेक्षा जास्त आहे. बंगळुरूमधील सुमारे 2,800 लोकांचं सर्वेक्षण करण्यात आलं आहे. सरासरी वेतन सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.
भारतात सरासरी वार्षिक पगार किती?
भारतात सरासरी वार्षिक पगार 18 लाख 91 हजार 85 रुपये इतका आहे, ज्यात सर्वात सामान्य कमाई ही 5 लाख 76 हजार 851 रुपये इतकी आहे. जुलै 2023 च्या सरासरी वेतन सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार ही माहिती मिळाली आहे. भारतात पुरुष आणि स्त्रियांच्या पगारात लक्षणीय फरक आहे. पुरुषांना सरासरी 19 लाख 53 हजार 55 रुपये इतका वार्षिक पगार मिळतो, तर महिलांना सरासरी 15 लाख 16 हजार 296 रुपये इतका सरासरी वार्षिक पगार मिळतो.
सरासरी वेतन सर्वेक्षणात जगभरातील 138 देशांतील हजारो व्यक्तींच्या पगाराचा डेटा संकलित करण्यात आला आहे आणि त्यातून ही माहिती समोर आली आहे. 11 हजार 570 लोकांच्या पगाराचं सर्वेक्षण केल्यानंतर ही माहिती प्राप्त झाली आहे.
कोणत्या क्षेत्रांत मिळतो सर्वाधिक पगार?
विविध क्षेत्रांमधील नोकऱ्यांबद्दल बोलायचं झालं तर, व्यवस्थापन (Management) आणि व्यवसाय (Business) हे सर्वाधिक पगार देणारे व्यवसाय म्हणून उदयास आले आहेत, ज्यातून 29 लाख 50 हजार 185 रुपये इतकं वार्षिक उत्पन्न मिळतं. यानंतर वकिली क्षेत्रातील उत्पन्न सर्वाधिक आहे, येथे सुमारे 27 लाख 2 हजार 962 इतका वार्षिक पगार दिला जातो.
20 वर्षांहून अधिक अनुभव असणाऱ्यांना किती पगार?
सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार, 20 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेल्या लोकांना 38 लाख 15 हजार 462 रुपये पगार दिला जातो. दुसरीकडे, 16 ते 20 वर्षांचा अनुभव असलेल्या लोकांना 36 लाख 50 हजारांहून अधिक पगार मिळतो. दुसरीकडे, डॉक्टरेट पदवी असलेले लोक सर्वाधिक सरासरी 27 लाख 52 हजारांहून अधिक वार्षिक पगार कमावतात, तर हायस्कूल पदवीपेक्षा कमी असलेले लोक वार्षिक 11 लाख 12 हजारांहून अधिक कमावतात.
कोणत्या शहरात मिळतो सर्वाधिक पगार?
सर्वेक्षणातून मिळालेल्या माहितीनुसार, सर्वाधिक पगार देणारे शहर म्हणून सोलापूर उदयास आलेलं आहे. सोलापुरात सरासरी 28 लाख 10 हजार 92 रुपये इतका वार्षिक पगार दिला जातो. सोलापुरातील दोन जणांचा सर्वे करण्यात आला असला तरी, यातून मिळालेल्या आकडेवारीने मुंबई, बंगळुरुलाही मागे टाकलं आहे. मुंबईत 1 हजार 748 लोकांचं सर्वेक्षण करण्यात आलं असून, तेथील लोकांचा सरासरी वार्षिक पगार 21 लाख 17 हजारांपेक्षा जास्त आहे. याशिवाय, बंगळुरूमधील लोकांचा सरासरी वार्षिक पगार 21.01 लाखांपेक्षा जास्त आहे. बंगळुरूमधील सुमारे 2,800 लोकांचं सर्वेक्षण करण्यात आलं आहे.
