Sanjay Raut : अजित पवार सोडा, फडणवीसांनीच मुंडे, कोकाटेंचा राजीनामा घ्यावा; संजय राऊत कडाडले, सुरेश धसांनाही डिवचलं
Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांनी मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.

Sanjay Raut : सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर खून खटल्यातील आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपी हे मंत्री धनंजय मुंडेंचे (Dhananjay Munde) निकटवर्तीय असल्याचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यातच भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे कृषिमंत्री असताना कृषी विभागात 300 कोटींहून अधिक रकमेचा घोटाळा झाल्याचा आरोप केला. तर मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या सदनिका या बनावट दस्तऐवज तयार करून लाटल्या प्रकरणात कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) व त्यांच्या भावाला प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा नाशिक जिल्हा न्यायालयाने ठोठावली. आता धनंजय मुंडे यांच्यासह माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. या प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटेंवर जोरदार हल्लाबोल केलाय.
संजय राऊत म्हणाले की, सुरेश धस यांनी राजीनामा मागितला. त्यांच्या आधी अनेकांनीही भावना व्यक्त केल्या आहेत. विधानसभेचे अधिवेशन सुरू होईल, तेव्हा या प्रश्नामुळे कदाचित सभागृह चालेल की नाही? अशी शंका मला वाटते. इतके भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. काल भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये एका मंत्राला दोन वर्षाची शिक्षा ठोठावली. अजित पवार गटाचे दोन्ही मंत्री हे रडारवर आहेत, असे त्यांनी म्हटले.
मुख्यमंत्र्यांनीच राजीनामा घ्यावा
संजय राऊत पुढे म्हणाले की, नैतिकतेची गोष्ट असेल तर कोणतीही खरखर न करता या दोन्ही मंत्र्यांचा राजीनामा अजित पवार सोडून द्या, पण मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे. एकमेकांवर काय ढकलत आहात. इतका मोठा भ्रष्टाचार समोर आलेला आहे. अंजली दमानिया यांनी भ्रष्टाचार बाहेर काढला आहे. सुरेश धस आणि अनेक नेत्यांनी देखील भ्रष्टाचार बाहेर काढला आहे. माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात तर कोर्टानेच त्यांना शिक्षा ठोठावली आहे. विधानसभा अध्यक्षांवर काय तुम्ही सोडत आहात? विधानसभा अध्यक्ष काय निष्पक्ष आहेत का? आमच्या वेळेस 40 आमदारांच्या प्रकरणात आम्ही त्यांचे चालचलन पाहिलेले आहे. ते निर्णय घेणार आहेत का? असे देखील त्यांनी म्हटले.
सुरेश धसांचा बुरखा फाटलाय
सुरेश धस यांनी संजय राऊत यांच्यावर केलेल्या टीकेबाबत विचारले असता ते म्हणाले की, दुसऱ्यांकडे काय पाहत आहात. सुरेश धस यांच्यावर आता विश्वास कोणी ठेवेल असे मला वाटत नाही. ते आम्हाला काय बोलता आहेत हे सोडून द्या. त्यांचा बुरखा फाटलेला आहे. तरीही आम्ही म्हणतोय की अजूनही ते मैदानामध्ये लढण्याचे नाटक करत असतील तर ते त्यांनी करत राहावे. त्यांनी ज्या पद्धतीने धनंजय मुंडे यांची भेट घेतली. त्यांना अंधारात ठेवून ती भेट झाली असेल. पण, ज्या क्षणी मुंडे तिथे आले. त्यावेळी धस यांनी तिथून बाहेर पडायला पाहिजे होते आणि माध्यमांसमोर सांगायला पाहिजे होते की, मला ट्रॅप करण्याचा प्रयत्न झाला. पण, मी खंबीरपणे अजून लढत आहे, अशी टीका त्यांनी संजय राऊत यांनी केली.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
