Sangli Water Crisis : एबीपी माझाची बातमी, इम्पॅक्टची हमी! कोयना धरणातून एक टीएमसी पाण्याचा विसर्ग सुरु; तहानलेल्या सांगली जिल्ह्याला मोठा दिलासा
Koyna Dam : कोयना धरणात सध्या 89 टीएमसी साठा शिल्लक आहे. धरणाची पाणीसाठवण क्षमता 105 टीमएसी इतकी आहे. धरणातील पाण्यावर वीजनिर्मिती होते. पिण्यासाठी सुद्धा पाण्याची तरतूद आहे.
सांगली : सांगली जिल्ह्यात (Sangli Water Crisis) भीषण पाणीटंचाई आणि कृष्णा नदी कोरडी पडल्याने परिस्थिती बिकट होत चालली आहे. एबीपी माझाने सांगली जिल्ह्यातील पाणीटंचाई आणि कृष्णा नदी पात्राची दाहकता दाखवल्यानंतर कोयना धरणातून पाणी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे दिवाळी तोंडावर असल्याने सांगलीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. एबीपी माझाच्या बातमीनंतर शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांनी सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना माहिती दिली होती.
1050 क्यूसेक वेगाने पाणी सोडले
सांगली जिल्ह्यासह सातारा जिल्ह्यातही कमी पावसामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा राखून ठेवण्याचे तसेच योग्य वापराच्या सूचना देण्यात आल्या आहेत.दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी मागणी करण्यात आल्यानंतर आज शुक्रवारी दुपार एकपासून धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणाच्या पायथा वीजगृहाचे एक युनिट सुरू करुन 1050 क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. त्यामुळे धरणातील पाणीसाठा कमी होणार आहे. गेल्या दोन महिन्यात तीनवेळा सांगलीसाठी पाणी सोडण्यात आलं आहे. यावरून परिस्थितीचा अंदाज येतो.
पाऊस कमी असल्याने धरणातील पाणीसाठा 93 टीएमसीपर्यंतच पोहोचला
कोयना धरणात सध्या 89 टीएमसी साठा शिल्लक आहे. धरणाची पाणीसाठवण क्षमता 105 टीमएसी इतकी आहे. धरणातील पाण्यावर वीजनिर्मिती होते. पिण्यासाठी सुद्धा पाण्याची तरतूद आहे. सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील सिंचनासाठीही पाणी विसर्ग केला जातो. पाऊस कमी असल्याने धरणातील पाणीसाठा 93 टीएमसीपर्यंतच पोहोचला. कोयना धरणातून सिंचनासाठी पाण्याची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये टेंभू योजना, ताकारी आणि म्हैसाळ या तीन मोठ्या पाणी योजनांचा समावेश आहे. या तिन्ही योजनांचे पाणी सांगली जिल्ह्यासाठी जाते. तसेच टेंभू योजनेचे पाणी सातारा जिल्ह्यातील सिंचनासाठीही दिले जात आहे.
सांगली, कुपवाडवर पाणी टंचाईचे संकट
दरम्यान, सांगली, कुपवाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कृष्णा नदीतील पाण्याची पातळीत कमालीची घट झाली आहे. नदीपात्रात पाच दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. महापालिकेने कोयना धरणातून पाणी सोडण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे केली होती. पाणी पातळी कमी झाल्याने डिग्रज आणि सांगलीवाडी कडील बंधाऱ्याजवळ कृष्णेचे पात्र ठणठणीत कोरडे पडले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या