Prakash Ambedkar : अजित पवारांना भाजपनं दाखवले काळे झेंडे, प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं मोठं राजकारण; म्हणाले...
Prakash Ambedkar : अजित पवारांना जुन्नर विधानसभा मतदारसंघात भाजपकडून काळे झेंडे दाखवण्यात आले. यावरून प्रकाश आंबेडकरांनी मोठं राजकारण सांगितलं आहे.
Prakash Ambedkar : उपमुख्यमंत्री अजित पवारांची (Ajit Pawar) जनसन्मान यात्रा (Jansanman Yatra) जुन्नर विधानसभेत (Junnar Vidhan Sabha Constituency) पोहचली असता भाजपच्या जुन्नर विधानसभा प्रमुख आशा बुचके काळी साडी परिधान करून रस्त्यावर उतरल्या आणि त्यांनी थेट अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले. यामुळे महायुतीत (Mahayuti) मिठाचा खडा पडल्याचे चित्र आहे. आता यावरून वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मोठं राजकारण सांगितलं आहे.
आज जुन्नरमध्ये पर्यटन विषयाची शासकीय बैठक पार पडत असताना आम्हाला का डावलण्यात आले? महायुती आहे तर मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो बैठकीत का नाहीत? पालकमंत्री म्हणून फक्त अजित पवारांचा फोटो का लावण्यात आला? या जुन्नर विधानसभेत नेमकं काय शिजतंय? असे अनेक प्रश्न उपस्थित करत बुचकेंनी पालकमंत्री अजित पवारांना धारेवर धरलं. यावरून प्रकाश आंबेडकर यांनी महत्त्वाचे भाष्य केले आहे.
प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं मोठं राजकारण
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, येणाऱ्या काळात काही मोठ्या घडामोडी होणार आहेत. त्यासाठी जनतेने तयार राहावं, असं म्हणत भविष्यात मोठे राजकीय घडामोडींचे सुतोवाच त्यांनी केले आहे. ते अकोला येथे धनगर समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते.
...तर 1990 च्या आधीची परिस्थिती येईल
गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमात बोलताना प्रकाश आंबेडकरांनी धनगर समाजाला राजकीय आवाहन केलंय. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आरक्षणवाद्यांना मतदान करा. टाळ कुटणाऱ्यांना मतदान केलं तर 1990 च्या आधीची परिस्थिती येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी दिलाय. येणाऱ्या विधानसभेत आरक्षणाला धोका आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आरक्षणाची शिडी वाचवायची की नाही? याचा विचार धनगर समाजाने करावा, असा त्यांनी यावेळी म्हटले.
सरकारला पोलिसांचं मनोबल तोडायचं आहे का?
दरम्यान, मराठा आरक्षणावर संभाजी भिडेंनी केलेल्या वक्तव्यावर काहीही बोलायला आंबेडकरांनी नकार दिला. तर भाजप आमदार नितेश राणे यांनी पोलिसांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवर बोलताना त्यांनी सरकारवर टीका केली. नितेश राणेंच्या माध्यमातून सरकारला पोलिसांचे मनोबल तोडायचं आहे का?, असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला आहे.
आणखी वाचा