Sangli Water Crisis : ऑक्टोबर महिन्यातच अख्खा सांगली जिल्हा पाणी टंचाईने होरपळण्यास सुरुवात, कृष्णा नदी कोरडी ठाक पडली, 'माझा'च्या बातमीनंतर पाणी सोडण्याचा निर्णय
एबीपी माझाने नदी कोरडी ठाक पडल्याचे दाखवल्यानंतर प्रशासकीय पातळीवर तातडीने हालचाली सुरु झाल्या. कोयना धरणातून कृष्णा नदीत आज दुपारी बारा वाजल्यापासून एक टीएमसी विसर्ग केला जाणार आहे.
सांगली : ऑक्टोबर महिन्यात अख्खा सांगली जिल्हा (Sangli Water Crisis) पाणी टंचाईने होरपळू लागला आहे. कृष्णा नदी (Krishna River) सांगलीत कोरडीठाक पडल्याने चिंतेत आणखी भर पडली आहे. एबीपी माझाने आज (27 ऑक्टोबर) कृष्णा नदी कोरडी ठाक पडल्याचे दाखवल्यानंतर प्रशासकीय पातळीवर तातडीने हालचाली सुरु झाल्या. कोयना धरणातून कृष्णा नदीत आज दुपारी बारा वाजल्यापासून एक टीएमसी विसर्ग केला जाणार आहे. एबीपी माझाच्या बातमीनंतर शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांनी कृष्णा नदीतील कोरड्या पडलेल्या परिस्थितीची फोनद्वारे सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना माहिती दिली. यानंतर पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.
दिवाळीच्या तोंडावरच सांगली, कुपवाडवर पाणी टंचाईचे सावट गडद
सांगली, कुपवाड शहराला दररोज 74 दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कृष्णा नदीतील पाण्याची पातळीत कमालीची घट झाली आहे. नदीपात्रात पाच दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावरच सांगली, कुपवाडवर पाणी टंचाईचे सावट गडद झाले आहे. महापालिकेने कोयना धरणातून पाणी सोडण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे केली आहे.
हुकमाच्या पावसाने दगा दिल्यानंतर परतीच्या पावसाने सुद्धा ओढ दिल्यामुळे सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी खालावत चालली आहे. यामुळे कृष्णा नदीचं पात्र कोरडं पडायला सुरुवात झाली आहे. परतीचा पाऊस झाला नसल्याने आणि कोयनेतून सुद्धा विसर्ग कर्मी करण्यात आल्याने सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीत घट झाली आहे. पाणी पातळी कमी झाल्याने डिग्रज आणि सांगलीवाडी कडील बंधाऱ्याजवळ कृष्णेचे पात्र ठणठणीत कोरडे पडले आहे. त्यामुळे धरणातून तातडीने पाणी सोडावे अशी मागणी जोर धरत आहे.
गेल्या काही महिन्यापासून कोयना धरणातील पाण्याचे नियोजन कोलमडल्याने कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडत आहे. ऑगस्ट महिन्यात शहरावर पाणी टंचाईचे सावट होते. त्यानंतर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली होती. आता दिवाळीच्या तोंडावर पुन्हा नदीचे पात्र कोरडे पडत आहे.
एकीकडे दुष्काळाचे सावट आहे आणि दुसरीकडे 10 टक्क्यांवर पाणी कपात
सांगली व कुपवाड या दोन शहराला कृष्णा नदीतून पाण्याचा पुरवठा होतो. महापालिकेकडून दररोज 74 दशलक्ष लीटर पाण्याचा उपसा केला जातो. कोयना धरणात 89 टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक असून, तो 31 ऑक्टोबरला दरवर्षीच्या तुलनेत 16 टीएमसी कमी आहे. परिणामी, जिल्ह्याच्या वाट्याला येशाऱ्या पाण्यात सुमारे 10 ते 11 टक्के इतकी कपात निश्चित आहे. एकीकडे दुष्काळाचे सावट आहे आणि दुसरीकडे 10 टक्क्यांवर पाणी कपात असणार आहे.
अशावेळी पाटबंधारे विभागाची कसोटी लागणार आहे. कारण, लोकसभा निवडणुकांचा आखाडा याच काळात आहे. या स्थितीत वीज निर्मिती कमी करून शेतीला पाणी द्यावे, हा रेटा वाढणार आहे. त्यामध्येही दुष्काळी भागातील नेत्यांकडून आग्रही भूमिका राहील. कोयना धरणात 16 टीएमसी पाणी कमी असणे याचा अर्थ एक अखंड टेंभू योजना चालवण्यासाठी लागणारा पाणीसाठी कमी असणे हा आहे. पाटबंधारे विभागाकडून 10 टक्के कपातीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात आला आहे.
जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका
सांगली जिल्ह्यातील जत तालुका दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी उद्या जिल्हाधिकारी कार्यालय समोर सर्वपक्षीय नेते एकत्र येत एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहेत. आमदार विक्रमसिंह सावंत, माजी आमदार विलासराव जगताप यासह जत तालुक्यातील सर्व पक्ष नेते या उपोषणास बसणार आहेत.
जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका असून, दुष्काळ हा जत तालुक्याच्या पाचवीला पुजला आहे. जत तालुका 100 टक्के अवर्षणग्रस्त तालुका आहे. तालुक्यातील सर्व तलावांमधील सद्यस्थित शिल्लक पाणीसाठा 3 टक्के असून एकूण 27 तलावांपैकी 10 तलावांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा म्हणजे कोरडे असून उर्वरित तलावामध्ये मृतसंचय पाणीसाठा आहे.
इतर महत्वाच्या बातम्या