Vidhan Parishad Election Result 2024: काँग्रेसची 8 मतं फुटली, फडणवीसांची जादू कायम, पंकजा मुंडे सभागृहात परतल्या; विधानपरिषद निकालाची वैशिष्ट्ये
MLC Election Result 2024: विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. महायुतीचे 9 आणि महाविकास आघाडीचे 2 उमेदवार विजयी झाले. जयंत पाटील यांचा पराभव मविआसाठी मोठा धक्का मानला जात आहे. फडणवीसांचं चोख नियोजन
मुंबई: राज्यातील विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीचा निकाल शुक्रवारी संध्याकाळी जाहीर झाला. या निवडणुकीत महायुतीने बाजी मारल्याचे दिसून आले. ठाकरे गटाने शेवटच्या क्षणी मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांना रिंगणात उतरवल्याने विधानपरिषद निवडणूक (MLC Election 2024) चुरशीची झाली होती. लोकसभेतील यशामुळे मविआ आघाडी विधानपरिषद निवडणुकीत शिंदे गट आणि अजितदादा गटाच्या आमदारांची मतं फोडेल, अशी चर्चा होती. मात्र, ही अपेक्षा फोल ठरली आणि महायुतीने विधानपरिषद निवडणुकीत बाजी मारली.
फडणवीसांचा मॅजिक पॅटर्न सलग तिसऱ्यांदा कायम
यापूर्वी 10 जुन 2022 ला राज्यसभा तर 20 जुन 2022 ला विधानपरिषदेच्या निवडणुकीत फडणवीसांनी आपला मॅजिक पॅटर्न वापरत मविआला धक्का दिला होता. त्यामुळे मविआ सरकार कोसळले होते. त्यामुळे आताच्या विधानपरिषदेच्या नियोजनाची आणि मतांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच होती. लोकसभेच्या निकालामुळे वातावरण बदलल्याने शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट महायुतीच्या आमदारांची मतं फोडेल, अशी चर्चा होती. मात्र, आज विधानपरिषद निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या जादू कायम असल्याचे दिसून आले. 2022 ला राज्यसभा आणि विधानपरिषदेत विजयानंतर आज देवेंद्र फडणवीस यांनी विजयाची हॅट्रिक करुन दाखवली. विधानपरिषेदेच्या गणितांमध्ये फडणवीसांची बेरीज सर्वांवरच भारी पडल्याची चर्चा आता रंगली आहे.त्यांनी सलग पाच टर्म आमदार राहिलेल्या आणि शरद पवार पुरस्कृत उमेदवार असलेल्या जयंत पाटील यांना धोबीपछाड दिला आहे.
काँग्रेसची एकूण 8 मतं फुटली
विधानपरिषद निवडणुकीत सुरुवातीपासूनच काँग्रेसची मतं फुटणार, अशी चर्चा होती. या निवडणुकीत अजित पवार गटाला दोन उमेदवार निवडून आणणे कठीण होते. त्यासाठी त्यांना अतिरिक्त मतांची गरज होती. विधानपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यावर शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांनी पहिल्या पसंतीची 23 मतं मिळवत विजय मिळवला. त्यामुळे काँग्रेसची 8 मतं फुटल्याची जोरदार चर्चा आहे.
पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन
विधानपरिषद निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा विजय अनेक अर्थांनी भाजपसाठी महत्त्वाचा आहे. 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून पंकजा मुंडे महाराष्ट्राच्या राजकारणापासून दूर होत्या. त्यामुळे त्यांचे समर्थक नाराज होते. लोकसभा निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे मराठवाड्यातील मुंडे समर्थक दुखावले होते. मात्र, आता विधानपरिषद निवडणुकीत विजय मिळाल्याने पंकजा मुंडे यांची महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एन्ट्री झाली आहे.
शरद पवार गट आणि ठाकरे गटाला अपयश
लोकसभेच्या निकालानंतर आत्मविश्वास दुणावलेला ठाकरे गट आणि शरद पवार गट महायुतीची मतं फोडेल, अशी अपेक्षा होती. त्यामुळे विशेषत: अजितदादा गटाच्या उमेदवारांना धोका असल्याची चर्चा होती. मात्र, शरद पवार गटाला अजितदादा गटाचे एकही मत फोडण्यात यश आले नाही. तर उद्धव ठाकरे यांनाही शिंदे गटाची मतं फोडण्यात अपयश आले. यामुळे मविआचे तिसरे उमेदवार असणाऱ्या जयंत पाटील यांचा पराभव झाला.
भाजपचे तरूण चेहरे विधानपरिषदेत दिसणार
या विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे एकूण पाच उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे आता भाजपची यंग ब्रिगेड विधानपरिषदेत दिसणार आहे. भाजपचे योगेश टिळेकर, परिणय फुके, पंकजा मुंडे आणि अमित गोरखे यांचा विजय झाला. अमित गोरखेंच्या रूपानं मातंग समाजातील तरूण चेहरा विधानपरिषदेत दिसणार आहे. तर योगेश टिळेकर यांच्या माध्यमातून माळी समाजाला विधानपरिषदेत प्रतिनिधित्व मिळाले आहे. याशिवाय, सदाभाऊ खोत यांच्या रूपात शेतकरी आणि चळवळीत कार्यकर्ता पुन्हा आमदार झाला आहे.
आणखी वाचा
चुरशीच्या लढाईत ठाकरेंच्या राईट हँडने बाजी मारली, विधानपरिषद निवडणुकीत मिलिंद नार्वेकर विजयी