Sangli Police : सांगली एलसीबीकडून 10 घरफोडीचे गुन्हे उघडकीस; साडेआठ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
Sangli Police : सांगली जिल्ह्यातील (Sangli News) कवठेमहांकाळ, जत, उमदी या भागातील जवळपास 10 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आलं आहे.
Sangli Police : सांगली जिल्ह्यातील (Sangli News) कवठेमहांकाळ, जत, उमदी या भागातील जवळपास 10 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आलं आहे. यामध्ये बंद घराची कुलूपं तोडून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम चोरणाऱ्या दोघाना पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीकडून सोन्या- चांदीचे दागिने असा साडे आठ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. किशन ऊर्फ कल्लाप्पा ऊर्फ फांगऱ्या रतन चव्हाण आणि सुरेश तुळशीराम चव्हाण अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हे आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध विजापूर (ग्रामीण) विजापूर (शहर) तिकोटा, अथणी, बबलेश्वर (कर्नाटक), जत या ठिकाणी घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
सांगली जिल्ह्यातील घरफोडीच्या गुन्ह्यांबाबत पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली आणि अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी आढावा बैठक घेऊन सदरचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांना सूचना दिल्या होत्या. शिंदे यांनी एक पथक तयार करुन गुन्हे उघडकीस आणणेबाबत सूचना दिल्या होत्या.
सापळा रचून दोघांना उचलले
किशन चव्हाण व सुरेश चव्हाण हे दोघे चोरी केलेले सोन्याचे दागिने सोलापुरा विक्रीला घेऊन जाण्यासाठी जत ते उमदी जाणाऱ्या रोडलगत सिध्दार्थ पब्लिक स्कूलजवळ वाहनाची वाट पाहत थांबल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने सापळा रचला होता. त्यावेळी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.
सपोनि संदीप शिंदे यांनी पंचांसमक्ष किशन ऊर्फ कल्लाप्पा चव्हाण व सुरेश तुळशीराम चव्हाण यांची अंगझडती घेतली असता, किशनकडे सोन्याची चेन, सोन्याची अंगठी, सोन्याचे गंठण, लहान सोन्याच्या अंगठ्या मिळाल्या. तसेच सुरेशच्या अंगझडतीमध्ये खिशात सोन्याचे कानातील टॉप्स एक जोड, दोन अंगठया मिळाल्या. सोन्या चांदीच्या दागिन्यांबाबत दोघांकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावेळी सपोनि संदीप शिंदे यांनी सोन्याच्या दागिने बाबत जत, कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात माहिती घेतली असता सदर दागिने चोरीस गेल्याबाबत गुन्हे दाखल असल्याबाबत माहिती मिळाली.
आरोपी पुढील तपासासाठी उमदी पोलिस ठाण्यात वर्ग
किशन व सुरेशकडून आणखी माहिती घेत घरफोडीच्या अनुषंगाने चौकशी केली असता, अन्य एका साथीदाराच्या मदतीने कवठेमहांकाळ, जत, उमदी या ठिकाणीहून बंद घराची कुलुपे तोडून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम चोरली असल्याचे सागितले. दरम्यान, चोरलेले सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम याबाबत तपास करुन त्यांचेकडून उर्वरीत सोन्या चांदीचे दागिने असा 8 लाख 65 हजार 200 रुपये किंमतीचा मुद्देमाल व आरोपी पुढील तपासासाठी उमदी पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांचे मार्गदर्शनत पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, सपोनि संदीप शिंदे, विशाल येळेकर, अच्युत सुर्यवंशी, राजू शिरोळकर, अमोल ऐदाळे, जितेंद्र जाधव, संजय पाटील, संदीप पाटील, संकेत मगदूम, मच्छिद्र बर्डे, राहुल जाधव, गौतम कांबळे, अजय बेंद्रे, बिरोबा नरळे, संदीप गुरव, सागर लवटे, विक्रम खोत, अनिल कोळेकर, संतोष गळवे, सचिन कनप, सागर टिगरे, शुभांगी मुळीक, प्रकाश पाटील, कॅप्टन गुंडवाडे यांनी पार पडली.
इतर महत्वाच्या बातम्या