Jayant Patil: तुम्हीही आमच्याशी भाजपसारखंच वागलात! जयंत पाटलांचा पराभव जिव्हारी लागला, ते ट्विट व्हायरल
Maharashtra Politics: सलग पाच टर्म आमदार राहिलेल्या आणि शरद पवार पुरस्कृत उमेदवार असलेल्या जयंत पाटील यांना धोबीपछाड दिला आहे. देवेंद्र फडणवीसांच्या मतांच्या चोख नियोजनामुळे मविआचा तिसरा उमेदवार पडला आहे.
मुंबई: विधानपरिषदेत सलग पाच टर्म आमदार राहिलेले शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना शुक्रवारी पराभवाचा धक्का बसला. या पराभवाने व्यथित झालेले जयंत पाटील (Jayant Patil) यांना मतमोजणी सुरु झाल्यानंतर काही क्षणांमध्येच निकालाचा अंदाज आला आणि ते विधानभवातून बाहेर पडून थेट अलिबागच्या दिशेने रवाना झाले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रियाही दिली. यावेळी त्यांच्या बोलण्यातून विधानपरिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election Result 2024) महाविकास आघाडीची मदत न झाल्याचे असमाधान स्पष्टपणे दिसून आले. जयंत पाटील यांच्या या नाराजीनंतर इंडिया आघाडीचा भाग असणाऱ्या आणखी एका पक्षाने विधानपरिषदेच्या निकालांबाबत नाराजी व्यक्त केली. समाजवादी गणराज्य पक्षाचे विधानपरिषदेतील आमदार कपिल पाटील यांनी ट्विट करुन याबाबत भाष्य केले.
इंडिया आघाडीत आपण सोबत राहिलो. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी त्यांना मतदान केलं. इंडिया आघाडीतल्या प्रमुख पक्षांची तक्रार होती की, भाजपने त्यांचे पक्ष चोरले, पळवले. पण इंडिया आघाडीतील छोट्या पक्षांशी मोठे पक्ष कसे वागले ? भाजपसारखेच ? तूर्त रजा घेतो, पण कायम तुमच्या सोबत आहे, अशी खंत कपिल पाटील यांनी या ट्विटमधून बोलून दाखवली.
विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात होते. ठाकरे गटाने शेवटच्या क्षणी मिलिंद नार्वेकर यांना रिंगणात उतरवल्याने विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होऊ शकली नव्हती. नार्वेकरांच्या एन्ट्रीमुळे ही निवडणूक चुरशीची होणार, हे अपेक्षित होते. अखेर या चुरशीच्या लढतीत महायुतीच्या सर्व उमेदवारांनी बाजी मारली. मात्र, मिलिंद नार्वेकर यांना निवडून आणण्याच्या नादात जयंत पाटील यांचा पराभव झाला. जयंत पाटील अनेक वर्षे विधानपरिषद निवडून येण्याची किमया साधत होते. कोणत्याही बड्या राजकीय पक्षात नसताना जयंत पाटील आमदारांच्या मतांची जुळजाजुळव करुन निवडून येत होते. त्यामुळे अनेकांना जयंत पाटील यांना विधानपरिषदेत बघण्याची सवय झाली होती. मात्र, आजच्या पराभवाने जयंत पाटील यांनी विजयी परंपरा खंडित झाली आहे.
इंडिया आघाडीत आपण सोबत राहिलो. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी त्यांना मतदान केलं. इंडिया आघाडीतल्या प्रमुख पक्षांची तक्रार होती की, भाजपने त्यांचे पक्ष चोरले, पळवले. पण इंडिया आघाडीतील छोट्या पक्षांशी मोठे पक्ष कसे वागले ? भाजपसारखेच ?
— Kapil Patil (@KapilHPatil) July 12, 2024
------------
तूर्त रजा घेतो, पण कायम… pic.twitter.com/Sp4oOmjXEC
माझी 12 मतं मला मिळाली पण.... जयंत पाटील पराभवानंतर काय म्हणाले?
विधानपरिषदेत पराभव झाल्यानंतर जयंत पाटील तडकाफडकी अलिबागसाठी रवाना झाले. एबीपी माझाने त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी फार बोलण्यास नकार दिला. "माझी बारा मते मला मिळाली. काँग्रेसची मते त्यांना मिळाली. काँग्रेसची काही मते फुटली. जाऊदे आता नको बोलायला. ", एवढीच माफक प्रतिक्रिया त्यांनी दिली.
आणखी वाचा