Satyajeet Tambe : सांगलीचे 'जावईबापू' आमदार झाल्यानं सासूरवाडीसह गावकऱ्यांच्या आनंदाला उधाण!
राज्यामध्ये सर्वाधिक चर्चा झालेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये अपक्ष सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) विजयी झाले आणि महाविकास आघाडीने समर्थन दिलेल्या शुभांगी पाटील यांना पराभवाला सामोरं जावं लागलं.
Satyajeet Tambe : राज्यामध्ये सर्वाधिक चर्चा झालेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये अपक्ष सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) विजयी झाले आणि महाविकास आघाडीने समर्थन दिलेल्या शुभांगी पाटील यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. या निकालानंतर सत्यजित तांबे यांच्या समर्थकांनी आनंद व्यक्त केला, तसाच आनंद सांगलीमध्येही व्यक्त करण्यात आला. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील पारे गावचे सत्यजीत तांबे जावई असल्याने त्यांनीही आनंद व्यक्त केला. परिसरात नवनिर्वाचित आमदार ‘जावई’ पाहुण्यांचे पोस्टरही लावण्यात आले. सत्यजीत यांच्या विजयानंतर विटा शहर तसेच पारे गावात अभिनंदनाचे फलक झळकले. पारे परिसरात जल्लोष करण्यात आला. सासरे संदीपशेठ, पत्नी नंदिनी, मुलगा भूषण, सून दिशा यांच्यासह साळुंखे कुटुंबियांनी कन्येच्या घरी जाऊन जावई पाहुण्यांचे अभिनंदन केले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे आ. सत्यजीत हे भाचे असून पारे येथील भीमरावशेठ साळुंखे यांचे सुपूत्र संदीपशेठ साळुंखे यांचे आ. तांबे हे जावई आहेत. सत्यजीत तांबे यांच्या पत्नी डॉ. मैथिली या बीडीएस असून त्यांचे शिक्षण चेन्नईत झाले. डॉ. मैथिली यांचा आमदार सत्यजीत यांच्याशी 2011 मध्ये पुण्यात विवाह झाला होता.
महिनाभर चर्चेत असलेल्या सत्यजीत तांबे यांचा विजय
सर्व राज्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक (Nashik Graduate Constituency) पदवीधरच्या एकतर्फी लढतीत अखेर गेल्या महिनाभर चर्चेत असलेल्या सत्यजीत तांबे यांचा दणदणीत विजय झाला. पहिल्या दिवसांपासून या निवडणुकीत तांबेमुळे एवढ्या नाट्यमय घडामोडी घडूनही विजय झाला. सुरवातीपासून चर्चेत असलेली नाशिक पदवीधर निवडणुकीत अखेर सत्यजीत तांबे यांचा विजय झाला. युवा नेतुत्व, गेल्या अनेक वर्षांपासूनची संघटनात्मक बांधणी, वडील सुधीर तांबे यांनी मागील तीन पंचवार्षिक बांधलेला मतदारसंघ या सर्वांचा परिणाम सत्यजित तांबे यांच्या विजयावर झाला.
तस पाहिलं तर सत्यजीत तांबे हे काँग्रेसचे युवा नेतृत्व. गेल्या अनेक वर्षांपासून ते काँग्रेसच्या (Congress) युवा वर्गाच्या बांधणीसाठी झटत आहेत. मात्र ऐनवेळी अपक्ष उमेदवारी अर्ज केल्याने सर्व रोख तांबे कुटुंबियांवर आला. मात्र या सगळ्यांचा परिणाम तांबेचा विजय रोखू शकला नसल्याचे आजच्या निकालावरून दिसून आले. एकीकडे थोरात-विखे घरोब्याचे संबंध आणि दुसरीकडे सत्यजित तांबेंना दिलेले पाठबळ, युवा उमेदवार म्हणून असलेला त्यांचा दांडगा जनसंपर्क हे विजयाचे शिल्पकार ठरले.
महत्वाच्या इतर बातम्या :