Sangli Crime : आटपाडी तालुक्यातील ग्रामस्थाची शिवसेना नेत्यांची थेट ईडीकडे तक्रार! बेकायदेशीर मालमत्ता जमवल्याचा केला आरोप
शिवसेना नेत्यांविरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ईडीचा लावलेला ससेमीरा सुरुच असतानाच सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील ग्रामस्थाने स्थानिक शिवसेना नेत्यांची थेट ईडीकडे तक्रार दाखल केली आहे
Sangli Crime : शिवसेना नेत्यांविरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ईडीचा लावलेला ससेमीरा सुरुच असतानाच सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील एका ग्रामस्थाने स्थानिक शिवसेना नेत्यांची थेट ईडीकडे तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे या प्रकरणाची सांगली जिल्ह्यासह तालुक्यात चांगलीच चर्चा रंगली आहे. संबंधित ग्रामस्थाने आटपाडी तालुक्यातील नेत्यांची ईडीकडे तक्रार करताना बेकायदेशीर मालमत्ता जमवल्याचा आरोप केला आहे.
आटपाडी तालुक्यातील शिवसेनेच्या नेत्यांची एका ग्रामस्थाकडूनच थेट ईडीकडे तक्रार करत बेकायदेशीर कमावलेल्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी केल्याने सांगली जिल्ह्यासह आटपाडी तालुक्यात खळबळ माजली आहे. आटपाडी तालुक्यातील शिवसेनेचे नेते माजी जिल्हा परिषद सदस्य व विद्यमान जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्या विरोधात ही तक्रार मच्छिंद्र माळी या आटपाडीमधील ग्रामस्थाने केली आहे. तानाजी पाटील यांनी गेल्या काही वर्षात बेकायदेशीर मालमत्ता कमावली असून त्याच्या चौकशी करण्याची मागणी माळी यांनी ईडीकडे केली.
मच्छिंद्र माळी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की ,तानाजी पाटील व त्यांची पत्नी मनीषा पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर वाम मार्गाने त्यांच्या नावे व मुलाच्या नावे तसेच भाऊ व भावजय यांच्या नावे मालमत्ता संपादित केली आहे. त्याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.
सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून तानाजी पाटील व त्यांच्या पत्नी मनीषा पाटील या सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या. तानाजी पाटील व त्यांच्या पत्नी जनतेमधून जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर मिळालेल्या अधिकाराचा गैरवापर करून त्यांनी वारेमाफ जंगम गुंतवणूक व आलिशान गाड्या मिळविल्या आहेत. तानाजी पाटील यांनी मुंबई, पुणेसह मोठ्या शहरांमधून स्थावर मालमत्ता घेत त्यामध्ये गुंतवणूक केली आहे.
तानाजी पाटील व मनीषा पाटील जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर आटपाडी तालुक्यातील दिघंची, करगणी, आटपाडी, पुजारवाडी, शेरेवाडी, मुढेवाडी, विठ्ठलापूर,मापटेमळा, खरसुंडीसह वासुद (ता. सांगोला जि. सोलापूर) या ठिकाणी एकूण 1070 एकर जमीन मिळविली आहे. यामध्ये तानाजी पाटील यांच्या नावे 66 एकर, त्यांच्या पत्नी मनीषा पाटील यांच्या नावे 21 एकर, मुलगा पृथ्वीराजच्या नावे 12 एकर, तर भाऊ शिवाजी पाटील यांच्या नावे तब्बल 934 एकर, शिवाजी यांच्या पत्नी विजयादेवी यांच्या नावे 21 एकर, शिवाजी यांचा मुलगा रोहन यांच्या नावे 12 एकर इतकी जमीन आहे.
तसेच दोन पेट्रोल पंप,विविध बँका मधून मुदत ठेवीची गुंतवणूक, पुणे मुंबई यासारख्या महानगरामध्ये सदनिका व मोकळे भूखंड खरेदी केले आहेत. त्यांची चौकशी केल्यास सर्व सत्य बाहेर येईल. तानाजी पाटील व इतरांनी संगनमत करून मनी लॉन्ड्रिंग अधिनियमाचे उल्लंघन केले असून त्यांनी गोरगरिबांच्या जमिनी काढून घेतले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या