दिल्ली आणि इतर शहरातील लोकांचे पगार
देशाची राजधानी नवी दिल्लीत लोकांचा सरासरी वार्षिक पगार 20 लाख 43 हजार 703 रुपये इतका आहे, येथील 1 हजार 890 लोकांचं सर्वेक्षण करण्यात आलं आहे. भुवनेश्वरमध्ये सरासरी पगार 19 लाख 94 हजार 259 रुपये इतका आहे. राजस्थानमधील जोधपूरचा सरासरी वार्षिक पगार 19 लाख 44 हजार 814 रुपये आहे. पुणे आणि श्रीनगरमध्ये सरासरी वार्षिक पगार 18 लाख 95 हजार 370 रुपये आहे आणि हैदराबादमध्ये वार्षिक पगार सरासरी 18 लाख 62 हजार 407 रुपये इतका आहे.
राज्यांचा सरासरी पगार
भारतातील उत्तर प्रदेश या राज्यात सर्वाधिक सरासरी मासिक पगार 20,730 रुपये इतका आहे. यूपीनंतर पश्चिम बंगालचा सरासरी पगार 20,210 रुपये आहे आणि महाराष्ट्रात सरासरी पगार 20,110 रुपये आहे. चौथ्या क्रमांकावर बिहार आहे, ज्याचा पगार सरासरी 19,960 रुपये आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थान पाचव्या क्रमांकावर असून तेथील सरासरी पगार 19,740 रुपये इतका आहे.
... मात्र सोलापुरातील खरी परिस्थिती वेगळी
या सर्व्हेमध्ये जरी सोलापूरमध्ये सर्वाधिक पगार मिळत असल्याचं समोर आलं असलं तरीही खरी परिस्थिती मात्र काहीशी वेगळी आहे. सोलापूर हे एकेकाळी गिरणगाव म्हणून प्रसिद्ध होतं. स्वातंत्र्य पूर्वीच्या काळात सोलापुरात जवळपास पाच मोठ्या सूत गिरण्या होत्या. या सूतगिरण्यांमध्ये सुमारे वीस ते पंचवीस हजार कामगार काम करत होते. राज्यात सर्वाधिक महसूल असलेल्या शहरांपैकी एक सोलापूर होतं. मात्र कालांतराने कोल्हापुरातल्या सूतगिरण्या बंद पडल्या, येथील कामगार देशोधडीला लागले. सद्यस्थितीत देखील सोलापुरात बोटावर मोजता येतील एवढेच मोठे उद्योग आहेत. त्यामुळे उच्चशिक्षित असलेले तरुण दरवर्षी हजारोच्या संख्येने सोलापुरातून बाहेर पडतात. त्यामुळे सोलापूरची ओळख ही हळूहळू पेन्शनर्स आणि रिटायर्ड लोकांचे शहर अशी होत चालल्याचं नेहमीच बोललं जातं.
सोलापुरात बहुतांश नागरिक हे कामगार म्हणून काम करतात. त्यात प्रामुख्याने यंत्रमाग कामगार, विडी कामगार यांची संख्या लक्षणीय आहे. "सध्या सोलापुरात जवळपास 16 हजार पॉवरलुम मशीन आहेत. ज्यावर टॉवेल, चादर निर्मिती होते. या यंत्रमाग उद्योगात जवळपास 40 हजार लोकांना रोजगार मिळतो. यात बहुतांश कामगारांचा सरासरी पगार हा प्रतिदिवस 400-500 रुपये इतका आहे. त्यानंतर सर्वाधिक रोजगार असलेले विडी उद्योग आहे. यामध्ये आधी जवळपास 70 हजार लोकांना रोजगार होता. मात्र आता 35 ते 40 हजार विडी कामगार आहेत. विडी उद्योग अडचणीत असल्याने या कामगारांना साधारण 300 ते 500 रुपये प्रति दिवस इतका रोजगार मिळतो." अशी माहिती सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी यांनी दिली.
हेही वाचा: