NCP Ajit Pawar: आजी-माजी कृषीमंत्री, दादांचे दोन मंत्री अडचणीत, एकाचं मंत्रिपद, दुसऱ्याची आमदारकी टांगणीला!
Manikrao Kokate: धनंजय मुंडेंनंतर माणिकराव कोकाटे यांच्या रुपाने अजित पवार गटाचा दुसरा मंत्री अडचणीत आला आहे. दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर आता कोकाटे हायकोर्टात दाद मागणार असल्याची माहिती आहे.

Manikrao Kokate: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे दोन मंत्री सध्या अडचणीत सापडले आहेत. राज्याचे माजी कृषीमंत्री आणि विद्यमान कृषीमंत्री दोघांच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचं चित्र आहे. पहिल्यांदा धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणी झाली, त्याचं कारण म्हणजे, बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असल्याचा ठपका असलेला वाल्मिक कराड हा माजी कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या जवळचा असल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू झाली. त्यानंतर हळूहळू त्यांच्यावरती अनेक आरोप होऊ लागले त्यानंतर आता मुंडे (Dhananjay Munde) कृषीमंत्री असताना त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव पास न करताच टेंडर काढल्याचा आरोप त्यांच्यावरती होत आहे, तर दुसरीकडे राज्याचे विद्यमान कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) देखील मोठ्या अडचणीत सापडले आहेत. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्यासह बंधूंना दोन वर्षांचा कारावास आणि 50 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे कमी उत्पन्न दाखवून घर घेतल्याचा त्यांच्यावर आरोप होता आणि आज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने कोकाटे बंधूंना दोन वर्षाचा कारावास आणि पन्नास हजार रुपयांचा दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
एकाचं मंत्रिपद, दुसऱ्याची आमदारकी टांगणीला!
धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावी अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून होताना दिसत आहे. अशातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंडे कृषीमंत्री असताना त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव पास न करताच टेंडर काढल्याचा आरोप करत सर्व पुरावे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दाखवत मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली आहे. तर आता राष्ट्रवादीचे दुसरे नेते, आमदार आणि राज्याचे विद्यमान कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्द होण्याची शक्यता आहे. माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. लोकप्रतिनिधीला दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा सुनावल्यास त्याचं सभागृहाचं सदस्यत्त्व रद्द होते. त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपद आणि आमदारकी गमवावी लागू शकते. त्यामुळे आता माणिकराव कोकाटे वरिष्ठ न्यायालयात दाद मागणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. धनंजय मुंडेंनंतर माणिकराव कोकाटे यांच्या रुपाने अजित पवार गटाचा दुसरा मंत्री अडचणीत आला आहे. धनंजय मुंडे यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसर्या नेत्याच्या मंत्रिपदावर संकट ओढावलं आहे. त्यामुळे आता याप्रकरणात माणिकराव कोकाटे, अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस काय पावले उचलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काय म्हणाले माणिकराव कोकाटे?
माणिकराव कोकाटे या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हणाले, ही राजकीय केस होती. गेल्या 28 वर्षांपूर्वी ही केस रजिस्टर झाली आहे. त्यावेळेस दिघोळे साहेब हे राज्यमंत्री होते. माझा आणि त्यांचा राजकीय वैर होतं. त्या वैरात्वापोटी त्यांनी सरकारला सांगून माझ्यावर केस दाखल केली होती. त्याचा निकाल 30 वर्षानंतर आज लागलेला आहे. न्यायालयाने त्यांचा निकाल सुनावलेला आहे. निकालपत्र 40 पानांचं आहे. ते मी अजून वाचलेले नाही. मी कायद्यानुसार जे काही करता येईल ते सगळं केलेलं आहे. राजकीय दृष्ट्या देशात अशा प्रकारचे अनेक निकाल लागले आहे. मी हाय कोर्टात जाणार आहे. जसा निकाल सुनावण्याचा अधिकार न्यायालयाला आहे. तसाच आम्हाला देखील एक नागरिक म्हणून न्याय मागण्याचा अधिकार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
